अहिल्यानगर : संविधान दिवशी (२६ नोव्हेंबर) राज्यात लोकशाहीवर थेट हल्ला झाल्याचा आरोप काँग्रेसने केला असून, पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर कठोर टीका केली आहे. श्रीरामपूर येथे पक्षाच्या जिल्हाध्यक्ष सचिन गुजर (Sachin Gujar) यांचे अपहरण करून मारहाण करण्यात आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलताना सपकाळ यांनी फडणवीस यांना ‘जल्लाद’ म्हणत, ‘लोकशाहीला फासावर लटकवण्याचं काम करत आहेत’ असा आरोप केला. श्रीरामपूर शहरात सकाळी सात वाजता घडलेल्या या घटनेत गुजर हे मॉर्निंग वॉकला निघाले होते. तेव्हा अज्ञात व्यक्तींनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवून दुधाळ वस्ती परिसरात नेले गेले. तिथे त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि नंतर सोडून देण्यात आले. अपहरणाची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलिसांकडून ती तपासण्यात आली आहे. गुजर यांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले (Hemant Ogale), सचिन गुजर आणि इतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या सपकाळ यांनी गुजर यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांची तब्येत जाणून घेतली. नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले, “संविधान दिवशी सकाळीच भाजपने लोकशाहीवर हल्ला केला. २६/११ हा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतावर हल्ला केलेला दिवस, आणि त्याच दिवशी फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तींनी अहिल्यानगर जिल्ह्यात लोकशाहीवर हल्ला चढवला. फडणवीस हे जल्लाद झाले आहेत, जे लोकशाहीला फासावर लटकवत आहेत.” काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध करत, “सचिन गुजर हे लढाऊ कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर झालेला हा हल्ला संविधानाच्या मूल्यांविरोधात आहे. आम्ही घाबरणार नाही, संघर्ष चालूच राहील” असे म्हटले.