अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांचा अमरावती शहरात दुचाकीवरून जाताना कारने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात ते जखमी झाले असून, पायाला आणि मणक्याला मार लागला आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून, खोडके सुखरूप आहेत. ही घटना दुपारी ३ वाजता घडली आहे. आगामी अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोडके हे कार्यकर्त्यांच्या बैठकीला दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी एका कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत आमदार खोडके जखमी झाले असून दुचाकीचे नुकसान झाले. अपघातानंतर खोडके यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली. आज मी दुपारी ३ वाजता माझ्या दुचाकीने जात असताना अपघात झाला आहे. सध्या माझ्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्या असून, रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आहेत. मी सुखरूप आहे. काळजी करण्याचे कारण नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक दिवस निगरानीमध्ये रुग्णालयात राहावे लागणार आहे. या काळात माझ्यासोबत असलेल्या माझ्या सर्व स्नेहीजणांचे मनापासून आभार,” असे खोडके म्हणाले. खोडके हे अमरावतीचे माजी नगरसेवक असून, त्यांच्या पत्नी सुलभा खोडके या विद्यमान आमदार आहेत. या अपघाताने राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ही घटना घडल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे.