B. S. Yediyurappa : “काँग्रेसला मत म्हणजे भ्रष्टाचाराला खुले आमंत्रण”; येडियुरप्पांचा जोरदार प्रहार !
पोटनिवडणुकीच्या रिंगणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ ठाण मांडून बसले आहे. यावरून काँग्रेसला पराभवाची मोठी भीती सतावत असल्याचे स्पष्ट होत आहे

B. S. Yediyurappa – राज्यातील काँग्रेस सरकारकडे आधीच प्रचंड बहुमत आहे. अशा स्थितीत जर त्यांनी पोटनिवडणुका जिंकल्या, तर सत्तेच्या नशेत धुंद होऊन त्यांना अधिक भ्रष्टाचार करण्याची मोकळीक मिळेल, असा घणाघाती आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मंगळवारी केला. बागलकोट आणि दावणगेरे दक्षिण या दोन विधानसभा मतदारसंघांतील मतदारांना त्यांनी काँग्रेसचा पराभव करण्याचे आवाहन केले आहे.
येडियुरप्पा पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, कर्नाटक सध्या भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे प्रशासन तुघलकी दरबारासारखे असून जनहित पूर्णपणे विसरले गेले आहे. काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी भाजप उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन त्यांनी मतदारांना हात जोडून केले. बागलकोट आणि दावणगेरे दक्षिणमध्ये अनुक्रमे ९ एप्रिल रोजी मतदान होणार असून येडियुरप्पा स्वतः तिथे प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत.
दहावीच्या परीक्षेत हिंदी विषयासाठी श्रेणीपद्धती लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयावर भाष्य करताना येडियुरप्पा यांनी महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले, हिंदी शिकल्यामुळे कन्नड भाषेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. हिंदी शिकण्याबाबत निरुत्साह दाखवणे मला मान्य नाही, कारण देशभरात संवादासाठी ही भाषा महत्त्वाची आहे. या विषयावरून भाषिक संभ्रम निर्माण करू नये, असे त्यांनी बोलताना नमूद केले.
पराभवाच्या भीतीने मुख्यमंत्री मैदानात :
पोटनिवडणुकीच्या रिंगणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ ठाण मांडून बसले आहे. यावरून काँग्रेसला पराभवाची मोठी भीती सतावत असल्याचे स्पष्ट होत आहे, अशी टीका बी.एस. येडियुरप्पा यांनी केली.
बागलकोटमधून वीरभद्रय्या चरंतीमठ आणि दावणगेरे दक्षिणमधून श्रीनिवास दासकरियप्पा हे भाजपचे उमेदवार रिंगणात असून, त्यांच्या विजयासाठी भाजपने कंबर कसली आहे. सत्तेचा गैरवापर करूनही काँग्रेसचा पराभव निश्चित असल्याचे त्यांनी नमूद केले.





