जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे प्रकरण
नगर – तत्कालीन जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांच्यावर काय कारवाई होणार याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने किंवा सक्तीच्या रजेचे आदेश नसल्याने शिक्षक संघटनांनी सावध पवित्रा घेत जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही किंवा कारवाईचा लेखी आदेश मिळत नाही तोपर्यंत शालेय स्पर्धेस सहकार्य करणार नसल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच कविता नावंदे यांचे पती सुभाष नावंदे यांना नगर येथे प्रतिनियुक्तीवर हजर केल्याने पुन्हा माघारी पाठविण्यासाठी समन्वय समिती आक्रमक राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नगर येथे नव्याने हजर झालेले जिल्हा क्रीडा अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार असलेले विजय संतान यांनी क्रीडा शिक्षक संघटना, खेळ संघटना व तालुका प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत बंद असलेल्या शालेय स्पर्धा चालू करणे, शिक्षकांच्या मागण्या मान्य करून योग्य ती कार्यवाही करणे तसेच कविता नावंदे यांच्या वरील कारवाई बाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक व पदाधिकारी हजर होते. या बैठकीमध्ये शासनाचे प्रतिनिधी म्हणून विजय संतांन तर समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपले म्हणणे मांडले.
पालकमंत्री राम शिंदे यांच्या पुढाकाराने कविता नावंदे यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याबद्दल बैठकीत अभिनंदन ठराव मांडण्यात आला. पालकमंत्र्यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून शालेय स्पर्धेवरील असहकार 29 ऑगस्ट पर्यंत तात्पुरता स्थगित केला आहे. मात्र आयुक्तांमार्फत अधिकारी नावंदे यांचे बाबत काय कारवाई करणार व चौकशी समितीच्या कार्यवाहीचा कालखंड लिखित स्वरूपात नसल्याने आंदोलन मात्र मागे घेण्यात आले नाही.
शासनाने कारवाईची मुदत लिखित स्वरूपात दिल्यास आंदोलन स्थगित करून स्पर्धा चालू करणार आहे. 29 ऑगस्ट पर्यंन्त बदली न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार, अन्यथा 29 ऑगस्ट नंतर कुठल्याही स्पर्धेस सहकार्य करणार नाही. शिवछत्रपती पुरस्कार परत करणार, उपोषणास बसणार व तरीही निर्णय न झाल्यास नाईलाजाने आत्मदहन करणार असल्याचे सांगण्यात आले.