पूर्वतयारीमुळे पूरस्थिती हाताळण्यामध्ये यश

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल; नुकसानीचे 90 टक्‍के पंचनामे पूर्ण

सातारा  – अति – वृष्टीचा इशारा मिळाल्यामुळे पूरस्थितीपूर्वीच धोकादायक ठिकाणावरील कुटुंबे स्थलांतरित करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात जीवितहानी टाळता आली. येत्या कालावधीत पुररेषेनजिकची गावे स्थलांतरित करण्यात येणार आहेत. आपत्तीपूर्वी आणि आपत्तीकाळात सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून  खूप चांगले काम केल्यामुळे पूरस्थिती हाताळण्यामध्ये यश मिळाले, अशी माहिती जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिली.

जिल्हाधिकारी सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार पूरपरिस्थिती नियंत्रणानंतर नुकसानीचे 90 टक्के पंचनामे पूर्ण करण्यात आले आले आहेत. त्याचबरोबर पूरग्रस्त भागातील 6 हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. पूरपरिस्थितीमुळे ज्या कुटुंबांचे नुकसान झाले आहे, अशा कुटुंबांना तात्काळ रोखीने पाच हजार रुपये देऊन उर्वरित रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आलेली आहे.

सद्यस्थितीत सातारा तालुक्‍याच्या दोन गावांमधील 158 कुटुंबे, पाटण तालुक्‍याच्या सात गावांमधील 108 कुटुंबे व जावळी तालुक्‍याच्या तीन गावांमधील 170 अशा एकूण 445 कुटुंबाचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. ज्या कुटुंबांच्या घराचे पूर्ण नुकसान झाले आहे, त्यांना शासनाच्या माध्यमातून घरबांधणीसाठी दोन लाख 67 हजार रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेती पिकाचे नुकसान झाले आहे, त्यांना मदतीसाठी पीक विम्याची अट लागू नाही. त्यांना पूरग्रस्त निधीतून शेती पिकाचा मदत निधी देण्यात येणार आहे.

सातारा तालुक्‍यातील दोन, जावळी तालुक्‍यातील तीन व पाटण तालुक्‍यातील दहा गावांत भूस्खलन झाले आहे. या गावांच्या कायमच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील विविध संस्थांनी, व्यक्तींनी पूरग्रस्तांसाठी मोठी मदत केली आहे. त्यांच्याकडून मिळालेली मदत सातारा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांना दिली आहे. तसेच पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जिल्ह्यातील विविध संस्थांनी 47 लाख 71 हजार 304 रुपये जमा केलेले आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)