Satara: ‘माझं कवितांचं गाव’च्या ई-दिवाळी अंकांचे प्रकाशन
Satara सातारा जिल्हा सरपंच परिषदेचे प्रतिनिधी चंद्रकांत सणस यांनी कवितांच्या गावाच्या उपक्रमांचे कौतुक केले. गावातील जास्तीत जास्त लोकांनी या उपक्रमासाठी सहकार्य करावे. कवितांच्या गावाच्या विकासासाठी गाव सदैव सहकार्य करण्यास तयार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Satara: सार्वजनिक ग्राम वाचनालय, ‘माझं कवितांचं गाव’, जकातवाडी यांचा 34 वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने ‘माझं कवितांचं गाव’च्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या विविध ई-दिवाळी अंकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गावात आयोजित करण्यात आलेल्या सुंदर किल्ले निर्मिती स्पर्धेचे बक्षीस वितरणही करण्यात आले.
या कार्यक्रमात ‘काव्य वैभव’, ‘काव्य शलाका’, ‘काव्य ज्योती’, ‘काव्य दीपोत्सव’ आणि ‘काव्य पुष्प’ या पाच ई-दिवाळी अंकांचे प्रकाशन करण्यात आले. मराठी साहित्य, कविता आणि वाचन संस्कृतीला डिजिटल माध्यमातून व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
यावेळी प्रमुख पाहुणे संजय गोडसे म्हणाले, कवितांचे गाव आणि येथील गीत-संगीत जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी संगीत, कराओके आणि बालकलाकारांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे कविता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतील.
सातारा जिल्हा सरपंच परिषदेचे प्रतिनिधी चंद्रकांत सणस यांनी कवितांच्या गावाच्या उपक्रमांचे कौतुक केले. गावातील जास्तीत जास्त लोकांनी या उपक्रमासाठी सहकार्य करावे. कवितांच्या गावाच्या विकासासाठी गाव सदैव सहकार्य करण्यास तयार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
विश्वास नेरकर यांनी आपल्या मनोगतातून कवितांच्या गावाची संकल्पना, वाटचाल आणि विविध उपक्रमांची माहिती दिली. वाचनालयाचे अध्यक्ष प्रल्हाद पारटे यांनी वाचनालयाच्या 34 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेतला. वाचनालयाच्या माध्यमातून गावात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली.
वाचनालयाचे कार्यवाह नामदेव लोंढे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. नंदकुमार जाधव आणि संजय गोडसे यांनी मुलांना कविता व गीतांचा आनंद दिला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या गाण्यांच्या भेंड्यांमुळे कार्यक्रमात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.याच कार्यक्रमात गावातील मुलांनी तयार केलेल्या सुंदर किल्ल्यांच्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमातून मुलांच्या सर्जनशीलतेला, कल्पकतेला आणि ऐतिहासिक वारशाच्या जतनाला प्रोत्साहन मिळाले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अरुण लोहार तसेच वाचनालयाचे इतर सदस्य आणि ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.वाचन संस्कृतीचा 34 वर्षांचा अखंड प्रवास, कवितांच्या गावाचे साहित्यिक कार्य आणि नव्या डिजिटल साहित्यनिर्मितीचा उत्सव अशा त्रिवेणी संगमातून विद्यावर्धिनी वाचनालयाचा वर्धापन दिन संस्मरणीय ठरला.





