Satara: सातार्याच्या सांस्कृतिक वैभवाला नवी झळाळी; शाहू कला मंदिरासाठी 72 कोटींचा निधी मंजूर
Satara शाहू कला मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विशेष प्रयत्न केले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांनी वैशिष्टयपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन सादर केले होते. या पाठपुराव्यामुळे नगरविकास विभागाने 72 कोटींच्या निधीला प्रशासकीय प्रक्रियेच्या अधीन राहून शासनस्तरावर मंजुरी दिली आहे.

Satara: सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार्या शाहू कला मंदिराच्या पुनर्बांधणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शाहू कला मंदिर नव्याने उभारण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने वैशिष्टयपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत तब्बल 72 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी, 19 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाला. त्यामुळे अनेक वर्षांपासून आधुनिक सांस्कृतिक केंद्राच्या प्रतीक्षेत असलेल्या सातारकरांच्या अपेक्षांची वाटचाल पूर्ण होण्याचा दिशेने सुरु झाली आहे.
शाहू कला मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विशेष प्रयत्न केले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांनी वैशिष्टयपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन सादर केले होते. या पाठपुराव्यामुळे नगरविकास विभागाने 72 कोटींच्या निधीला प्रशासकीय प्रक्रियेच्या अधीन राहून शासनस्तरावर मंजुरी दिली आहे.
नव्या शाहू कला मंदिराची उभारणी केवळ जुन्या वास्तूच्या पुनर्बांधणीपुरती मर्यादित न ठेवता आधुनिक सांस्कृतिक संकुलाच्या स्वरूपात करण्याचे नियोजन आहे. यामध्ये एक हजार प्रेक्षकांची आसनक्षमता असलेले भव्य मुख्य ऑडिटोरियम उभारण्यात येणार आहे. याशिवाय 300 आसनक्षमतेचे स्वतंत्र छोटे ऑडिटोरियमही असणार आहे. त्यामुळे मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांसह नाट्यप्रयोग, व्याख्याने, परिसंवाद, संगीत मैफिली आणि छोट्या स्वरूपाचे कार्यक्रम एकाच ठिकाणी आयोजित करता येणार आहेत.
कलाकारांच्या सोयीसाठी स्वतंत्र ग्रीन रूम, आधुनिक ध्वनी व प्रकाशव्यवस्था, कार्यक्रमांच्या स्वरूपानुसार विकसित केलेला रंगमंच आणि प्रेक्षकांसाठी अद्ययावत बैठक व्यवस्था यांचा प्रकल्पात समावेश करण्याचे नियोजन आहे. रंगमंचाची उभारणी करताना नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आवश्यक असलेल्या शास्त्रीय निकषांचा अभ्यास करून आराखडा तयार केला जाणार आहे. तसेच वाहनांची गर्दी आणि पार्किंगची समस्या टाळण्यासाठी स्वतंत्र अद्ययावत पार्किंग व्यवस्थाही विकसित केली जाणार आहे.
प्रकल्पाच्या खर्चाचा शंभर टक्के हिस्सा राज्य शासनाचा राहणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हाधिकार्यांकडून तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामासाठी निविदा मागविण्यात येणार आहेत. ई-निविदा प्रक्रियेद्वारे काम देणे बंधनकारक असून, कामांच्या गुणवत्तेची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणीही केली जाणार आहे.
शाहू कला मंदिराचे नवे रूप साकारल्यास सातार्याच्या सांस्कृतिक विश्वाला हक्काचे आधुनिक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. स्थानिक कलाकार, नाट्यसंस्था, सांस्कृतिक संघटना आणि विविध सामाजिक संस्थांसाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शिवेंद्रसिंहराजेंकडून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार
शाहू कला मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी 72 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानले आहेत. शाहू कला मंदिर नव्याने उभारण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतला असून, यामुळे सातार्याच्या सांस्कृतिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. आधुनिक सुविधा आणि प्रशस्त सभागृहांमुळे सातारकरांना दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.





