Satara: बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे देणार्या शिक्षकांचा फाटला बुरखा
Satara ऑनलाइन बदली प्रक्रियेत दिलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्याने, प्राथमिक शिक्षण विभागाने 581 शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी जिल्हा रुग्णालय व छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयामार्फत केली. आतापर्यंत सात टप्प्यात 390 पैकी 352 शिक्षकांची तपासणी झाली. त्यामध्ये 72 शिक्षकांची प्रमाणपत्रे अयोग्य ठरली, तर 38 जण तपासणीस गैरहजर होते.

Satara: बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे बदली, पदोन्नती व इतर भत्त्यांचा लाभ घेणार्या प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषदेने जोरदार झटका दिला आहे. प्रमाणपत्रांमध्ये छेडछाड करणार्यांवर गुन्हे दाखल करण्याबरोबर प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे न देता, तपासणीवेळी दांडी मारणार्या शिक्षकांवर मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे देणार्या शिक्षकांचा बुरखा फाटला आहे. आता बदली, पदोन्नती व इतर लाभ घेणार्या प्राथमिक शिक्षकांवर कारवाई सुरू आहे.
ऑनलाइन बदली प्रक्रियेत दिलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्याने, प्राथमिक शिक्षण विभागाने 581 शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी जिल्हा रुग्णालय व छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयामार्फत केली. आतापर्यंत सात टप्प्यात 390 पैकी 352 शिक्षकांची तपासणी झाली. त्यामध्ये 72 शिक्षकांची प्रमाणपत्रे अयोग्य ठरली, तर 38 जण तपासणीस गैरहजर होते. प्रमाणपत्रांबाबत शिक्षण विभागाने नोटीस काढल्यानंतर शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे कारवाई थांबली होती. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने न्यायालयात भक्कम बाजू मांडल्याने, प्रशासनाच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे बोगसगिरी करणार्या शिक्षकांवर कारवाई होणार, हे निश्चित झाले होते.
नऊ शिक्षकांकडे दिव्यांग प्रमाणपत्र व इतर अनुषंगिक कागदपत्रांची वारंवार मागणी करुनही, त्यांनी शिक्षण विभागाकडे कागदपत्रे दिली नाहीत. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनीही कागदपत्रे जमा करण्याचा आदेश दिला होता. हा आदेश न पाळल्याने, नऊ शिक्षकांवर नागराजन यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. शिक्षण विभागाने जिल्हा शासकीय रुग्णालय व पुन्हा आरोग्य उपसंचालक कार्यालय या ठिकाणी दिव्यांग प्रमाणपत्रे व संबंधित शिक्षकांची तपासणी केली. यामध्ये 40 टक्क्यांच्या आत असलेल्यांची पमाणपत्रे अयोग्य ठरवण्यात आली. 0 ते 10 टक्केवारी आलेल्या प्राथमिक शिक्षकांवर कारवाईचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार 13 शिक्षकांची विभागीय चौकशी करुन, सेवासमाप्तीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
10 ते 40 टक्के अपंगत्व आलेल्या 76 शिक्षकांनी घेतलेले बदली, पदोन्नती व इतर लाभ काढून घेण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे दिला आहे. त्यानुसार कारवाई अपेक्षित आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर संबंधित शिक्षकांची दुर्गम क्षेत्रात बदली करण्यात येणार आहे. त्यामुळे बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे विविध लाभ घेणार्यांना दणका बसला आहे. आगामी काळातही ही मोहीम सुरु राहिल्यास प्रामाणिक शिक्षकांना खर्या अर्थाने न्याय मिळेल.
आता ग्रामपंचायत अधिकार्यांवर कारवाई
शिक्षण आणि ग्रामपंचायत विभागात सर्वाधिक बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे लाभ घेण्यात आल्याचे दिसून येत आहे. शिक्षण विभागातील बोगसगिरीवर याशनी नागराजन यांनी कारवाई सुरू केली आहे. ही मोहीम अंतिम टप्प्यात आली असून, आता ग्रामपंचायत अधिकार्यांविरोधात मोहीम सुरु होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अखत्यारितील बोगस प्रमाणपत्रे असलेल्या कर्मचार्यांवरही कारवाई होणार आहे. बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे वापरणार्यांवर वर्षभरात मोठी कारवाई झाल्याने अशा प्रकारांना चाप बसण्यास मदत होणार आहे.





