Top 15 News: एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी-उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, देशातील नंबर 1 मुख्यमंत्री कोण? आणि अभिनेता अनुज ठाकूर यांचे झोपेतच निधन, वाचा टॉप १५ बातम्या
Top 15 News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी-उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल;
म्हणाले, ‘खरी व्होट चोरी २०१९ मध्ये झाली!’
Top 15 News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेस आणि इंडिया आघाडी ‘व्होट चोरी’च्या नावाखाली फेक नॅरेटिव्ह पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. २०१९ मध्ये जनतेने शिवसेना-भाजपला दिलेला जनादेश बदलून काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्यात आली, तेव्हाच खरी व्होट चोरी झाल्याचे शिंदे म्हणाले. ईव्हीएमवर निवडून आलेल्या खासदारांनी राजीनामा देऊन व्होट चोरी सिद्ध करावी, असे आव्हानही त्यांनी दिले. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या योजना आणि निर्णयांचाही उल्लेख केला.
फडणवीस-ठाकरे भेटीवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया;
म्हणाल्या, ‘राजकारणात शत्रुत्व नसतं!’
‘महाराष्ट्राची हास्यरेषा’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर आल्याने चर्चांना उधाण आले. यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राजकारणात शत्रुत्व नसतं, दोन वेगळ्या विचारधारा असतात. वैयक्तिक पातळीवर एकमेकांना शत्रू मानू नये,’ असे त्या म्हणाल्या. दरम्यान, फडणवीस यांनीही ही भेट साहित्य आणि संस्कृतीशी संबंधित असल्याचे स्पष्ट करत याला राजकीय अर्थ काढण्याची गरज नसल्याचे सांगितले.
गोकुळच्या संचालकांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न?
चंद्रकांत पाटलांचे पत्र व्हायरल
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावरून राजकीय संघर्ष सुरू असतानाच मंत्री चंद्रकांत पाटील यांचे पत्र व्हायरल झाले आहे. तीन हजार कोटींपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांवरील शासकीय आणि संस्थेच्या नामनिर्देशित संचालकांची संख्या प्रत्येकी दोनवरून चार करण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. १६ ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रामुळे गोकुळचे संचालक ३३ करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीने १३, तर महायुतीने १२ जागा जिंकल्या आहेत.
गायकवाडांच्या मतदारसंघात ११ वर्षांत २८८ शेतकरी आत्महत्या;
वादग्रस्त विधानानंतर आकडेवारी चर्चेत
शेतकरी आत्महत्यांबाबत वादग्रस्त विधान करणारे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड पुन्हा चर्चेत आले आहेत. २०१५ ते २०२६ या कालावधीत त्यांच्या मतदारसंघातील बुलढाणा आणि मोताळा तालुक्यांत तब्बल २८८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंत्यसंस्काराला कोणीही जाऊ नये, असे विधान गायकवाड यांनी केले होते. अडचण असल्यास आमदार-खासदारांना चिठ्ठी लिहून मदत मागावी, असे आवाहनही त्यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुरासू चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका? ;
१४ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट Top 15 News:
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘मुरासू’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील हवामान बदलण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज राज्यातील १४ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेडसह काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. मंगळवारी पहाटे हे वादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर पावसाची शक्यता वाढली आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी उद्योजकांचा मदतीचा हात;
६ कोटी १८ लाखांचा निधी
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उद्योजकांनी ६ कोटी १८ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ महानाट्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. दरम्यान, देवेंद्र सेवा महोत्सव समितीच्या वतीने दुष्काळग्रस्त गावांसाठी एक हजार पाण्याच्या टाक्या आणि महिलांसाठी ५०० शिलाई मशीन देण्याचा उपक्रम राबवण्यात आला. महानाट्याला सुमारे १५ हजार प्रेक्षक उपस्थित होते.
पदवीधर निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी माझी;
बावनकुळेंची कबुली, काँग्रेसवरही टीका
पदवीधर निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी माझी आहे. या निवडणुकीत आम्ही कमी पडलो, अशी कबुली भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मात्र, या पराभवातून शिकून पुन्हा विजय मिळवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर निशाणा साधत घटनात्मक संस्थांविरोधात अराजकता निर्माण केल्याचा आरोप केला. मतदार याद्यांमधील दुबार आणि बोगस नावे वगळून पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, ५ नोव्हेंबरला नागपुरात काँग्रेसविरोधात आंदोलन होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी होणार आहेत.
उद्घाटनापूर्वीच मान मेट्रो स्टेशनला गळती;
कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह!
शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोच्या लोकार्पणापूर्वीच मान मेट्रो स्टेशनमध्ये पावसाचे पाणी गळू लागल्याचा प्रकार समोर आला आहे. येत्या ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रोचे लोकार्पण होणार आहे. मात्र, त्याआधीच स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पीएमआरडीए आणि टाटा कंपनीने उभारलेल्या मेट्रोच्या कामावरून आता टीका होत असून, संबंधितांवर कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
टोरंट प्रकल्पाविरोधात प्रकाश आंबेडकर मैदानात;
साय डोंगरातील वृक्षतोडीची पाहणी
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साय डोंगर परिसरात टोरंट पॉवर प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विरोध दर्शवला आहे. त्यांनी आज वृक्षतोड झालेल्या भागाची पाहणी करत सरकारच्या विकास धोरणांवर टीका केली. सह्याद्रीचा पर्यावरणीय समतोल, जैवविविधता आणि आदिवासींचे हक्क जपण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. नवीन प्रकल्पांऐवजी धरणांतील गाळ काढून शेतकऱ्यांना देण्यासह छोटे बंधारे उभारण्याचा पर्याय त्यांनी सुचवला. तसेच ग्रामस्थांनी एकजूट होऊन निसर्गाच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
‘शिंदेंना मोदींचे गोडवे गायल्याशिवाय पर्याय नाही’;
विनोद घोसाळकरांचा टोला Top 15 News:
एकनाथ शिंदे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गोडवे गायल्याशिवाय पर्याय नाही, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांनी लगावला. शिंदे यांना दिल्लीत आपले काम दाखवायचे आहे. अन्यथा त्यांचे राजकीय स्थान डळमळीत होऊ शकते, असे ते म्हणाले. शिंदे यांची काम करण्याची पद्धत चांगली असल्याचे सांगतानाच घोसाळकर यांनी त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. राज्य आणि केंद्रात त्यांचीच सत्ता असताना संविधान वाचवण्याची वेळ का आली, याचे स्पष्टीकरण शिंदे यांनी द्यावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
देशातील नंबर 1 मुख्यमंत्री कोण?
सर्वेक्षणात योगी आदित्यनाथ अव्वल
फेम इंडिया मॅगझिन आणि एशिया पोस्टने ‘बेस्ट चीफ मिनिस्टर सर्व्हे 2026’ चे निकाल जाहीर केले आहेत. या सर्वेक्षणात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांना 1,000 पैकी 897 गुण मिळाले आहेत. सुशासन, कायदा-सुव्यवस्था, लोकप्रियता, कार्यक्षमता, नेतृत्व, दूरदृष्टी आणि कार्यशैली अशा 10 निकषांवर मुख्यमंत्र्यांचे मूल्यांकन करण्यात आले. प्रशासकीय पारदर्शकता, निर्णयक्षमता आणि जनसेवेचाही सर्वेक्षणात विचार करण्यात आला. या निकालामुळे योगी आदित्यनाथ यांचे नाव देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून पुढे आले आहे.
आता Whatsॲपवरच तपासा PF बॅलन्स;
EPFO ची नवी सुविधा, जाणून घ्या सोपी प्रक्रिया
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) खातेधारकांसाठी व्हॉट्सॲपवरून पीएफची माहिती मिळवण्याची सुविधा सुरू केली आहे. आता UAN पोर्टलवर लॉगिन न करताही पीएफ बॅलन्स, पासबुक आणि शेवटचे पाच व्यवहार तपासता येणार आहेत. यासाठी UAN शी नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून +91 8796441800 या क्रमांकावर ‘Hi’ किंवा ‘Hello’ असा मेसेज पाठवावा लागेल. त्यानंतर भाषा निवडून OTP द्वारे पडताळणी करावी लागेल. पडताळणीनंतर खात्याची माहिती मिळेल. मात्र, OTP आणि पासवर्ड कोणालाही शेअर करू नका.
फ्लोरिडामध्ये भीषण विमान अपघात;
रस्त्यावर विमान कोसळतानाचा VIDEO व्हायरल
अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये खासगी विमान रस्त्याच्या मध्यभागी कोसळून भीषण अपघात झाला. विमान आदळताच मोठा स्फोट होऊन आगीच्या ज्वाळा पसरल्या. या दुर्घटनेत विमानातील सर्व ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. स्फोटामुळे रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून विमानाचे अवशेष सर्वत्र विखुरले गेले. हा थरारक अपघात कारमधील व्यक्तींनी कॅमेऱ्यात कैद केला. विमान टेक्सासमधील ऑस्टिन विमानतळावरून बहामासच्या दिशेने निघाले होते. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर गंभीर खूश;
म्हणाले, विजय-पराभवावरून कर्णधार ठरवू नका!
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होत असताना प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्याची पाठराखण केली आहे. केवळ विजय-पराभवाच्या आकडेवारीवरून कर्णधाराचे मूल्यमापन करता येणार नाही, असे गंभीर म्हणाले. अनुभवी गोलंदाजांच्या अनुपस्थितीतही अय्यरने चांगले नेतृत्व केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अय्यरने २६ सामन्यांत १४ विजय मिळवले आहेत. तर सूर्यकुमार यादवने ५२ सामन्यांत ४० विजय नोंदवले आहेत. आगामी विश्वचषकासाठी युवा खेळाडूंना संधी देणे आणि त्यांना घडवणे महत्त्वाचे असल्याचेही गंभीर यांनी सांगितले.
मनोरंजन विश्वावर शोककळा!
अभिनेता अनुज ठाकूर यांचे झोपेतच निधन Top 15 News:
मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेता अनुज ठाकूर यांचे वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी निधन झाले आहे. ‘बंधन साथ जनमों का’ आणि ‘धूम मचाओ धूम’ या मालिकांमधून ते घराघरांत पोहोचले होते. झोपेत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचे मित्र आणि कास्टिंग डायरेक्टर रूपेश सोनार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. विशेष म्हणजे, निधनाच्या अवघ्या दहा दिवस आधीच त्यांची भेट झाली होती. अभिनय क्षेत्रात पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. त्यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.





