court: न्यायालयात पीडित, साक्षीदारांसाठी सुविधा हव्यात
Court:

सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची नितांत आवश्यकता असल्याचा सूर
court: खून, ठार मारण्याचा प्रयत्न, अत्याचारासह विविध खटल्यात साक्षीदार साक्ष देण्यासाठी कोर्टात येतात. अनेकप्रसंगी पीडितांनाही हजर रहावे लागते. दररोज अनेक खटल्यांची सुनावणी होत असते. त्यामुळे न्यायालयात उपस्थित राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, जिल्हा व सत्र न्यायालयात थांबण्यासाठी जागा नाही.
त्यांना व कुटुंबियांना कोर्ट रूमबाहेर वाट पाहात थांबावे लागते. कोर्ट रूममध्ये पुकारल्यानंतर हजर रहावे लागते. त्या कालावधीत ते आरोपी, कुटुंबियांच्या नजरेच्या दबाखाली असतात. बैठक व्यवस्थेअभावी कोर्ट रूमच्या बाहेरच आरोपीबरोबर वाट पहावी लागत असल्याने पीडिता व साक्षीदारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
न्यायालयात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा तेथील परिस्थितीचा आढावा.
अनेक समाजविघातक कृत्य, अपघात, अन्याय-अत्याचाराच्या घटना समाजात घडतात. त्यावेळी उपस्थित नागरिक केवळ मूक साक्षीदार बनतात. काही प्रसंगांत पीडिताच्या मदतीला धावण्याची इच्छा असते, पण कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची भीती वाटते. त्यामुळे, पीडितांच्या मदतीस जाण्यास अनेकजण दचकतात. काहीजण धाडसाने पुढे जातात. प्रत्यक्षात न्यायालयात हजर राहिल्यानंतर त्यांना आरोपीसमोर अथवा बाजूला उभे केले जाते. या परिस्थितीमुळे पीडित तसेच साक्षीदारांना आरोपी, कुटुंबियांच्या दबावाच्या सावटाखालून जावे लागते. यामुळे त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होत असते. परिणामी, भीतीअभावी अनेक साक्षीदार फितुर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
न्यायलयात येतानाच अनेक साक्षीदार घाबरलेले असतात. तांत्रिक अडचणीमुळे एकदा आल्यावर काम पूर्ण होत नाही. सुविधा न मिळाल्याने आपणच आरोपी आहे की काय , असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतो. दुर्दैव म्हणजे आरोपींना बसण्यास जागा आहे. मात्र, साक्षीदारांना नाही. ही परिस्थिती बदलली नाही तर भविष्यात कोणीही साक्षीदार होण्यास धजावणार नाही. त्याचा परिणाम न्यायव्यवस्थेच्या कामकाजावर होण्याची शक्यता आहे.
अॅड. गजेंद्र भोयर, शिवाजीनगर न्यायालय, पुणे
न्यायालयात साक्षीदारांना सुरक्षित वाटेल असे वातावरण तयार करणे गरजेचे आहे. पीडित व साक्षीदारांसाठी वेगळी बैठक व्यवस्थेची आवश्यकता आहे. इतर सुविधाही मिळाल्या पाहिजेत. तसे केल्यास न्यायालयीन प्रक्रियेची भीती कमी होईल.
अॅड. अभिषेक हरगणे, फौजदारी वकील





