Top 15 News : रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम ते 6 बडे अधिकारी निलंबित…; वाचा आजच्या 15 टॉप बातम्या
Top 15 News : रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम ते 6 बडे अधिकारी निलंबित...; वाचा आजच्या 15 टॉप बातम्या

1) पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी ग्रामपंचायतीने राज्यातील सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा पहिला पुरस्कार पटकावलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमात नाशिक जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाचा’ शुभारंभही केला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींच्या कामाचे कौतुक केले. पुरस्कार मिळालेल्या ग्रामपंचायतींना स्वतः भेट देऊन विकासकामांची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
2) रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम! ‘आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांशी बोला, नाहीतर…’
पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज अकरावा दिवस आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिलाय. आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांशी चर्चा करून ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा उद्या आंदोलनाचे स्वरूप बदलू शकते, असा इशारा त्यांनी दिला. एमपीएससीचे अध्यक्ष भीमनवार यांना पदावरून हटवण्याची मागणी रोहित पवार यांनी पुन्हा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपेक्षा अध्यक्षांशी असलेल्या मैत्रीला अधिक महत्त्व देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना चुकीची विशेषणे लावून त्यांची बदनामी केली जात असल्याचेही पवार म्हणाले.
3) तुळजाभवानीची ज्योत आणणाऱ्या तीन भाविकांचा अपघातात मृत्यू
नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भीषण अपघात झालाय. धुळे-सोलापूर महामार्गावरील कचनेर फाट्याजवळ भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात तुळजाभवानीची ज्योत घेऊन परतणाऱ्या तीन तरुण भाविकांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. अक्षय राजपूत याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अमोल औटे आणि गोरख म्हसकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुभम अधाने याच्यावर उपचार सुरू आहेत. हे सर्व तरुण खुलताबाद तालुक्यातील रहिवासी होते. दरवर्षीप्रमाणे तुळजापूरहून देवीची ज्योत घेऊन गावाकडे परतताना हा अपघात घडला. अपघातानंतर चालक फरार झाला असून, चिकलठाणा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरलीय.
4) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहा अधिकारी निलंबित; आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवर कारवाई*
पुण्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. उद्योगांना परवाने देताना कथित आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपांवरून ही कारवाई करण्यात आलीय. या प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडालीय. निलंबित अधिकाऱ्यांमध्ये प्रादेशिक अधिकारी बाबासाहेब कुकडे, उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे आणि कार्तिकेय लंगोटे, तसेच क्षेत्रीय अधिकारी सुषमा कुंभार, जयंत डोके आणि अजय खामकर यांचा समावेश आहे. उद्योगांना परवानग्या देण्याच्या मोबदल्यात आर्थिक व्यवहार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारींसोबत व्हिडिओ पुरावेही सादर करण्यात आल्याचे सांगितले जातेय. संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासे मागवण्यात आले होते. हे खुलासे समाधानकारक नसल्याने निलंबनाचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.
5) RNO – तुळजाभवानी मंदिरात २ हजार किलो फुलांची सजावट; मुख्य महाद्वारावर ‘जय जगन्नाथ रथा’ची आकर्षक प्रतिकृती
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून, तुळजापुरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. नवरात्रोत्सवानिमित्त तुळजाभवानी मंदिर आणि परिसराला देशी-विदेशी फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आलीय. पुण्यातील देवीभक्त नानासाहेब पाचुंदकर पाटील यांच्या वतीने ही फुलांची सेवा देवीच्या चरणी अर्पण करण्यात आली आहे. सुमारे दोन हजार किलो फुलांचा वापर करून मंदिर परिसर सजवण्यात आलाय. मंदिराच्या मुख्य शहाजीराजे महाद्वारावर ‘जय जगन्नाथ रथा’ची संकल्पना साकारण्यात आली असून, त्यामध्ये तुळजाभवानी मातेची आकर्षक मूर्ती उभारण्यात आलीय. फुलांच्या या मनमोहक सजावटीमुळे मंदिर परिसराला विशेष देखणेपणा प्राप्त झालाय. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून, संपूर्ण तुळजापूर नगरीत भक्तिमय वातावरण पाहायला मिळतय.
6) RNO – ‘आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेणे लोकशाहीविरोधी’; अंबादास दानवेंचा सरकारला इशारा
सीजेपी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केलीय. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला असून, आंदोलनकर्त्यांना अनधिकृतरीत्या ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. आंदोलनादरम्यान काही चुकीचे घडले असेल, तर कायद्यानुसार कारवाई करावी; मात्र आंदोलन करण्यापासून रोखू नये, अशी भूमिका दानवे यांनी मांडलीय. सरकारच्या वागण्याचे परिणाम सत्ताधाऱ्यांना भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिलाय. दरम्यान, रोहित पवार यांना मुख्यमंत्री करण्याच्या चर्चेवरही दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला. रोहित पवार यांच्या पक्षाचे केवळ दहा आमदार असताना या चर्चेला काय अर्थ, असा सवाल त्यांनी केलाय.
7) RNO – विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी २८ लाखांचा सोन्याचा तुळशीहार
शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी २८ लाख रुपये किमतीचा सोन्याचा तुळशीहार अर्पण करण्यात आलाय. मुंबई येथील विठ्ठलभक्त नीता आणि राजीव रंजन या दाम्पत्याने हा सोन्याचा हार देवाच्या चरणी अर्पण केलाय. या हारावर तुळशीच्या पानांची आकर्षक नक्षी साकारण्यात आली आहे. श्री विठ्ठलाला अर्पण करण्यात आलेल्या सोन्याच्या तुळशीहाराचे वजन १०८ ग्रॅम, तर रुक्मिणी मातेला अर्पण केलेल्या हाराचे वजन ५४ ग्रॅम आहे. दोन्ही हारांची एकूण किंमत सुमारे २८ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. या भक्तिपूर्ण अर्पणाबद्दल श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने दानशूर भाविक दाम्पत्याचा सन्मान करण्यात आला. नवरात्रोत्सवाच्या शुभारंभी विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या या सोन्याच्या तुळशीहाराची पंढरपुरात चर्चा होत आहे.
8) RNO – नांदेडच्या रेणुकादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा भक्तिमय प्रारंभ; पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी!
नांदेडच्या गाडीपुरा परिसरातील श्री क्षत्रिय समाज राजपूत संचलित श्री रेणुकादेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला मोठ्या भक्तिभावात सुरुवात झाली आहे. घटस्थापनेनिमित्त देवीची विशेष पूजा आणि अभिषेक करून विधिवत घटस्थापना करण्यात आली. पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली आहे. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत भाविकांना देवीच्या नऊ रूपांचे दर्शन घेता येणार आहे. यानिमित्त दररोज सायंकाळी भजन, कीर्तन आणि गरबा-दांडियाचे आयोजन करण्यात आलेय. तसेच पंचमीला विशेष रत्नागिरी पदयात्रा काढण्यात येणार असून, या यात्रेत हजारो भाविक सहभागी होतात. रेणुकादेवी नवसाला पावते आणि तिच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आलेय.
9) RNO – जालन्यात दुष्काळाची तीव्रता वाढली; धामणा धरणात केवळ २ टक्के पाणी, रक्षणासाठी पथके तैनात
जालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असून, भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरणात केवळ दोन टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणातून परिसरातील १५ ते २० गावांना पाणीपुरवठा केला जात असल्याने प्रशासनाची चिंता वाढलीय. उरलेला पाणीसाठा पिण्यासाठी सुरक्षित ठेवण्याचे आव्हान निर्माण झालेय. धामणा धरणातील पाणी जपण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना सुरू केल्यात. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार धरण परिसरात मोटार आणि बोअरवेलद्वारे पाणी उपसा करण्यावर निर्बंध घालण्यात आलेत. पथकप्रमुख पी. बी. घुले यांच्या माहितीनुसार, प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकरी आणि नागरिकांनीही पाणी उपसा बंद केला आहे. मात्र, धरणात अवघा दोन टक्के साठा उरल्याने तो परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याची गरज किती काळ भागवू शकेल, हा गंभीर प्रश्न निर्माण झालाय.
10) निवडणूक आयोगात मोठा फेरबदल! IAS प्रकाश राजपुरोहित नवे उप निवडणूक आयुक्त
भारतीय निवडणूक आयोगात महत्त्वाचा प्रशासकीय फेरबदल करण्यात आलाय. २०१० च्या तुकडीतील राजस्थान कॅडरचे आयएएस अधिकारी प्रकाश राजपुरोहित यांची उप निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलीय. केंद्र सरकारच्या नियुक्ती समितीने या नियुक्तीला मंजुरी दिली असून, एप्रिल २०३० पर्यंत ते या पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. प्रकाश राजपुरोहित हे यापूर्वी संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागात सहसचिव म्हणून कार्यरत होते. दरम्यान, देशात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच ही नियुक्ती करण्यात आलीय.
11) जगात तिसऱ्या युद्धाची ठिणगी? यमनमध्ये हुती बंडखोरांवर २४ तासांत १,९०० हल्ले
रशिया-युक्रेन आणि अमेरिका-इराणमधील संघर्ष सुरू असतानाच, यमनमध्ये हुती बंडखोरांविरोधात मोठी लष्करी कारवाई सुरू असल्याची माहिती समोर आलीय. यमन सरकारच्या दाव्यानुसार, गेल्या २४ तासांत विविध भागांत १,९०० हून अधिक हल्ले करण्यात आले. या कारवाईत मोठ्या संख्येने हुती बंडखोर मारले गेल्याचाही दावा करण्यात आलाय. या संघर्षात सौदी अरेबियानेही यमनला मदत केल्याचे वृत्त आहे. यमनच्या सैन्याने हुती बंडखोरांच्या नियंत्रणाखालील काही भाग ताब्यात घेतल्याचा दावा सरकारकडून करण्यात आलाय. बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी परिसरातही संघर्ष सुरू असल्याची माहिती समोर येतेय.
12) भारतात लवकरच 6G होणार सुरू, मिळणार 5 पट जास्त स्पीड
भारतात 5G नेटवर्कचा विस्तार सुरू असतानाच रिलायन्स जिओने आता 6G तंत्रज्ञानाची तयारी सुरू केलीय. नवी दिल्ली येथे झालेल्या इंडिया मोबाइल काँग्रेस 2026 मध्ये जिओने आपले प्री-6G टेक्नॉलॉजी स्टॅक आणि ‘Giga MIMO Radio’ सादर केले. कंपनीच्या दाव्यानुसार, भविष्यातील 6G नेटवर्कमध्ये सध्याच्या 5G पेक्षा पाचपट नेटवर्क क्षमता आणि दहापट कमी लेटन्सी मिळवण्याचे उद्दिष्ट आहे. जागतिक 6G मानके 2030 पर्यंत निश्चित होण्याची शक्यता असून, भारतात त्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात सेवा सुरू करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. मात्र, जिओने व्यावसायिक 6G सेवा सुरू करण्याची निश्चित तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.
13) Royal Enfield ची चिंता वाढणार? या दमदार बाइकची फक्त 4,999 मध्ये बुकिंग सुरु, फिचर्सही शानदार
प्रीमियम रेट्रो बाइक्सच्या चाहत्यांसाठी ट्रायम्फने नवीन बॉनव्हिल T40 सादर केलीय. या बाईकसाठी ४ हजार ९९९ रुपयांत बुकिंग सुरू असल्याचे सांगितले जातेय. क्लासिक लूक आणि आधुनिक फीचर्स हे या बाईकचे प्रमुख आकर्षण आहे. बॉनव्हिल T40 ची एक्स-शोरूम किंमत २ लाख ८० हजार रुपयांपासून, तर बॉनव्हिल T4 ची किंमत २ लाख ५५ हजार रुपयांपासून सुरू असल्याची माहिती आहे. बॉनव्हिल T40 मध्ये ३४९ सीसीचे लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले असून, ते २९ हॉर्सपॉवर आणि ३१.२ न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. इंजिनसोबत ६-स्पीड गिअरबॉक्स, राइड-बाय-वायर तंत्रज्ञान आणि स्लिप-अँड-असिस्ट क्लच मिळतो. सुरक्षिततेसाठी एबीएससह दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक देण्यात आलेत. या बाईकची डिलिव्हरी नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होण्याची शक्यता आहे.
14) अमिताभ बच्चन यांच्या चाहत्याचं सोलापुरात अनोखं सेलिब्रेशन
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरातील एका चाहत्याने अनोख्या पद्धतीने आनंद साजरा केलाय. नौशाद पटेल असं या चाहत्याचं नाव असून, गेल्या अनेक वर्षांपासून ते अमिताभ बच्चन यांचे कट्टर चाहते आहेत. विशेष म्हणजे, लहानपणी आई-वडिलांकडून पैसे न घेता, गोट्या खेळून जिंकलेल्या पैशांतून ते मित्रांसोबत ‘शोले’ चित्रपट पाहायला जात असत. इतकंच नाही, तर अमिताभ बच्चन यांची भेट घेण्यासाठी त्यांनी मुंबईत त्यांच्या घराबाहेर सलग तीन ते चार दिवस प्रतीक्षाही केली होती. आजही महानायकाच्या वाढदिवशी नौशाद पटेल लहान मुलांना पेढे वाटतात आणि अमिताभ बच्चन यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. त्यांच्या या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ चर्चेत आलाय.
15) गोलंदाजीसाठी बूट नव्हते, पण पहिल्याच मॅचमध्ये ५ विकेट्स: हार्दिकच्या वाढदिवशी गर्लफ्रेंडची खास पोस्ट
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या ३३ व्या वाढदिवसानिमित्त त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्माने भावनिक पोस्ट शेअर करत त्याच्या संघर्षाला उजाळा दिला. माहिकाने सांगितले की, हार्दिक वयाच्या १९ व्या वर्षापर्यंत फक्त चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. मित्रांना सरावाची संधी मिळावी म्हणून तो नेट्समध्ये बॉलिंग करायचा. तेव्हा एका वरिष्ठ प्रशिक्षकाची नजर त्याच्यावर पडली. यानंतर हार्दिकने अष्टपैलू म्हणून खेळताना पहिल्याच सामन्यात ५ विकेट्स घेतले; त्यावेळी त्याच्याकडे गोलंदाजीचे साधे बूटही नव्हते. या कामगिरीनंतर दोन वर्षांत आयपीएल आणि अवघ्या सहा महिन्यांत त्याचे भारतीय संघात पदार्पण झाले. (Top 15 News )





