Top 10 News: सुप्रिया सुळेंच्या ६ दिवसांतल्या मोदी-शहांसोबत दुसऱ्या भेटीपासून ते ‘लाफ्टर शेफ्स ३’च्या विजयी जोडी पर्यंतच्या… ,वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News: राजधानी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलंय.

राजकीय घडामोडींना वेग;
सुप्रिया सुळेंची ६ दिवसांत मोदी-शहांसोबत दुसरी भेट
Top 10 News: राजधानी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलंय. अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या भेटीनंतर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणे यांनीही अमित शाह यांची भेट घेतली. गेल्या सहा दिवसांतील सुप्रिया सुळे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासोबतची ही दुसरी भेट आहे. यापूर्वी २२ जुलै रोजी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. या भेटींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय;
‘जेन झी’बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनामुळे देशभरात ‘जेन-झी’ पिढीची चर्चा सुरू असतानाच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नव्या पिढीच्या वाढत्या मोबाईल वापराबाबत चिंता व्यक्त केली आहे. कारगिल विजय दिनानिमित्त भोसला मिलिटरी स्कूलच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, सतत मोबाईलवर स्क्रोल करण्याच्या सवयीमुळे तरुणांच्या विचारक्षमतेवर आणि भावनिक संतुलनावर परिणाम होत असून, एकंदरित ‘केमिकल लोचा’ झाला आहे. बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकासासोबत कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता वाढवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. ‘जेन-झी’ देशाचे भविष्य असले तरी त्यांना समजावणे कठीण झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक;
तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप
पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान बारामतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. राष्ट्रवादी युवती आघाडीच्या अध्यक्षा भाग्यश्री धायगुडे यांनी सभागृहात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस आणि सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. धायगुडे यांनी अनेक वर्षे लग्नाचे आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा दावा केला असून, आपल्याकडे पुरावे असल्याचे म्हटले आहे. घटस्फोटाची कागदपत्रे खोटी असल्याचाही त्यांनी आरोप केला. या प्रकरणाची अधिकृत चौकशी सुरू असून, मंगेश जगताप यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही.
जालन्यात पावसाचा ‘बर्फीला’ घोटाळा!
40 हवामान केंद्रांत छेडछाड, शेतकऱ्यांचा संताप
जालना जिल्ह्यातील स्वयंचलित हवामान केंद्रांमध्ये पर्जन्यमापनाच्या नोंदींशी छेडछाड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील 49 पैकी तब्बल 40 केंद्रांमध्ये चार वेळा गैरप्रकार झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी दिली. प्रत्यक्षात पाऊस नसतानाही पर्जन्यमापकांवर बर्फाचे तुकडे ठेवून आणि यंत्रांच्या रिंग तोडून खोट्या पावसाच्या नोंदी करण्यात आल्याचे तपासात उघड झाले. या नोंदींवर शेतकऱ्यांचे नियोजन, पीक विमा आणि शासकीय मदत अवलंबून असल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. पाच पोलीस ठाण्यांत नोंदी करण्यात आल्या असून, हवामान केंद्रांवर सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार;
कोकण, घाटमाथा,विदर्भाला ‘येलो अलर्ट’ Top 10 News:
राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता असून, हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह पुणे, सातारा व कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीतही जोरदार पाऊस पडू शकतो. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रातील चक्राकार वारे आणि बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या प्रणालीमुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बिहार सरकारची अखेर माघार,
आंदोलकांवरील गुन्हे मागे
नीट यूजी पेपरफुटीविरोधातील आंदोलनानंतर बिहार सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. गृह विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, 26 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलनासंदर्भात दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या व्यक्तींना तातडीने मुक्त करण्यात येणार असून, आंदोलनात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी असलेल्यांवर भविष्यात कोणतीही दंडात्मक अथवा कायदेशीर कारवाई केली जाणार नाही. आंदोलनादरम्यान सुमारे 355 जणांना तुरुंगात पाठवण्यात आले होते. बिहार सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थी आणि आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अखेरच्या व्याख्यानाच्या ठिकाणी ‘कलाम सर’चा पुतळा;
IIM शिलाँगची अनोखी आदरांजली
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ११ व्या पुण्यतिथीनिमित्त आयआयएम शिलाँग येथे त्यांच्या ८ फूट उंच कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. ‘बोर्ड ऑफ गव्हर्नर्स’चे अध्यक्ष शिशिर कुमार बाजोरिया यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. डॉ. कलाम यांनी याच संस्थेत ‘आपला ग्रह अधिक राहण्यायोग्य कसा बनवावा’ या विषयावर अखेरचे व्याख्यान दिले होते. त्यांच्या दूरदर्शी विचारांना आणि शिक्षण, विज्ञान, नवकल्पना व नैतिक नेतृत्वातील योगदानाला आदरांजली म्हणून हा पुतळा उभारण्यात आला आहे. यावेळी संस्थेचे अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी पुष्पार्पण करून ‘कलाम सर’ यांना अभिवादन केले.
52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब,
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड
देशात आत्मनिर्भरतेची चर्चा सुरू असताना कोट्यवधी भारतीयांना संतुलित आणि पौष्टिक आहार परवडत नसल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या ‘स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड 2026’ अहवालातून समोर आले आहे. देशातील सुमारे 52 कोटी नागरिकांच्या आहारातून फळे, भाज्या, डाळी आणि प्रथिनयुक्त पदार्थ दूर असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतात पौष्टिक आहारासाठी दररोज सुमारे 343 रुपये खर्च येतो. कुपोषण कमी करण्यात प्रगती झाली असली, तरी मुलांमधील ठेंगणेपणा आणि वयोवृद्धांमधील लठ्ठपणा ही नवी आव्हाने आहेत. सरकारने स्वस्त धान्याचा हक्क दिला असला, तरी पौष्टिक आहाराकडे लक्ष देण्याची गरज वाढली आहे.
शर्मिला धनखरने इतिहास रचला…
पॅरा शॉटपुट पुटमध्ये सुवर्ण कामगिरी
भारताच्या शर्मिला धनखरने ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या शॉटपुट F57 प्रकारात ९.८१ मीटरचा हंगामातील सर्वोत्तम थ्रो करत सुवर्णपदक जिंकले. तिच्या या कामगिरीमुळे पॅरा-ॲथलेटिक्समधील राष्ट्रकुल पदकाची भारताची २० वर्षांची प्रतीक्षा संपली. याच स्पर्धेत भारताच्या शिल्पा शायलाने ७.२६ मीटरचा वैयक्तिक सर्वोत्तम थ्रो करत कांस्यपदक पटकावले. पुरुषांच्या ७९ किलो वेटलिफ्टिंगमध्ये वल्लुरी अजय बाबूने ३३० किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले. तो केवळ एका किलोने सुवर्णपदकापासून दूर राहिला. या कामगिरीनंतर भारताच्या पदकांची संख्या १० वर पोहोचली असून, त्यात दोन सुवर्णपदकांचा समावेश आहे.
‘लाफ्टर शेफ्स ३’चा ग्रँड फिनाले थाटात पार
अली गोनी-जन्नत जुबैर जोडी विजयी Top 10 News:
भारती सिंह होस्ट करत असलेल्या लोकप्रिय कॉमेडी कुकिंग शो ‘लाफ्टर शेफ्स ३’चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. रोहित शेट्टी आणि ‘खतरों के खिलाडी’च्या स्पर्धकांच्या उपस्थितीमुळे अंतिम सोहळ्याची रंगत आणखी वाढली. अली गोनी आणि जन्नत जुबैर ही जोडी शोची विजेती ठरली. अलीचा स्वयंपाकातील आत्मविश्वास आणि जन्नतची शिकण्याची तयारी यामुळे ही जोडी प्रेक्षकांची पसंती मिळवण्यात यशस्वी ठरली. वृत्तानुसार, विजेत्यांना रोख बक्षीस देण्यात आले नाही. त्याऐवजी ‘रिअलमी १६’ सिरीजचे स्मार्टफोन आणि ब्रँड पार्टनर्सकडून विविध भेटवस्तू देण्यात आल्या.





