Top 10 News : ‘हे दळभद्री सरकार बदलल्याशिवाय थांबू नका’, आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन आणि कॉन्सर्टमध्ये जस्मिन सँडलाससोबत गैरवर्तन?, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईतील आंदोलनात उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

‘हे दळभद्री सरकार बदलल्याशिवाय थांबू नका’ ;
वांगचुकांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
Top 10 News : सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईतील आंदोलनात उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. रोजगार, शिक्षण आणि तरुणांचे भविष्य सरकारने हिरावल्याचा आरोप करत हे सरकार बदलण्याचे आवाहन त्यांनी केले. वांगचुक यांनी देशासाठी मोठे योगदान दिले असून त्यांच्याशी सरकारने संवाद साधावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत पाकिस्तानशी चर्चेची भाषा करणारे सरकार वांगचुकांशी मात्र बोलत नसल्याचा आरोप केला. मोदी सरकारने हिंमत असेल तर निवडणुका जाहीर कराव्यात, असे आव्हानही त्यांनी दिले. (Top 10 News)
भाजपचा DNA आता ओबीसींचा नाही, कारखानदारांचा’;
लक्ष्मण हाकेंची टीका, ‘ओबीसी जनता पार्टी’ची घोषणा
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ‘ओबीसी जनता पार्टी’ या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आगामी निवडणुका लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपवर टीका करत, पक्षाचा डीएनए आता ओबीसींचा नसून कारखानदारांचा झाल्याचा आरोप केला. शिवसेना व राष्ट्रवादीतील फोडाफोडीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून फोडाफोडीचे राजकारण थांबवावे, अशी मागणी त्यांनी केली. राष्ट्रवादीनेही ओबीसींसाठी ठोस काम केले नसल्याचा आरोप हाके यांनी केला. (Top 10 News)
मध्य महाराष्ट्रात मुसळधार सरींचा इशारा;
पुणे-सातारा घाटमाथ्यावर येलो अलर्ट
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून आज पावसाचा जोर काहीसा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलक्या ते जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली येथे विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी शेतीची कामे नियोजनपूर्वक करावीत आणि घाटरस्त्यांवर प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात;
ट्रकची कारला जोरदार धडक, ६ जणांचा जागीच मृत्यू
वर्ध्यातील समृद्धी महामार्गावर विरूळ इंटरचेंजजवळ ट्रकने कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. पुण्यावरून मुलीचे प्रवेश घेऊन नागपूरकडे निघालेल्या कुटुंबातील कारचालकासह तिघांचा, तर ट्रकचालक आणि क्लीनरचाही मृत्यू झाला. यापूर्वी इथेनॉलचा ट्रक पलटल्याने वाहतूक वळवण्यात आली होती. त्याचवेळी भरधाव ट्रकने थांबलेल्या वाहनांना धडक दिली. अपघातात कारचा चुराडा झाला, ट्रकला आग लागली आणि महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पोलिस तपास करत आहेत.
आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन ;
राम मंदिर दान चोरी आणि NEET वरून विरोधक आक्रमक Top 10 News
संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत असून सरकार FCRA, आयकर, MSME, जन्म-मृत्यू नोंदणी, सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश संख्या आणि ‘वंदे मातरम’ संरक्षणासह सहा महत्त्वाची विधेयके मांडणार आहे. बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे एनडीएचे संख्याबळ वाढल्याने सरकार आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे विरोधक राम मंदिर दान चोरी प्रकरण, NEET पेपरफुटी, सोनम वांगचुक यांचे आंदोलन आणि इंधन धोरण यांसारख्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची रणनीती आखत आहेत. त्यामुळे अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे बंद, बॅरिकेड्स हटवले…
जंतरमंतरवरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ
सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात हलवल्यानंतर अभिजीत दिपके यांनी सहकाऱ्यांसह आमरण उपोषण सुरू ठेवल्याने जंतरमंतरवरील आंदोलन कायम आहे. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले असून बॅरिकेड्स हटवण्यात आल्याने पोलिसी कारवाईची चर्चा सुरू झाली आहे. आंदोलकांनी पोलिसांकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत शांतता राखण्याचे आवाहन केले. जंतरमंतर परिसरात मोठा पोलीस व निमलष्करी बंदोबस्त, मोबाईल जॅमर्स आणि वॉटर कॅनन तैनात करण्यात आल्याने संसद मोर्च्यापूर्वी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
‘या ३ अटी मान्य झाल्या तरच उपोषण मागे’ ;
सोनम वांगचूक यांचा केंद्र सरकारला इशारा
दिल्लीच्या जंतरमंतरवरील आमरण उपोषणादरम्यान पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात हलवलेल्या सोनम वांगचूक यांनी सोमवारी महत्त्वाचे ट्विट करत उपोषण मागे घेण्यासाठी तीन अटी मांडल्या. नीट पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींची जबाबदारी केंद्राने स्वीकारावी, त्यांना व सीजेपीचे प्रमुख अभिजीत दिपके यांना संसदेत जाऊन खासदारांशी संवाद साधू द्यावा, किंवा तब्येत ठीक नसल्यास खासदारांनी रुग्णालयात येऊन लेखी आश्वासन द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. आपण रुग्णालयात अनधिकृतपणे ताब्यात असून हालचाली व संपर्कावर निर्बंध असल्याचाही दावा त्यांनी केला. त्यामुळे आता सरकार यावर काय निर्णय घेणार हे पाहणं गरजेचं आहे.
‘इराण व्हेनेझुएला नाही’;
अमेरिकेला अब्बास अराघची यांचा थेट इशारा
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेला इशारा देत इराण कधीही व्हेनेझुएलाप्रमाणे शरणागती पत्करणार नसल्याचे स्पष्ट केले. रशियन माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांच्याशी झालेल्या अणु कार्यक्रमावरील चर्चेचा उल्लेख केला. चर्चेदरम्यान बॉम्बहल्ल्याच्या धमकीच्या छायेत वाटाघाटी कराव्या लागल्या का, असा प्रश्न त्यांनी विटकॉफ यांना विचारल्याचे सांगितले. इराणने या संपर्काला औपचारिक चर्चा मानण्यास नकार दिला असून अमेरिकेच्या दबावाला झुकणार नसल्याची ठाम भूमिका पुन्हा अधोरेखित केली.
स्पेननं दुसऱ्यांदा कोरलं विश्वचषकावर नाव
पराभवानंतर भर मैदानात मेस्सीला अश्रू अनावर
स्पेनने अर्जेन्टिनाचा १-० असा पराभव करत तब्बल १६ वर्षांनंतर दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक जिंकला. अमेरिकेतील न्यूजर्सीच्या मेटलाईफ स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात निर्धारित ९० मिनिटे गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर अतिरिक्त वेळेतील १०६व्या मिनिटाला बदली खेळाडू फेरान टॉरेसने निर्णायक गोल केला. या विजयासह स्पेन पुन्हा जगज्जेता ठरला. कर्णधार रॉड्रिगोने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फिफा अध्यक्ष गियानी इन्फान्टिनो यांच्या हस्ते विश्वचषक स्वीकारला. पराभवानंतर सलग दुसऱ्या विजेतेपदाचे स्वप्न भंगल्याने अर्जेन्टिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी भावूक होऊन भर मैदानात रडताना दिसला.
कॉन्सर्टमध्ये जस्मिन सँडलाससोबत गैरवर्तन?
व्हायरल व्हिडिओनंतर चाहत्यांमध्ये संताप Top 10 News :
पंजाबी गायिका जस्मिन सँडलासच्या डेहराडून याठिकाणी कॉन्सर्टनंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये त्या चाहत्यांकडून फुले स्वीकारण्यासाठी स्टेजजवळ आल्यावर गर्दीने त्यांना वेढल्याचे दिसते. सोशल मीडियावरील काही पोस्टमध्ये गर्दीतील काही व्यक्तींनी त्यांच्याशी अयोग्य वर्तन केल्याचा दावा करण्यात आला आहे. या दाव्याची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही. व्हिडिओनंतर चाहत्यांनी संताप व्यक्त करत कलाकारांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले असून, कार्यक्रमांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.




