Top 10 News : “२०१९ ला आमचा प्रेमभंग, दुसरं लग्न झालं, संसार थाटला”, बालभारतीच्या पाठ्यपुस्तकावर मोदींच्या गुजरातची छाप आणि आयसीसी रँकिंगमध्ये सर्वात मोठा उलटफेर
Top 10 News : ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही हे ऑपरेशन देवेंद्र आहे. देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान होण्यात एकनाथ शिंदे अडसर ठरू शकतात म्हणून निवडणूक नसताना फोडाफोडी झाली असं खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं.

“२०१९ ला आमचा प्रेमभंग, दुसरं लग्न झालं, संसार थाटला”
देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना खास शैलीत उत्तर
Top 10 News : ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही हे ऑपरेशन देवेंद्र आहे. देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान होण्यात एकनाथ शिंदे अडसर ठरू शकतात म्हणून निवडणूक नसताना फोडाफोडी झाली असं खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली नव्हती आता मात्र देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं आहे. फडणवीस यांनी याविषयी बोलताना,”हे सगळं प्रेम मला २०१९ ला हवं होतं. तेव्हा प्रेमभंग झाला आहे, आता प्रेम जुळणं कठीण आहे. प्रेमभंगानंतर आम्ही दुसरं लग्न केलं, संसार थाटला, लग्नाचे वाढदिवस झाले आता काय राहिलं? असं म्हणत उद्धव ठाकरेंना उत्तर दिलंय.
पायाखालची वाळू सरकलेल्या लोकांकडून माझी बदनामी
सुनिल शिंदेंचं स्पष्टीकरण
स्वार्थी राजकारणासाठी झालेल्या अलीकडील पक्षप्रवेशानंतर मुंबई, वरळी आणि राज्यभरातील मतदार तसेच निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप असल्याचा दावा ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी केला. नाव न घेता त्यांनी विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्यावर निशाणा साधला. मागील सात वर्षांत पक्षप्रमुखांनी आमदारकीसह अनेक महत्त्वाची पदे आणि जबाबदाऱ्या दिल्यानंतरही केवळ स्वार्थासाठी गद्दारी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. समाजमाध्यमांवरही या निर्णयाचा निषेध होत असल्याचे शिंदे म्हणाले. तसेच काही जण माझी राजकीय बदनामी करून शिवसैनिक आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
बालभारतीच्या पाठ्यपुस्तकावर मोदींच्या गुजरातची छाप
पाच लोकनृत्य प्रकारांपैकी चार बाहेरची..
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारतीमार्फत मराठी विषयाची इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी व सहावी या नवीन पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे. यात अनेक चुका असल्याचे उघड झाले. त्यानंतर आता बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील लोकनृत्य या धड्यात महाराष्ट्रातील लोकनृत्यांपेक्षा इतर राज्यांतील लोकनृत्यांना अधिक स्थान देण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटलंय. पाच लोकनृत्य प्रकारांचा समावेश असलेल्या या धड्यात केवळ एका महाराष्ट्रातील लोकनृत्याचा, तर चार महाराष्ट्राबाहेरील लोकनृत्यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आला आहे. यावरून शिक्षण क्षेत्रातील काही अभ्यासक आणि सांस्कृतिक जाणकारांनी नाराजी व्यक्त केलीय.
राज्यभरात कोसळधारा…!
पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
राज्यात पुढील चार दिवस जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असून मराठवाड्यातील काही भागांमध्येही जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून बहुतांश भागांत मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून काही भागांत अतिवृष्टी होण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
नायरा एनर्जीनंतर सरकारी कंपन्यांचा मोठा निर्णय,
पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर
खासगी तेल विपणन कंपनी नायरा एनर्जीने १ जुलैपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करून ग्राहकांना दिलासा दिला आहे. कंपनीने देशभरातील आपल्या सुमारे ७,००० पेट्रोल पंपांवर पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ५ रुपये, तर डिझेलच्या दरात ३ रुपयांची कपात केली आहे. नायराच्या या निर्णयानंतर सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्यांनीही पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. त्यामुळे इंधन दरांबाबत ग्राहकांचं लक्ष आता सरकारी कंपन्यांच्या किंमतींकडे लागले असून, येत्या काळात आणखी दरकपात होणार का? हे पाहणं गरजेचं आहे.
मुख्यमंत्री, पंतप्रधानांनाही पद गमवावं लागणार?
सरकार नवा कायदा आणणार ?
केंद्र सरकारकडून कथित “१३० वी घटनादुरुस्ती” आणण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. संसदीय समिती गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी ठरलेल्या आणि सलग ३० दिवस तुरुंगात राहिलेल्या पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना पदावरून हटवण्याबाबत तरतूद असलेला मसुदा विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. या संभाव्य तरतुदीमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी राजकीय सूडासाठी कायद्याचा गैरवापर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. तर सरकारच्या भूमिकेबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. गैरवापर टाळण्यासाठी काही सुधारणा आणि संरक्षणात्मक तरतुदी सुचवण्याची शक्यता संसदीय समितीकडून व्यक्त होत असल्याची चर्चा सुरू आहे.
EPFO चा मोठा निर्णय!
आजपासून PF क्लेम,पासबुक डाउनलोड बंद
कर्मचारी भविष्य निधी संघटना सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. EPFO ने ऑनलाइन सेवांच्या देखभालीचा कालावधी आणखी एका दिवसाने वाढवला आहे. त्यामुळे पीएफ क्लेम दाखल करणे, पासबुक डाउनलोड करणे, क्लेमची स्थिती तपासणे आणि इतर ऑनलाइन सेवा सध्या उपलब्ध नसतील. EPFO च्या माहितीनुसार, या सेवा १ जुलै २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत बंद राहतील. त्यानंतर २ जुलै २०२६ रोजी रात्री १२ वाजल्यापासून सेवा पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. नियोजित देखभाल मोहिमेमुळे लाखो कर्मचारी, पेन्शनधारक आणि पीएफसंबंधित ऑनलाइन सेवांवर अवलंबून असलेल्या संस्थांना तात्पुरता फटका बसला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला अल्टिमेटम
पनामा कालव्यावरून दोन्ही देशात ठिणगी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पनामा कालव्यावरील नियंत्रण सोडणे ही अमेरिकेची मोठी चूक असल्याचे म्हटले आहे. थिओडोर रुझवेल्ट प्रेसिडेंशियल लायब्ररीच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना त्यांनी पनामाने कालव्याचे नियंत्रण मिळाल्यानंतर जहाजांवरील वाहतूक शुल्क अनेक पटींनी वाढवून मोठा नफा कमावल्याचा आरोप केला. तसेच चीन या महत्त्वाच्या जलमार्गावर आपला प्रभाव वाढवत असल्याचा दावाही त्यांनी केला. अमेरिका असे होऊ देणार नाही, असे स्पष्ट करत ट्रम्प यांनी पनामा कालव्यावरील नियंत्रण कधीही सोडायला नको होते, असे मत व्यक्त केले.
आयसीसी रँकिंगमध्ये सर्वात मोठा उलटफेर;
अभिषेक शर्मानं पहिला नंबर गमावला
आयसीसी टी २० रँकिंगमध्ये मोठा फेरबदल झाला आहे. बऱ्याच काळापासून अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक शर्माला मोठा धक्का बसला आहे. त्यानं अव्वल स्थान गमावलं आहे. त्याची जागा भारताच्या युवा खेळाडूनं घेतली आहे. विस्फोटक फलंदाज इशान किशन हा पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. तर भारतीय संघातून वगळलेल्या सूर्यकुमार यादवलाही मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे टॉप १० मधील स्थानही धोक्यात आले आहे. अभिषेक शर्मा हा पहिल्या स्थानी होता. मात्र, त्याचं स्थान घसरलं आहे. एका स्थानाचं नुकसान होऊन तो दुसऱ्या स्थानी घसरला. भारत विरुद्ध इंग्लंड या मालिकेच्या दरम्यान यात आणखी बदल होण्याची शक्यता आहे.भारत विरुद्ध आयर्लंड टी २० मालिका संपल्यानंतर इंग्लंडविरुद्धची मालिका सुरू होण्याआधी आयसीसीने रँकिंग जाहीर केली आहे. त्यात हे बदल पाहायला मिळाले.
यशच्या ‘टॉक्सिक’मध्ये ग्लॅमरचा तडका;
नयनतारा, कियारासह पाच अभिनेत्रींची दमदार एंट्री
दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या बहुप्रतिक्षित ‘टॉक्सिक: अ फेरीटेल फॉर ग्रोन-अप्स’ चित्रपटाचा नवा ‘लेडीज अँड लेडीज’ टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये नयनतारा, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, रुक्मिणी वसंत आणि तारा सुतारिया या पाच प्रमुख अभिनेत्रींची दमदार झलक पाहायला मिळते. याआधी चित्रपटाच्या प्रचारात यशच्या भूमिकेवर भर देण्यात आला होता. मात्र, नव्या टीझरमध्ये महिला कलाकारांच्या स्टायलिश आणि धडाकेबाज एन्ट्रीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रत्येक अभिनेत्रीचा वेगळा लूक, बॉडी लँग्वेज आणि स्क्रीन प्रेझेन्स चित्रपटातील त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेची झलक देत असून, सोशल मीडियावर टीझरची जोरदार चर्चा रंगली आहे.





