Top 10 News : आदित्य ठाकरेंचं वरळी विधानसभेतलं आव्हान वाढलं? , राज्यात पुढचे ४ दिवस महत्वाचे आणि एम्बापेच्या नावावर अनोखा विक्रम, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्याने वरळी विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.

सचिन अहिरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश;
आदित्य ठाकरेंचं वरळी विधानसभेतलं आव्हान वाढलं?
Top 10 News : विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्याने वरळी विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. वरळीत प्रभाव असलेल्या अहिर यांच्या जाण्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्यासमोरील आव्हान वाढल्याचे मानले जात आहे. 2019 मध्ये आदित्य ठाकरे यांचा विजय निश्चित करण्यासाठी शिवसेनेने सचिन अहिर यांना पक्षात घेतले होते. त्यानंतर 2022 मध्ये त्यांना विधान परिषदेची आमदारकीही देण्यात आली. 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये अहिर यांच्या संघटनात्मक ताकदीचा आदित्य ठाकरे यांना फायदा झाल्याचे बोलले जाते. 2024 मध्ये शिंदे शिवसेनेकडे स्थानिक उमेदवार नसल्याने मिलिंद देवरा यांना आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली होती.
पर्यटकांनी पाण्यात उतरल्यास थेट तुरुंगात जावं लागणार
गोवा सरकारकडून कडक नियम लागू
गोव्यात पर्यटनासाठी जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वाढत्या पावसामुळे धबधबे, नद्या आणि इतर जलस्थळांवर होणारे अपघात टाळण्यासाठी गोवा सरकारने कडक निर्णय घेतला आहे. उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त आदेश जारी करत पुढील 60 दिवसांसाठी धबधबे, नद्या, तलाव आणि नैसर्गिक पाण्याच्या ठिकाणी पाण्यात उतरणे, पोहणे, आंघोळ करणे, तसेच सेल्फी काढण्यास बंदी घातली आहे. पर्यटकांना परिसरात फिरण्याची परवानगी असेल, मात्र पाण्याच्या प्रवाहात किंवा नदीपात्रात उतरणाऱ्यांविरोधात थेट कायदेशीर गुन्हा दाखल केला जाणार आहे. अलीकडील अपघात आणि मृत्यूच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने हा तात्पुरता निर्णय लागू केला आहे.
राज्यात धो-धो पाऊस!
पुढचे ४ दिवस महत्वाचे
मुंबईसह महाराष्ट्रात मान्सून चांगलाच सक्रिय झाला आहे. गेल्या काही तासांत मुंबईच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला आहे. मुंबईतल्या अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. आजपासून ते ४ जुलैपर्यंत या भागात जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.दर्भ आणि मराठवाड्याला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला आणि बुलडाणा या ५ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर अमरावती, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात प्रशासकीय फेरबदल!
3 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्यातील 3 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत. सामान्य प्रशासन विभागाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेल्या या नवीन नियुक्तीनुसार नांदेड, लातूर आणि मुंबई येथील महत्त्वपूर्ण पदांवर नवीन सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, लातूर महानगरपालिकेचे आयुक्त राहुल कुलकर्णी आणि मुंबईतील महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अशोक करंजकरांचा समावेश आहे. राज्य शासनाने या तिन्ही आयएएस अधिकाऱ्यांना आपल्या जुन्या पदांचा कार्यभार सोपवून, नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत.
आमदाराचा तडकाफडकी राजीनामा;
१११ आमदार असलेल्या पक्षात खळबळ
उत्तर प्रदेशातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कांठ मतदारसंघाचे आमदार कमाल अख्तर यांनी विधिमंडळातील मुख्य प्रतोद (चीफ व्हिप) पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेतल्याचे अख्तर यांनी स्पष्ट केले. “पक्षाच्या आदेशाचे पालन करणे हे आमचे कर्तव्य आहे,” असे त्यांनी सांगितले. अलीकडेच अख्तर आणि खासदार रुची वीरा यांच्यात मतभेद असल्याची चर्चा होती. हा वाद मिटवण्यासाठी अखिलेश यादव यांनी दोघांची बैठकही घेतली होती. मात्र त्यानंतर अचानक झालेल्या राजीनाम्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी पक्षात जाणार असल्याच्या चर्चांनाही जोर आला आहे.
पेट्रोल-डिझेल खरेदीवरील निर्बंध हटवले
आजपासून नवीन नियम लागू होणार Top 10 News :
आखाती देशांतील तणावामुळे गेल्या काही महिन्यांत इंधनपुरवठ्यावर परिणाम झाला होता. मात्र परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत असून केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल खरेदीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आजपासून मोठ्या व्यावसायिक खरेदीदारांवरील इंधन खरेदीची मर्यादा हटवण्यात आली आहे. यापूर्वी ठरावीक मर्यादेपेक्षा अधिक पेट्रोल-डिझेल खरेदीवर निर्बंध होते. आता हे निर्बंध रद्द करण्यात आल्याने व्यावसायिकांना पेट्रोल पंपांवरून कोणत्याही मर्यादेशिवाय इंधन खरेदी करता येणार आहे. या निर्णयामुळे उद्योग, वाहतूक आणि इतर व्यावसायिक क्षेत्रांना मोठा दिलासा मिळणार असून इंधन पुरवठा अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी कपात
183 रुपयांची घसघशीत कपात
व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी 19 किलोच्या सिलेंडरच्या किमतीत 183.50 रुपये, तर 5 किलोच्या सिलेंडरमध्ये 13 रुपयांची कपात जाहीर केली आहे. नव्या दरांनुसार दिल्लीत 19 किलोचा सिलेंडर 2,930 रुपये, तर 5 किलोचा सिलेंडर 808.50 रुपयांना मिळणार आहे. हे नवे दर बुधवारी सकाळपासून लागू झाले आहेत. गेल्या काही महिन्यांत व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत सातत्याने वाढ झाली होती. इंधन पुरवठ्यातील अडचणींमुळे हॉटेल आणि इतर व्यावसायिकांना मोठा फटका बसला होता. अशा परिस्थितीत झालेली ही दरकपात व्यावसायिकांसाठी काही प्रमाणात दिलासादायक ठरणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का
जन्मत: नागरिकत्वाचा अधिकार कायम
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का देणारा निर्णय अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. न्यायालयाने जन्मतः नागरिकत्व देणारा घटनात्मक अधिकार कायम ठेवलाय. न्यायालयाने प्रशासनाच्या भूमिकेला दिलासा न देता, अमेरिकेत जन्मलेल्या पात्र बालकांना नागरिकत्वाचा अधिकार अबाधित राहील, असे स्पष्ट केले. या निर्णयामुळे ट्रम्प यांच्या स्थलांतर धोरणाला मोठा धक्का मानला जात आहे. जन्मतः नागरिकत्वाचा अधिकार अमेरिकेच्या संविधानातील 14व्या दुरुस्तीवर आधारित असून, त्यात कोणताही बदल करण्यासाठी घटनात्मक प्रक्रिया आवश्यक असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. या निर्णयाची देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
फ्रान्सने स्वीडनला ३-० ने केले पराभूत;
एम्बापेच्या नावावर अनोखा विक्रम
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील राउंड ऑफ ३२ फेरीतील सामने रंगतदार होत आहेत. जर्मनी, नेदरलँड्स सारखे मोठे संघ स्पर्धेतून बाहेर जात असताना फ्रान्सने मात्र आपले आव्हान अद्याप कायम ठेवले आहे. राउंड ऑफ ३२ मध्ये फ्रान्सची लढत स्वीडन संघाशी झाली. हा सामना ३-० ने फ्रान्सने सहज जिंकला. या विजयचा शिल्पकार ठरला फ्रान्सचा स्टार खेळाडू, कर्णधार किलियन एम्बापे. न्यूयॉर्क न्यूजर्सी येथे झालेल्या सामन्यात तीनपैकी दोन गोल एकट्या एम्बापेने केले. या सामन्यानंतर एम्बापेने बाद फेरीत सर्वाधिक गोल करण्याचा विश्वविक्रमही आपल्या नावावर केला आहे.
मराठी रंगभूमीवरच्या ‘बाई’ काळाच्या पडद्याआड,
रंगकर्मी विजया मेहता यांचं वृद्धापकाळानं निधन Top 10 News :
मराठी रंगभूमी आणि समांतर सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका, अभिनेत्री विजया मेहता यांचं वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजया मेहता यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय. त्यांच्या निधनानं मराठी नाट्यविश्वावर शोककळा पसरली असून, एका युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे. विजयाताई आधुनिक मराठी रंगभूमीच्या आघाडीच्या प्रवर्तक असून ‘रंगायन’ चळवळीच्या अध्वर्यू होत्या. आशय आणि मांडणीचे अर्थगर्भ प्रयोग करणं ही त्यांची खासीयत होती. आधुनिक मराठी रंगभूमी आणि समांतर सिनेमातील प्रख्यात व्यक्तिमत्त्व असलेल्या विजया मेहता यांना नाट्यक्षेत्रात ‘बाई’ म्हणून आदरानं ओळखलं जायचं. विजया मेहता यांना नाट्यदर्पण पुरस्कार, पद्मश्री, महाराष्ट्र सरकारचा नटवर्य प्रभाकर पणशीकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय.





