Top 10 News : ‘पुरावेच लागतात ना?,अंधभक्तांनो घ्या आता पुरावे”, कोयना धरणाला मिळाली नवी ओळख आणि ‘रामायण: पार्ट 1’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज ,वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News :

‘पुरावेच लागतात ना?,अंधभक्तांनो घ्या आता पुरावे”
रोहित पवारांचा पुन्हा खळबळजनक आरोप
Top 10 News : नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणावर देशभर वाद सुरू असतानाच आमदार रोहित पवार यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कथित गैरप्रकाराचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर प्रेसनोट शेअर करत पैसे घेऊन बनावट गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्र देण्याचा प्रकार उघड झाल्याचा दावा केला. प्रेसनोटनुसार वित्त व लेखा विभागातील कर्मचारी रमेश मुखेकर यांनी एका विद्यार्थ्याकडून 70 हजार रुपये घेऊन बनावट कागदपत्रे व्हॉट्सअॅपवर पाठवल्याची तक्रार आहे. विद्यापीठाने कर्मचाऱ्याला निलंबित करून चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सखोल चौकशी सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
कोयना धरणाची नवी ओळख;
आता ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’
महाराष्ट्र सरकारने कोयना जलसागराचे नामांतर करून त्याला ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर जलसंपदा विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या सिंचन, वीजनिर्मिती आणि पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कोयना जलसागराला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. या निर्णयामुळे राज्यभरातील शिवप्रेमी आणि विविध सामाजिक संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे.
राज्यात पाऊस थैमान घालणार,
३१ जिल्ह्यांना हाय अलर्ट
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून आज अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगड, जळगाव, पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर, जालना तसेच अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, बीड, परभणी आणि हिंगोलीसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, नागपूरमधील पूरस्थितीचा धोका सध्या टळला असला तरी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
तुकाराम मुंढेंना डबल धक्का;
29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीविरोधात मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. दोन शिफ्टमध्ये काम, शनिवार-रविवार व सार्वजनिक सुट्टीत कामाचे आदेश आणि रिक्त पदांमुळे वाढलेल्या कामाच्या ताणामुळे तपासणीच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानेही एफडीएच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करत सरकारी आस्थापनांचीही तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
NPCI चा मोठा निर्णय
GPay, PhonePe, Paytm ची ‘ही’ सेवा बंद होणार Top 10 News :
Google Pay, PhonePe आणि Paytm वापरणाऱ्या कोट्यवधी UPI युजर्ससाठी NPCI ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायद्याअंतर्गत आता UPI व्यवहार किंवा QR कोड स्कॅन करताना समोरच्या व्यक्तीला पूर्ण मोबाईल नंबर दिसणार नाही. मोबाईल नंबरचे केवळ शेवटचे चार अंकच दिसतील. NPCI ने सर्व बँका आणि UPI अॅप्सना 4 सप्टेंबर 2026 पर्यंत हा नियम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. महिला युजर्सच्या गोपनीयता आणि सुरक्षेसंदर्भातील तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, युजर्सना मोबाईल नंबरऐवजी स्वतःच्या पसंतीचे युजरनेम वापरून UPI ID तयार करण्याची सुविधाही मिळणार आहे. त्यामुळे स्पॅम कॉल्स आणि अनावश्यक संदेशांना आळा बसण्यास मदत होणार आहे.
ओडिशा-आसाममध्ये पावसाचा हाहाकार;
७८ जणांचा मृत्यू, लाखो नागरिकांचा जीव धोक्यात
मुसळधार पावसामुळे ओडिशा आणि आसाममध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. ओडिशात तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन लाखांहून अधिक नागरिक प्रभावित झाले आहेत. राज्यातील 266 गावे अजूनही पाण्याने वेढलेली असून सुमारे 30 हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. दरम्यान, आसाममध्ये आणखी सात जणांचा मृत्यू झाल्याने पुरातील मृतांचा आकडा 75 वर पोहोचला आहे. राज्यातील 3.32 लाख नागरिक अद्याप पुराच्या तडाख्यात आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि हवाई दलाकडून बचावकार्य सुरू असून दोन्ही राज्यांमध्ये मदत व पुनर्वसनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
भाजपच्या बड्या नेत्याचा अपघात,
राष्ट्रीय महामार्गावर कारची ट्रकला जोरदार धडक
उत्तर प्रदेशातील झाशी-ललितपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात छत्तीसगड भाजपचे प्रदेशाध्यक्ष किरण देव सिंह गंभीर जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशातील दतिया येथील मा पितांबरा पीठाचे दर्शन घेऊन परतत असताना तालबेहटजवळ त्यांच्या इनोव्हा कारने एका ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात किरण देव सिंह आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना झाशी मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करून जखमींना रुग्णालयात हलवले. अपघातानंतर प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही रुग्णालयात दाखल झाले.
इराणच्या हल्ल्यानंतर अमेरिका संतप्त,
ट्रम्पचा सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा इशारा
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढला असून जॉर्डनमधील अमेरिकी लष्करी तळावर झालेल्या कथित क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला “सडेतोड प्रत्युत्तर” देण्याचा इशारा दिला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, अमेरिका आणि सौदी अरेबियाने इराकमधील इराणसमर्थक मिलिशियांच्या तळांवर संयुक्त हवाई कारवाई केल्याचे वृत्त आहे. जॉर्डनच्या सैन्याने पाच क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचा दावा केला असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
दुलीप ट्रॉफीसाठी ईस्ट झोन संघाची घोषणा
इशान किशनकडे कर्णधारपदाची धुरा
दुलीप ट्रॉफी 2026 साठी ईस्ट झोन संघाची घोषणा करण्यात आली असून इशान किशनकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे बिहारच्या अवघ्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला उपकर्णधारपद देत निवडकर्त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. यापूर्वी वैभवने भारताच्या अंडर-19 संघाचे नेतृत्व करत दक्षिण आफ्रिका दौऱ्यात मालिका विजय मिळवून दिला होता. संघात अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मुकेश कुमार यांचाही समावेश आहे. अभिमन्यू ईश्वरन, शाहबाज अहमद आणि अनुकूल रॉय यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंमुळे ईस्ट झोनचा संघ संतुलित आणि मजबूत मानला जात आहे.
‘रामायण: पार्ट 1’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज
सोशल मीडियावर सर्वच पात्रांची जोरदार चर्चा Top 10 News :
4000 कोटी रुपयांच्या बहुचर्चित ‘रामायण: पार्ट 1’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. ट्रेलरमध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या तेजस्वी भूमिकेत, तर यश रावणाच्या रौद्र अवतारात प्रभावी दिसतो. साई पल्लवी सीता, रवी दुबे लक्ष्मण आणि रकुल प्रीत शूर्पणखा यांच्या भूमिकेत झळकले आहेत. ऐरावत, जटायू आणि भव्य युद्धदृश्यांमधील VFX विशेष लक्ष वेधून घेत आहेत. ए. आर. रहमान आणि हॅन्स झिमर यांच्या संगीताने ट्रेलरला भव्यता प्राप्त झाली आहे. ‘रामायण: पार्ट 1’ दिवाळी 2026 मध्ये, तर दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये प्रदर्शित होणार आहे.





