भेंडवळची आज होणार घट मांडणी Top 10 News : वर्षभरातील पीकस्थिती, पावसाचे प्रमाण, तसेच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय घडामोडींसह देशाची संरक्षण स्थितीचा अंदाज वर्तविणारी बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध व ऐतिहासिक भेंडवडची घटमांडणी यावर्षी आज अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणार आहे. या मांडणीद्वारे पावसाचे अंदाज काय येणार? वर्षभराची पीक स्थिती काय असणार? शेतमालाला भाव काय मिळणार? याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.. विदर्भासह राज्यभर प्रसिद्ध असलेल्या या घटमांडणीतून अतिवृष्टी, दुष्काळ, पीकस्थिती, आर्थिक तसेच राजकीय परिस्थिती आणि विविध संकटांबाबत अंदाज वर्तविले जातात. त्यामुळे या मांडणीबाबत शेतकरी वर्गासह राजकीय नेते, आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठी उत्सुकता असते. महाराष्ट्रात आणखी एक उष्मघाताचा बळी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना ऊन्हाचा तडाखा बसत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात उष्मघातामुळे अनेकांनी जीव गमावले आहेत. नगरच्या पारनेर तालुक्याच्या ढवळपुरीत उन्हाच्या तडाख्यामुळे महिलेचा मृत्यू झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. हर्षदा रावसाहेब चौधरी असे मृत महिलेचे नाव आहे. पारनेर तुक्यातील ढवळपुरीत राहणाऱ्या हर्षदा या शेतात काम करत होत्या. दुपारच्या कडक उन्हात मका कापताना चक्कर येऊन ४६ वर्षीय हर्षदा कोसळल्याने त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने चौधरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात बुलढाणा जिल्ह्यातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईहून – पुसदकडे जाणारी एक खाजगी प्रवासी बस समृद्धी महामार्गावर सकाळी सहाच्या सुमारास अपघातग्रस्त झाली. चालक आणि वाहक हे मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात हा अपघात घडल्याचं खाजगी बस मधील प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. या भीषण अपघातात दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 25 प्रवासी जखमी झाले आहे. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असून जखमींमध्ये सहा प्रवासी गंभीर असल्याची माहिती आहे. दरम्यान, अपघातग्रस्त खाजगी बस दुसऱ्या एका कारवर आदळल्याने कारचं ही मोठं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे जखमींवर उपचार करण्यासाठी मेहकर ग्रामीण रुग्णालयात एक तास डॉक्टर हजर नसल्याने नातेवाईकांचा देखील आक्रोश बघायला मिळालाय. भोंदूबाबा गडगे महाराजाला अटक Top 10 News : राज्यातील अनेक ठिकाणी भोंदूबाबांनी पुरोगामी महाराष्ट्राची लक्तर पार वेशीला टांगली आहेत. यात संगमनेरच्या आणखी एका भोंदूबाबाची भर पडली आहे. संगमनेरच्या वडगावपानच्या ‘दत्तधाम सरकार’मध्ये रुग्णांना गंडवण्य़ासाठी काळीकृत्य करणारा भोंदू समोर आलाय. भोंदू गडगे याने स्वतःला दैवी शक्ती प्राप्त असल्याचे भासवून ‘दत्तधाम सरकार’ नावाचे यूट्यूब चॅनल सुरू केलं. या माध्यमातून तो कर्करोगासारखे गंभीर आजार मंत्रशक्तीने बरे करणे, मूल नसलेल्या महिलांना मूल प्राप्त करून दिल्याचा दावा करायचा. तसेच घरातील विविध समस्या दूर करण्याचे खोटे दावे करत असे. गेल्या 10 वर्षांपासून त्याने शेकडो लोकांचे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचे उघड झालंय. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं भोंदू गडगेच्या काळ्या कृत्यांसंदर्भात पोलिसांना निवेदन दिलं होतं. मात्र या भोंदूबाबानं थेट अंनिसचे कार्यकर्ते आपल्याकडे पैसे मागत असल्याचाही दावा केला होता. नंतर भोंदूबाबा गडगे महाराजाविरोधात अंनिस आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. अक्षय्य तृतीयेनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल अक्षय्य तृतीयेनिमित्त आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. मध्यभागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.”अक्षय्य तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते. तसेच भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त दुचाकी फेरी (रॅली) काढण्यात येणार आहे. ही गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा,” असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे. महिला आरक्षणावरून मोदींची काँग्रेसवर टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित करत महिला आरक्षण विधेयकावरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विशेषतः काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर टीका करत त्यांनी महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर विरोधकांचा विरोध हा देशाच्या प्रगतीस अडथळा असल्याचे म्हटले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात परिवारवादी राजकारणावर निशाणा साधत, अशा पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या महिलांना संसदेत पोहोचू द्यायचे नाही, असा आरोप केला. तसेच 21व्या शतकातील महिलांना सर्व घडामोडींची जाणीव असून त्या योग्य निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिला आरक्षण विधेयकावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संपूर्ण भाषणात काँग्रेसचा अनेकदा उल्लेख केला. अंदाजे 60 वेळा काँग्रेसचे नाव घेत त्यांनी या पक्षावर राष्ट्रहिताला विरोध केल्याचा आरोप केला. विविध महत्त्वाच्या विधेयकांना काँग्रेसने विरोध केल्याचे सांगत त्यांनी तीन तलाक आणि समान नागरी कायदा (UCC) यांसारख्या मुद्द्यांचाही उल्लेख केला. माजी केंद्रीय मंत्री स्थापन करणार नवा पक्ष टॉप १० बातम्या देशामध्ये आता आणखी एका नव्या राजकीय पक्षाची स्थापना होणार आहे. माजी केंद्रीय मंत्र्याने याबात मोठी घोषणा केली. माजी केंद्रीय मंत्री आर के सिंह आता स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत. माजी सनदी अधिकारी ते राजकारणी बनलेले आर के सिंह यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर ५ महिन्यांनंतर नव्या पक्षाची स्थापन करणार असल्याचे जाहीर केले. एका मुलाखतीमध्ये त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगतिले की, त्यांचा प्रस्तावित पक्ष प्रामाणिक, सुशिक्षित, जातिनिरपेक्ष व्यक्तींना एकत्र आणेल. हा नवा पक्ष बिहारच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करेल.आर के सिंह हे १२ वर्षे भाजपमध्ये होते. सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण पक्षाकडून निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये भाजप पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती.त्यानंतर आता ते देशाच्या राजकारणात नव्या पक्षाची स्थापना करणार आहेत. युक्रेनमध्ये गोळीबाराचा थरार युक्रेनची राजधानी कीवमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. तेथील एका सुपरमार्केटमध्ये एका बंदूकधाऱ्याने काही लोकांना ओलीस ठेवले. नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडत सहाजणांचा जीव घेतला. मात्र पोलिसांनी नंतर गोळ्या झाडून हल्लेखोराला ठार केले. या घटनेवर भाष्य करताना युक्रेनच्या गृह मंत्रालयाचे प्रमुख इहोर क्लिमेंको म्हणाले की, पोलिसांच्या एका विशेष पथकाने ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, परंतु चर्चेतील वाटाघाटी अयशस्वी झाल्यानंतर पोलिसांनी दुकानात प्रवेश केला. त्यावेळी बंदूकधारी व्यक्तीने पोलिसांना शरण जाण्यास विरोध केला, त्यानंतर पोलिसांनी त्याला गोळ्या घालून ठार केले. हैदराबादने चेन्नईच्या तोंडाचा घास पळवला आयपीएल 2026 च्या 27 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने अटीतटीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्सचा 10 धावांनी पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ईशान किशनच्या नेतृत्वाखाली हैदराबादने शानदार विजय मिळवला. या विजयामुळे हैदराबादने गुणतालिकेत मोठी झेप घेतली असून 6 सामन्यांत 6 गुणांसह टॉप-4 मध्ये एन्ट्री मारली. हैदराबादने अत्यंत स्फोटक सुरुवात केली. सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने 23 धावा केल्या, पण खऱ्या अर्थाने मैदानात वादळ आणले ते अभिषेक शर्माने. अभिषेकने अवघ्या 15 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि 22 चेंडूत 59 धावांची तुफानी खेळी खेळली. 195 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. खराब सुरुवात होऊनही एकवेळ अशी होती कि चेन्नईसाठी हा विजय सोपा असल्याचे वाटत होते मात्र हैदराबादने शेवटच्या षटकांत चेन्नईच्या तोंडाचा घास हिरावला आणि विजयावर आपले नाव कोरले. ‘बिग बॉस मराठी ६’ची ट्रॉफीची पहिली झलक समोर Top 10 News : ‘बिग बॉस मराठी ६’ चा तीन महिन्यांचा प्रवास अखेर आज संपणार आहे. गेले १०० दिवस टॉप ५ स्पर्धकांनी घरात राडा घातला. बिग बॉसच्या घरात मैत्री, प्रेम आणि शत्रू या सर्व भावना पाहायला मिळाल्या. रितेश भाऊंनी वेळोवेळी घरातील सदस्यांची शाळा घेतली तसेच कौतुक देखील केले. अखेर ग्रँड फिनालेचा दिवस आलाय. ‘बिग बॉस मराठी ६’ची ट्रॉफी कोण उचलणार याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला लागली आहे. त्यातच आता ‘बिग बॉस मराठी ६’ची ट्रॉफीची पहिली झलक समोर आलीय.सोनेरी रंगांच्या या चमकादर ट्रॉफीने स्पर्धकांसोबतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ट्रॉफी ‘Bigg Boss मराठी Winner Season 6’ असे लिहिलंय. सुंदर ट्रॉफी पाहून घरातील सदस्य भावुक झाले. ‘बिग बॉस मराठी ६’ च्या विजेत्याला चमकदार ट्रॉफीसोबत तब्बल 15 लाख रुपयांची प्राइज मनी मिळणार आहे. दरम्यान, आज रात्री विजेत्याचे नाव रितेश भाऊच ग्रँड फिनालेला घोषित करतील.