Top 10 News : पुण्यात ABVP-NSUIमध्ये राडा, विशाखा राऊतांचे जात प्रमाणपत्र रद्द आणि ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा टीझर रिलीज , वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : पुण्यात राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमापूर्वी शिवाजीनगर येथील सीईओपी तंत्रज्ञान विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि NSUI कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.
पुण्यात ABVP-NSUIमध्ये राडा;
राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी तणाव
Top 10 News : पुण्यात राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमापूर्वी शिवाजीनगर येथील सीईओपी तंत्रज्ञान विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि NSUI कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर मारहाणीचे आरोप केले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ABVPवर गुंडगिरीचा आरोप करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली. विद्यार्थिनींना धमकावल्याचा आणि मारहाण केल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, विद्यार्थिनी मानसीने झटापटीदरम्यान पुरुष पोलिस अधिकाऱ्याने लाठी आणि बुटाने मारल्याचा आरोप केला. प्रकरणामुळे पुण्यात राजकीय वातावरण तापले आहे.
विशाखा राऊतांचे जात प्रमाणपत्र रद्द;
सरवणकर पिता-पुत्रींची शिंदेंची भेट
उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेविका आणि मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचे कुणबी जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर सदा सरवणकर आणि त्यांची मुलगी प्रिया सरवणकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शुक्रवारी रात्री झालेली ही भेट सुमारे 40 ते 45 मिनिटे चालली. विशाखा राऊत यांच्या विरोधात प्रिया सरवणकर यांनी महापालिका निवडणूक लढवली होती. त्यामुळे भेटीवरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, रक्ताचे नाते सिद्ध न झाल्याने राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. या निर्णयाविरोधात त्यांना 90 दिवसांत अपील करता येणार आहे.
सर्वसामान्यांना महागाईचा झटका,
सणासुदीत साखर कडू, रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ
सणासुदीच्या काळात महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा झटका दिला आहे. राज्यातील काही भागांत साखरेचा दर किलोमागे 80 रुपयांपर्यंत पोहोचला असून, वाढत्या दरामुळे ग्राहक आणि विक्रेते दोघेही त्रस्त आहेत. बुलढाणा, वाशिम आणि सांगलीत साखरेचा दर 80 रुपये, तर यवतमाळमध्ये 78 रुपये किलो आहे. दरम्यान, मुंबईकरांच्या प्रवासाचा खर्चही वाढणार असून, 1 सप्टेंबरपासून रिक्षाचे किमान भाडे 26 वरून 27, तर टॅक्सीचे भाडे 31 वरून 33 रुपये होणार आहे. त्यातच येत्या काही महिन्यांत मोबाईल रिचार्ज 12 ते 15 टक्क्यांनी महागण्याची शक्यता असल्याने नागरिकांचे बजेट आणखी कोलमडण्याची चिंता आहे.
‘कदाचित तीही लोकसेवाच असेल’
तुकाराम मुंडेंचा राजकारणात प्रवेशाचा संकेत?
महाराष्ट्र FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राजकारणात प्रवेश करण्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. भविष्यात राजकारणात येणार का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्किलपणे, “मुळीच नाही, यानंतर कदाचित ती सुद्धा लोकसेवाच असेल,” असे म्हटले. राजकारणातील आव्हाने लोकसेवेपेक्षा वेगळी असल्याचेही त्यांनी नमूद केले. आवडत्या मुख्यमंत्र्यांबाबत विचारल्यावर “प्रत्येकजण माझा आवडता आहे,” असे त्यांनी सांगितले. दरम्यान, FDA आयुक्त म्हणून त्यांच्या कार्यकाळात 31 जुलैपर्यंत 3 हजारांहून अधिक तपासण्या करण्यात आल्या असून, 55 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
45 दिवसांची रजा अन् वाढीव मानधन द्या
SIR मोहिमेतील कर्मचाऱ्यांसाठी मागणी Top 10 News :
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेचे काम करणाऱ्या शिक्षक, शासकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि इतर कर्मचाऱ्यांना 45 दिवसांची विशेष नैमित्तिक रजा तसेच वाढीव मानधन द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली आहे. नियमित कामासोबत मतदारांची माहिती संकलित करणे, पडताळणी आणि कागदपत्रांची तपासणी अशी अतिरिक्त कामे कर्मचाऱ्यांनी केली. ग्रामीण व दुर्गम भागात प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी काम पूर्ण केले. त्यामुळे अतिरिक्त श्रमाची दखल घेऊन रजा व मानधन वाढवावे, अशी मागणी करण्यात आली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागणीबाबत सकारात्मकता दर्शवल्याचे शिक्षक परिषदेने सांगितले.
अमित शाहांच्या आदेशानंतर FIR
राहुल गांधी यांचा आरोप
राहुल गांधी यांच्या ठिय्या आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी पेलेट गन गोळीबार प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. यानंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधत, “न्यायाच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे,” असे म्हटले. साहिल लोछाबच्या शरीरात अद्याप पेलेट्स असल्याचा दावा त्यांनी केला. एफआयआर दाखल करण्यासाठी जवळपास आठ तास लागल्याचेही राहुल गांधी म्हणाले. त्यांच्या आरोपानुसार, गृहसचिव आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या आदेशानंतरच एफआयआर दाखल झाला. दिल्ली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. साहिलने सीसीटीव्ही आणि ड्रोन फुटेज सुरक्षित ठेवण्याची मागणी केली आहे.
सरकारी रुग्णालयातच डॉक्टरांना संध्याकाळी प्रॅक्टिसची परवानगी?
उत्तराखंड सरकारचा नवा प्रस्ताव
उत्तराखंड सरकार सरकारी डॉक्टरांना नियमित ड्युटीनंतर त्याच सरकारी रुग्णालयाच्या परिसरात सशर्त खासगी प्रॅक्टिसची परवानगी देण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. या माध्यमातून डॉक्टरांची कमतरता भरून काढणे, रुग्णालयातील सुविधा आणि उपकरणांचा अधिक वापर करणे तसेच रुग्णांना संध्याकाळी तज्ज्ञ वैद्यकीय सेवा देण्याचा सरकारचा उद्देश आहे. इच्छुक डॉक्टरांनाच ही सुविधा मिळणार असून, रुग्णालयाबाहेर स्वतंत्र क्लिनिक सुरू करता येणार नाही. शुल्क शासनाकडून निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. शस्त्रक्रिया किंवा पुढील उपचारांची गरज असल्यास सरकारी रुग्णालयातच उपचार करण्यास प्राधान्य द्यावे लागेल. प्रस्तावावर चर्चा सुरू असून अंतिम निर्णय बाकी आहे.
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून ‘गोंधळ’
राष्ट्रपती भवनाकडून तासाभरातच स्वागत संदेश मागे
बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांच्या संभाव्य भारत दौऱ्यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रपती भवनाने शनिवारी 22 ऑगस्ट रोजी ‘चेंज ऑफ गार्ड’ सोहळा रद्द करण्याची घोषणा केली होती. बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या औपचारिक स्वागताच्या सरावासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र, अवघ्या तासाभरातच राष्ट्रपती भवनाने हे प्रसिद्धीपत्रक मागे घेतले. त्यामुळे रहमान यांच्या भारत दौऱ्याबाबत चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाच्या मागणीमुळे भारत-बांगलादेश संबंधांमध्ये तणाव आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तावित दौऱ्याबाबत अधिकृत स्पष्टता अद्याप समोर आलेली नाही.
15 वर्षांनंतर भारताचे महिला दुहेरीत पदक निश्चित
त्रिशा-गायत्रीचा चीनवर दणदणीत विजय
जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी चीनच्या जिया यी फॅन-झांग शू-शियान जोडीचा 16-21, 21-15, 21-13 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 1 तास 9 मिनिटांच्या या सामन्यात भारतीय जोडीने पहिला गेम गमावल्यानंतर दमदार पुनरागमन केले. या विजयासह भारताचे महिला दुहेरीतील किमान कांस्यपदक निश्चित झाले आहे. भारताने या प्रकारात अखेरचे जागतिक अजिंक्यपद पदक 2011 मध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांच्या माध्यमातून जिंकले होते. त्यामुळे तब्बल 15 वर्षांनंतर भारताला महिला दुहेरीत पदक मिळणार आहे.
‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा टीझर रिलीज;
दुसऱ्या टीझरने प्रेक्षकांची वाढवली उत्सुकता Top 10 News :
कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली आहे. सत्य घटनांवर आधारित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या या सिनेमात काही वास्तवातील व्यक्तिरेखाही पाहायला मिळणार आहेत. अभिनेत्री दीपाली सय्यद मुख्य भूमिकेत असून उदय टिकेकर यांचाही चित्रपटात समावेश आहे. स्वरूप बी. सावंत यांनी दिग्दर्शन केले आहे. ‘कोणाच्या डोक्यावर बॉम्ब लागणार…?’ या आशयाने टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ येत्या 2 ऑक्टोबर 2026 रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.




