Revanth Reddy’s US Visit Cancelled : तेलंगणाचे CM ए. रेवंत रेड्डींच्या अमेरिका दौऱ्याला केंद्राचा नकार; काय घडलं पाहा….
परराष्ट्र मंत्रालयाने ‘राजकीय दृष्टिकोनातून मंजुरी नाकारल्याचे’ कारण देत दौऱ्याला परवानगी दिली नाही, असे मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Revanth Reddy’s US Visit Cancelled : तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या अमेरिका दौऱ्याला केंद्र सरकारने परवानगी नाकारल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने शुक्रवारी दिली. सध्या लंडन दौऱ्यावर असलेले रेड्डी अमेरिकेतील बोस्टनला भेट देऊन ३० ऑगस्ट रोजी हैदराबादला परतणार होते.
मात्र, परराष्ट्र मंत्रालयाने ‘राजकीय दृष्टिकोनातून मंजुरी नाकारल्याचे’ कारण देत दौऱ्याला परवानगी दिली नाही, असे मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील ‘तेलंगणा रायझिंग’ या अधिकृत शिष्टमंडळाचा अमेरिका दौरा रद्द करण्यात आला आहे.
रेड्डी आता बोस्टनला जाण्याऐवजी २३ ऑगस्ट रोजी लंडनहून थेट हैदराबादला परतणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या अमेरिका दौऱ्यात तेलंगणातील गुंतवणूक आणि विकासाच्या संधींबाबत बैठका प्रस्तावित होत्या. मात्र, केंद्राच्या मंजुरीअभावी हा दौरा रद्द करावा लागला आहे.




