TOP 10 News : पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महागले ते SRIच्या माध्यमातून नावे वगळण्याचा प्रयत्न; काँग्रेसचा आरोप, जाणून घ्या आजच्या TOP 10 News
TOP 10 News : राज्य, देश-विदेश, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी...

TOP 10 News : १. पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महागले!
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आता तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. सर्वात आधी 15 मे रोजी पेट्रोलच्या दरात 3 रुपये आणि डिझेलच्या दरात 3.11 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर चार दिवसांनी 20 मे रोजीपेट्रोलच्या दरात 86 पैसे आणि डिझेलच्या दरात 83 पैशांची दुसऱ्यांदा वाढ झाली.
आज शनिवारी सकाळपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ झाली. त्यानुसार पेट्रोलचा प्रतिलीटर दर 87 पैसे आणि डिझेलची प्रतिलीटर किंमत 91 पैशांनी वाढले आहेत. आज झालेल्या ताज्या वाढीसह गेल्या १० दिवसांत पेट्रोल आणि डिझेल तब्बल ५ रुपयांनी महागले आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 108.45 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा प्रतिलीटर दर 95.02 रुपयांवर पोहोचला आहे.
२. नीट पेपरफुटीचे महाराष्ट्र केंद्र असल्याचा संशय
नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील मनीषा हवालदार हिला फिजिक्स विषयाची प्रश्नपत्रिका लीक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान मनीषा हवालदार हिने परीक्षेपूर्वी काही विद्यार्थ्यांपर्यंत फिजिक्सची प्रश्नपत्रिका पोहोचवल्याचा आरोप समोर आला आहे.
धक्कादायक म्हणजे, आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी ७ आरोपी हे महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे नीट पेपर लीक प्रकरणी महाराष्ट्र हेच पेपरफुटीचं केंद्र असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. पेपरफुटीच्या मास्टरमाईंड सोबतच काही धनाढ्य पालकही सीबीआयच्या राडारवर आले आहेत. त्यामुळे एजन्सी आता अशा सर्व पालकांची यादी तयार करत आहे, ज्यांच्या बँक खात्यांतून शिवराज मोटेगांवकर, पी. व्ही. कुलकर्णी किंवा त्यांची सहकारी मनीषा वाघमारे यांच्या खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर झाले होते.
३. SRIच्या माध्यमातून नावे वगळण्याचा प्रयत्न; काँग्रेसचा आरोप
मतदार यादी फेरतपासणी अर्थात (एसआयआर)च्या माध्यमातून राज्यातही निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा व नावे वगळण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. निवडणूक आयोगामार्फत राज्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार यादी फेरतपासणी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीची राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली.
यानंतर सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत, प्रत्येक मतदाराचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने एसआयआर मोहिमेसाठी विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांची या समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर अभिजीत सपकाळ हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.
Pune News : राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची नाराजी.! सुनेत्रा पवारांसमोर वाचला तक्रारींचा पाढा
४. अभिजीत दिपके यांचे ट्विटरनंतर Instagram अकाउंट हॅक
क्रॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना आणखी झटका बसला आहे. ट्विटरनंतर आता त्यांचे इन्स्टाग्राम खातेही हॅक करण्यात आले आहे. याबाबत एक्सवर इन्स्टाग्राम खाते हॅक झाल्याचा स्क्रीनशॉट त्यांनी पोस्ट केला आहे. त्यांनी Meta ला टॅग करत एक कमेंटही केली आहे. ‘मला इन्स्टाग्राम अकाऊंट ॲक्सेस करता येत नाही. हा ॲक्सेस संपला आहे. मी हे खातं रिकव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यात अद्याप यश आलेले नाही.’
दरम्यान, मुख्य अकाउंट हॅक झाल्यानंतर दिपके यांनी आपल्या चाहत्यांशी जोडले राहण्यासाठी एक बॅकअप अकाउंट सुरू केले होते. मात्र, मेटा प्लॅटफॉर्मने ते बॅकअप अकाउंटही काही कारणास्तव टेक डाऊन केले आहे. याआधी गुरुवारी क्रॉकरोच जनता पार्टीचे X अकाऊंट भारतात सस्पेंड करण्यात आले होते. त्यानंतर काही वेळांनी ‘कॉकरोच इज बॅक’ या नावाने अजून एक ट्विटर हँडल तयार करण्यात आले. ज्याला तरूणांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
५. राज्यसभेतील रिक्त जागेसाठी मंत्री छगन भुजबळांची चर्चा
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत निवडून आल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ६ मे २०२६ रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी पोटनिवडणूक घोषित केली आहे. राज्यसभेच्या जागेसाठी येत्या १८ जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून या जागेसाठी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. भुजबळ यांनी यापूर्वी लोकसभा आणि राज्यसभेवर जाण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केली होती. त्यामुळे पक्षाकडून त्यांचे नाव निश्चित होऊ शकते. मात्र, राज्यसभेची उमेदवारी दिल्यास पुतण्या समीरला मंत्रिपद देण्याची मागणी भुजबळ यांनी केल्याची माहिती समोर येत आहे. यावरून भुजबळ यांच्या उमेदवारीबाबत पेच निर्माण झाल्याची चर्चा आहे.
६. केदारनाथ यात्रेदरम्यान दुर्घटना; एकाचा मृत्यू
चारधाम यात्रेसाठी केदारनाथकडे जाणाऱ्या भाविकांच्या मार्गावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. रुद्रप्रयाग जिल्ह्यातील सोनप्रयाग परिसरातील हनुमान बैरियरजवळ अचानक भूस्खलन झाले. डोंगराचा एक मोठा भाग थेट रस्त्याशेजारील एका झोपडीवजा दुकानावर कोसळला. या ढिगाऱ्याखाली सापडल्याने एका स्थानिकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक नेपाळी नागरिक गंभीर जखमी झाला आहे.
या घटनेचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये केदारनाथ मार्गावरील हनुमान बैरियरजवळ लोक रांगेत पुढे जाताना दिसत आहे. मात्र, अचानक काही सेकंदात डोंगरावरून एक मोठा दगड खाली असलेल्या दुकानावर कोसळतो. हा थरार पाहताच लोकांची धावपळ सुरू झाली.
७. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीवरील हल्याचा कट उघडकीस
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांच्या हत्येचा कट उघडकीस आला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) कडून प्रशिक्षित एका दहशतवाद्याने इवांका ट्रम्प यांना ठार मारण्याचा संपूर्ण कट रचला होता.
सुरक्षा यंत्रणांनी इवांका ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. त्याचे नाव ३२ वर्षीय मोहम्मद बाकेर साद दाऊद अल-सादी असून तो इराकी नागरिक आहे. ‘द पोस्ट’ वृत्तपत्राला मिळालेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्याला त्यांच्या गुरुचा बदला घ्यायचा होता. सहा वर्षांपूर्वी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात त्याचे गुरू आणि इराणी लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला होता.
८. आयएएस पालकांच्या मुलांना आरक्षणाचा लाभ कशासाठी?
“आई-वडील दोघेही आयएएस अधिकारी असतील, तर त्यांच्या मुलांना आरक्षणाचा लाभ कशासाठी हवा? अशा स्थितीतही जर पुढची पिढी आरक्षणाचा लाभ घेत राहिली, तर आपण या व्यवस्थेतून कधीच बाहेर पडू शकणार नाही,” असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. कर्नाटक पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सहायक अभियंता पदासाठी एकाची राखीव प्रवर्गातून निवड झाली होती.
मात्र, जिल्हा जात आणि उत्पन्न पडताळणी समितीने त्याचा जात वैधता दाखला नाकारला. समितीच्या तपासणीत समोर आले की, उमेदवाराचे आई-वडील दोघेही सरकारी कर्मचारी असून त्यांचे एकत्रित उत्पन्न हे ‘क्रिमी लेयर’ मर्यादेपेक्षा जास्त आहे. पालकांच्या उत्पन्नामुळे तो क्रिमी लेयरमध्ये येत असल्याने त्याचा जात दाखला रद्द करण्यात आला.
कर्नाटक उच्च न्यायालयानेही हा निर्णय योग्य ठरवला होता, याविरोधातील अपीलावर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, पालकांकडे चांगल्या नोकऱ्या व उत्तम उत्पन्न असेल, तर त्यांच्या मुलांनी आरक्षणाच्या परिघातून बाहेर पडायला हवे, असे स्पष्ट केले.
९. विजयानंतरही हैदराबादच्या पदरी निराशा
आयपीएल २०२६ च्या ६७ व्या लीग सामन्यात सनरायझर्स हैदराबादने आरसीबीचा ५५ धावांनी पराभव केला. मात्र, या मोठ्या विजयानंतरही हैदराबादच्या पदरी निराशा आली आहे. या विजयानंतर गुणतालिकेत आरसीबी, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या तिन्ही संघांचे प्रत्येकी १८-१८ गुण झाले आहेत. मात्र, नेट रनरेटच्या गणितात हैदराबादचा संघ या तिन्हींमध्ये सर्वात मागे राहिला.
यामुळे हैदराबादचे अव्वल दोन संघांमध्ये स्थान मिळवून थेट ‘क्वालिफायर १’ खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. हैदराबादला गुणतालिकेत अव्वल दोनमध्ये स्थान मिळवून पहिल्या क्वालिफायरमध्ये जागा पक्की करण्यासाठी आरसीबीला १६५ धावांच्या आत रोखणे अनिवार्य होते. मात्र, २५५ धावांचा पाठलाग करताना आरसीबीने हा आकडा ओलांडला, ज्यामुळे हैदराबादचा विजय होऊनही त्यांचे मोठे नुकसान झाले.
१०. ‘देऊळ बंद ३’ मधून गश्मीर महाजनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार
‘देऊळ बंद २’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये प्रवीण तरडे यांची पत्नी आणि अभिनेत्री स्नेहल तरडे मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचा पहिला भाग ‘देऊळ बंद’ २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. यात अभिनेता गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत होता. अशात आता ‘देऊळ बंद २’च्या शेवटी गश्मीर महाजनी म्हणजेच राघव शास्त्रीची धमाकेदार एन्ट्री पाहायला मिळते.
ज्यानंतर ‘देऊळ बंद ३’ येणार असल्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात तुम्ही पाहू शकता की, गश्मीर महाजनी पुन्हा एकदा राघव शास्त्रीच्या भूमिकेत परतला आहे. राघव शास्त्री अमेरिकेत आपल्या कंपनीत असताना त्याला स्वामींचा फोन येतो. राघव शास्त्री आणि स्वामी समर्थ यांच्यातील संवाद सुरू असतो. यात राघव शास्त्रीच्या या एण्ट्रीसोबतच ‘देऊळ बंद 3’चीही घोषणा करण्यात आली आहे.
हेही वाचा:
Pune News : “राज्यात पुरेसा इंधनसाठा उपलब्ध” – दत्तात्रय भरणे







