Dharashiv : दिवाळीत दुर्दैवी घटना! धारशिवमध्ये घराला आग लागल्याने 6 जणांचा होरपळून मृत्यू
पुण्यासह ठाण्यातही आगाची घटना...

Dharashiv : लक्ष्मीपूजननिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना धारशिवमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. येडशी येथील गोविंद करंडे यांच्या घराला मध्यरात्री आग लागल्याने यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
मध्यरात्रीपासून गावकरी आणि अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र आगीने हळूहळू रौद्र रूप धारण केल्याने करंडे कुटुंबातील सहा जणांनी जीव गमावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद करंडे यांचे करंडे किराणा अँड जनरल स्टोअर असे दुकान असून या किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर करंडे कुटुंब राहत होते. या घराला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी घरात 12 जण होते. यातील उर्वरित व्यक्तींवर उपचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, दिवाळीनिमित्त घरात पणत्या लावलेल्या होत्या. या पणत्यांमुळेच आग लागली असल्याची प्राथमिक माहिती असून आगीचे ठोस कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
ठाण्यातील बबहुमजली इमारतीला आग
ठाण्यातील वागळे इस्टेट येथील एका इमारतीला रविवारी रात्री आग लागली होती. वागळे इस्टेट येथील रहेजा गार्डन संकुलातील ‘कार्लाइन’ या 17 मजली इमारतीला रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास भीषण आग लागली.
नवव्या मजल्यावर लागलेली ही आग काही क्षणांमध्ये 17 व्या मजल्यापर्यंत पसरत गेली. त्यामुळे या इमारतीमधील अनेक रहिवाशांचा जीव धोक्यात आला होता.
मात्र, अग्निशमन दलाच्या वेगवान हालचालींमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.अग्निशमन दलाकडून आग विझवली जात असताना एकनाथ शिंदे हे आपल्या काही मोजक्या सहकाऱ्यांसह रहेजा गार्डन कॉम्प्लेक्समध्ये दाखल झाले होते.
पुण्यात ६४ ठिकाणी आगीची घटना
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके फोडताना झालेल्या निष्काळजीपणामुळे पुणे शहर आणि उपनगरांत तब्बल ६४ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांतही आगीच्या घटना घडल्या. शिवाजीनगर, काशेवाडी, सदाशिव पेठ, नाना पेठ,
शुक्रवार पेठ, गंज पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ आणि रेंजहिल्स परिसरात आग लागली. तर कोंढवा, धायरी, खराडी, कोथरूड, कात्रज, वारजे, बाणेर, औंध, विमाननगर, धानोरी, उंड्री, केशवनगर आणि टिंगरेनगर परिसरातही अग्निशमन दलाला धाव घ्यावी लागली. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्व ठिकाणी तातडीने कारवाई करून आगीवर नियंत्रण मिळवले.
हेही वाचा:
Talegaon: तळेगावात लक्ष्मीपूजन उत्साहात; विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी रांगोळ्यांनी शहर उजळले





