Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लाेकप्रतिनिधी पुणे जिल्हयात सर्वाधिक असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या गटातून विधानपरिषदेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हक्क आहे. पक्षात इच्छुकांची संख्या अधिक आहे, तरी उमेदवार निवडण्याचा अधिकार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देण्यात आला आहे. पुणे जिल्हयात सर्वाधिक मतदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे, त्यामुळे ही आमच्या हक्काची जागा आहे, अशा शब्दात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुणे विधानपरिषदेच्या जागेवर आपला दावा ठोकला . तसेच ती जागा आम्हाला मिळेल, असा विश्वासही भरणे यांनी यावेळी व्यक्त केला. बारामती हॉस्टेल येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीनंतर कृषीमंत्री भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री भरणे म्हणाले की, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्हयातील आजी-माजी आमदार व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत जिल्हयातील पक्ष संघटना मजबूत करणे, पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय देणे यादृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली. विधान परिषद निवडणुक सध्या लागली असून इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. राज्यात पेट्राेल व डिझेलचा साठा पुरेसा असून इंधनाचा काेणताही तुटवडा सध्या नाही. काेणीतरी काहीतरी अफवा पसरत असल्याने पेट्राेल पंपाच्या बाहेर शेतकऱ्यांसह अनेकजण रांगा लावून बसत आहे. गैरसमजुती मधून या रांगा लागत असून त्यामुळे इंधनाचा खप सध्या २० टक्के वाढलेला आहे. काेणत्याही पेट्राेल पंपाबाहेर रांगा लावण्याची गरज नाही. पुरेसा इंधन साठा राज्याकडे उपलब्ध असल्याचे भरणे यांनी यावेळी सांगितले.