Pune News – महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी शुक्रवारी बारामती हॉस्टेल येथे झालेल्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्यासमोर नाराजीचा सूर लावत भाजपकडून होत असलेल्या दुजाभावाची तक्रार केली. महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक शुक्रवारी बारामती हॉस्टेल येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नगरसेवकांनी महापालिकेतील भाजपच्या कथित मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त केली. विशेषतः विकासकामांच्या निधी वाटपात भाजपच्या नगरसेवकांना प्राधान्य दिले जात असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना निधी मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली. नगरसेवकांनी मुख्यसभा, विविध महत्त्वाचे विषय आणि निर्णय प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना डावलले जाते, सभागृहात विषय मांडू दिले जात नाहीत, दबाव टाकला जातो, अशा स्वरूपाच्या तक्रारी नगरसेवकांनी मांडल्या. महापालिकेच्या अंदाजपत्रकापासून प्रभाग समित्यांच्या रचनेपर्यंत भाजपला लाभदायक ठरतील, अशा पद्धतीने निर्णय घेतल्याच्या भावना काही नगरसेवकांनी व्यक्त केल्या. पक्ष संघटना मजबूत करा या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी नगरसेवकांना पक्ष संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. पक्षाचे काम वाढवा, विचार वाढवा. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांशी प्रतारणा होणार नाही, याची काळजी घ्या असा संदेश त्यांनी दिल्याचे बैठकीनंतर सांगण्यात आले. यावेळी महापालिकेतील राजकारणातही लक्ष घालावे, स्थानिक स्तरावर पक्षाची ताकद वाढवावी, अशी विनंतीही नगरसेवकांनी पवार यांच्याकडे केली. अन् अजित पवारांची आठवण झाली बारामती हॉस्टेलमधील बैठकीत गंभीर राजकीय चर्चेसोबत मिश्किल वातावरणही पाहायला मिळाले. चर्चा सुरू असताना सुनेत्रा पवार यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले अमोल बालवडकर यांच्याकडे पाहात आपल्या पक्षात आलेले बालवडकर अस्वस्थ असतील बहुतेक, अशी मिश्किल टिप्पणी केली. त्यावर बालवडकर यांनी तत्काळ, मी अजिबात अस्वस्थ नाही. राष्ट्रवादीत आल्यापासून एकदम मस्त आणि स्वस्थ आहे, असे उत्तर दिले. त्यांच्या या प्रत्युत्तरानंतर बैठकीत एकच हशा पिकला.