TOP 10 News : गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात ते माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश; जाणून घ्या आजच्या TOP 10 News
TOP 10 News : राज्य, देश-विदेश, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील ताज्या घडामोड...

TOP 10 News : 1. गणरायाच्या आगमनासोबत राज्यात पावसाचे कमबॅक
आज गणरायाचे आगमन होणार असून, राज्यभरात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. याचदरम्यान राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. गणपती आगमनापूर्वीच रविवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. कोकणासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. आज देखील हवामान खात्याने अनेक जिल्ह्यात हलका ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. आज उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर जिल्ह्यासह आसपासच्या तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गणरायाच्या आगमनासोबत राज्यात पावसाने पुन्हा जोर पकडल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
2. मुंबईच्या राजाचा पहिला लुक समोर; 22 फुटांच्या मूर्तीने वेधले लक्ष
गणरायाच्या आगमनानिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. याचदरम्यान, मुंबईतील प्रसिद्ध गणेशगल्लीचा राजा मंडळाच्या गणपतीचा फर्स्ट लूक समोर आला आहे. गणेशगल्लीचा राजा मुंबईचा राजा या नावानेही ओळखला जातो. गणेश गल्लीच्या राजाची 22 फुटांची मनमोहक मूर्ती पाहायला मिळत आहे. गणेश गल्लीच्या राजाची 22 फुटांची मनमोहक मूर्ती अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. या विलोभनीय रूपदर्शनासोबतच गणेश गल्लीच्या ऐतिहासिक उत्सवाच्या ९९ व्या वर्षाचा अधिकृत प्रारंभ झाला आहे.
3. लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
गणरायाच्या आगमनासोबतच राज्य सरकारकडून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर पुढील काही दिवसात ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होणार असल्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून हप्त्याची प्रक्रिया १६ किंवा १७ तारखेंपासून सुरू केली जाईल. त्यानंतर टप्प्या टप्प्याने प्रत्येक पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील १ कोटी ६६ लाख पात्र महिलांना थेट आर्थिक मदत मिळत असल्याचं सांगितलं जातं. रक्षाबंधनाच्या काळात सरकारने जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला होता. आता गणेशोत्सव आणि गौरी आगमनाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टचा हप्ता देण्याची शक्यता आहे.
4. ढोल- ताशाच्या गजरात दगडूशेठ गणपतीची निघाली मयूर रथातून मिरवणूक
पुण्यातील गणेशोत्सव प्रमुख आकर्षण ठरते. यंदाही गणरायच्या आगमनासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. पुण्यात सकाळपासूनच दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी उसळली आहे. ढोल-ताशाच्या गजरात सकाळी 8.30 वाजता रमणबाग येथून मिरवणूकला सुरुवात होणार आहे. फुलांनी आकर्षकपणे सजविलेल्या मयूर रथातून श्रींची ही मिरवणूक निघेल. यामध्ये गंधाक्ष ढोल-ताशा पथक, मयूर बँड, प्रभात बँड आणि दरबार बँड सहभागी होणार आहेत. प्रतिष्ठापनेनंतर दुपारी १२ वाजल्यापासून उत्सवमंडपात भाविकांना श्रींचे दर्शन घेता येणार आहे.
5. सिल्लोडमध्ये पैठणी उद्योग उभारण्यासाठी आमदार सत्तारांचा पुढाकार; येवला पैठणी फॅक्टरीला भेट
सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सिल्लोड येथे पैठणी उद्योग सुरू करण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने त्यांनी येवला, जि. नाशिक येथे कापसे फाउंडेशनच्या ‘कापसे पैठणी’ फॅक्टरीला भेट देऊन पैठणी उत्पादन प्रक्रिया, उद्योगाचे स्वरूप तसेच रोजगारनिर्मितीच्या संधींची माहिती जाणून घेतली. तसेच आमदार अब्दुल सत्तार यांनी फॅक्टरीतील विणकर कामगारांशी संवाद साधून त्यांच्या कामाची पद्धत, अडचणी तसेच रोजगाराच्या संधींबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी कापसे पैठणीचे संचालक बाळकृष्ण कापसे यांनी पैठणी उत्पादनाबाबत सविस्तर माहिती दिली.
6. CET डेटा लीकच्या तक्रारींची फॉरेन्सिक ऑडिट; दोषींवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
CET सेलच्या डेटामध्ये कथित गैरप्रकार आणि परीक्षा केंद्रे मॅनेज केल्याच्या तक्रारींवरून शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. भाजप आमदार विक्रम पाचपुते यांच्या पुढाकारातून झालेल्या या भेटीत शिष्टमंडळाने विविध संशयास्पद बाबी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. या तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास आवश्यक बदल करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती पाचपुते यांनी दिली. लोअर परळ येथील तक्रार केवळ एनसीपुरती मर्यादित न ठेवता तिचे एफआयआरमध्ये रूपांतर करण्याबाबत तसेच तपासासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या स्तरावर समिती स्थापन करण्याबाबत चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. CET डेटाचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येणार असून, दोषी शासकीय असो किंवा खासगी, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पाचपुते यांनी स्पष्ट केले.
7. मुंबईतील मराठा आंदोलनाला परवानगी नाकारली; जरांगे आक्रमक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात १९ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सार्वजनिक सुव्यवस्था, गणेशोत्सवादरम्यान होणारी गर्दी, वाहतूक व्यवस्थेवरील संभाव्य परिणाम तसेच २०२५ मधील आंदोलनादरम्यान झालेल्या नियमभंगाचा दाखला देत आझाद मैदान पोलिसांनी हा निर्णय घेतला. गेल्या वर्षी २९ ऑगस्टपासून सुरू झालेल्या आंदोलनाचाही पोलिसांनी दाखला दिला आहे. परंतु परवानगी नाकारल्याची माहिती समोर आल्यानंतर जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली. आम्ही संविधानाप्रमाणे चालतो. सरकारने कायदा पायदळी तुडवला तर न्यायालय न्याय देते. आम्ही सरकारच्या नियमांशी बांधील नाही. सरकारचे नियम आम्ही मानत नाही. द्वेषभावनेतून आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली आहे, असा आरोप जरांगे यांनी केला.
8. २०२९ पूर्वी समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करू; अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप आणि एनडीए सरकार असलेल्या २१ राज्यांमध्ये आम्ही २०२९ पूर्वी समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करू, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान देशभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबवले जाणार आहे. पंतप्रधानपदाच्या बारा वर्षात मोदी यांनी देशाला भ्रष्टाचार, जातिवाद आणि घराणेशाहीच्या राजकारणातून बाहेर काढल्याचेही शाह यांनी सांगितले. ‘जेन-झी’च्या आंदोलनाच्या राजकीय आणि सामाजिक परिणामांबाबत शाह यांनी, भाजप सरकार संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यावर विश्वास ठेवते; आणीबाणी लादून शासन करणे ही काँग्रेसची संस्कृती असल्याची टीकाही केली.
9. ‘मनोज जरांगे कायद्यापेक्षा मोठे नाहीत’; गुणरत्न सदावर्तेंची टीका
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनावरून गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली आहे. कायद्याची तटबंदी असल्याशिवाय काही जण ऐकत नाहीत, असा आरोप करत सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्यावर हेकडीखोरपणाचा आरोप केला. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारल्याचे सांगत त्यांनी मुंबई पोलिसांचे कौतुक केले. मनोज जरांगे यांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांवरून त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचेही सदावर्ते यांनी सांगितले. जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांबाबत वापरलेल्या कथित अश्लाघ्य भाषेवरूनही गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. ‘मनोज जरांगे कायद्यापेक्षा मोठे नाहीत’, असे म्हणत मुंबईला अस्थिर करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
10. ‘विद्यार्थ्यांवरील अन्याय थांबवा, हे मायबाप नाही, जीवघेणं सरकार’ – रोहिणी खडसे
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी संजय गायकवाड यांच्या महिलांबाबतच्या वक्तव्यापासून एमपीएससी पेपरफुटी, रस्त्यांची दुर्दशा, जळगावमधील अवैध धंदे आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार टीका केली. महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षांमधील पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येत असून, परीक्षा घेणाऱ्या अध्यक्षांचा राजीनामा घेण्याची मागणीही त्यांनी केली. रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांवरून सरकारच्या कारभारावर टीका करताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याचा आरोप केला.
11. मुंबईतील सर्वात श्रीमंत आमदार चक्क भिकाऱ्याच्या वेषात
भाजपचे आमदार पराग शाह यांचा चक्क भिकाऱ्याच्या वेशात रस्त्यावर फिरतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पराग शाह हे मुंबईतील सर्वात श्रीमंत आमदार आहेत. तब्बल 3000 हजार कोटींचे मालक असलेले घाटकोपर पूर्व मतदारसंघाचे आमदार पराग शहा एक दिवस घाटकोपरच्या रस्त्यावर भिकारी बनून फिरले, मात्र त्यांना कोणी ओळखू शकले नाही. त्यांनी असे करण्यामागचे कारणही समोर आले आहे. पराग शाह यांनी जैन धर्मगुरुंच्या सांगण्यावरुन एक दिवस भिकारी म्हणून व्यतीत केला. सध्या जैनधर्मियांचा चातुर्मास सुरू आहे. पराग शहा यांचे गुरु नम्रमुनी यांनी पराग शहा यांना एक दिवस भिकारी बनण्याचा अनुभव घ्यावा असे सुचवले. गुरुंच्या या आदेशाचे पालन करीत कोट्यधीश असलेल्या आमदार पराग शहा यांनी सर्व सुरक्षाव्यवस्था, गाड्या आणि महागड्या वस्तू दूर करून भिकाऱ्याचा वेष धारण केला.
12. संघर्ष जगासाठी धोका, पंतप्रधान मोदींचा ‘ब्रिक्स’ समारोपादरम्यान इशारा
भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दोन दिवसीय ब्रिक्स शिखर परिषदेच्या समारोपाच्या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील वाढत्या तणावाचा सामान्य जनतेच्या जीवनावर परिणाम होत आहे. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकत्र येऊन सहकार्य वाढवावे, असे आवाहन केले आहे. दुसरीकडे, महत्त्वपूर्ण खनिजांच्या निर्यातीवर काही देशांकडून निर्बंध घातले जात आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मोदींनी केलेले विधान महत्त्वाचे ठरते. तंत्रज्ञान आणि महत्त्वपूर्ण खनिजांचा वापर शस्त्रासारखा केल्यास जगाच्या प्रगतीला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर सर्व देशांना आणि समाजघटकांना लाभेल अशा पद्धतीने झाला पाहिजे, असे मोदी यांनी सांगितले.
13. भाजपला धक्का देत माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश
चंडीगडनंतर कर्नाटकच्या राजकारणात मोठा बदल पाहायला मिळाला. भाजपचे माजी आमदार एन. एल. नरेंद्र बाबू यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, राज्याचे काँग्रेस अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृतपणे रविवारी पक्षात प्रवेश केला. नरेंद्र बाबू यांनी आदल्या दिवशीच म्हणजेच शनिवारी, भाजपचा राजीनामा दिला होता. शनिवारी भाजप सोडण्याचा निर्णय जाहीर करताना त्यांनी पक्षाच्या अंतर्गत कामकाजावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी पक्षाच्या कर्नाटक ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला. आपण काँग्रेसमध्ये परतत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. राज्यातील काही नेते भाजप सोडून काँग्रेसमध्ये जाण्याबाबत जोरदार चर्चा सुरू असतानाच ही राजकीय घडामोड घडली आहे.
14. मोहसिन नक्वी यांच्याकडून टीम इंडियाचा ट्रॉफी घेण्यास नकार
आशिया कप 2026 जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी हरमनप्रीत कौर आणि संघाच्या निर्णयाचे समर्थन केले. त्यांनी स्पष्ट केले की, महिला संघाने या निर्णयातून भारतीय पुरुष संघाच्या भूमिकेशी एकजूट दाखवली आहे. सैकिया म्हणाले की, 2025 मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेवू नयेत, एवढेच नव्हे तर त्यांच्यासोबत क्रिकेटही खेळू नये, अशी देशवासीयांची भावना होती. मात्र, बहुराष्ट्रीय स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास सरकारने परवानगी दिली. त्यामुळे सामना खेळणे आणि प्रत्येक गोष्ट स्वीकारणे या दोन वेगळ्या बाबी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
15. शिल्पा शेट्टीच्या घरी वाजत गाजत बाप्पाचं आगमन
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी वाजत गाजत बाप्पाचं आगमन झालं आहे. शिल्पा शेट्टी अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करते. यंदाही ती स्वतः गणपतीची मूर्ती आणण्यासाठी गेली होती. बाप्पाला घरी आणताना शिल्पाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता. तिच्यासोबत तिचा पती राज कुंद्रा देखील उपस्थित होता. दोघांनी मिळून मोठ्या श्रद्धेने आणि वाजत-गाजत बाप्पाचे स्वागत केले. यावेळी शिल्पा शेट्टी अतिशय सुंदर अशा पारंपरिक वेशात दिसली. दरम्यान, गेल्यावर्षी शिल्पाच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाली नव्हती. घरात सुतक असल्यानं गणेशोत्सव होणार नसल्याचं शिल्पानं सांगितलं होतं. परंतु, यंदा शिल्पाने दुप्पट उत्साहाने आणि वाजत-गाजत बाप्पाचे स्वागत केले आहे.
हेही वाचा:








