पुणे जिल्हा | पिरंगुटमध्ये साधुसंतांच्या भूमिकेत अवतरले चिमुकले

पिरंगुट, (वार्ताहर) – येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पीडीईए इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलमध्ये वारी सोहळा संपन्न झाला. विविध साधुसंतांच्या भूमिकेत चिमुकले या सोहळ्यात सहभागी झाले होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पंढरपूरची आषाढी वारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आपल्या धार्मिक प्रथा परंपरेची ओळख व्हावी, यासाठी या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्याध्यापिका संध्या तावरे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून या दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली. यात विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत निवृत्ती महाराज, संत सावता माळी, संत मुक्ताबाई, संत सोपान देव, संत जनाबाई आदींची वेशभूषा धारण केली होती. विद्यालयापासून सुरू झालेला हा दिंडी सोहळा ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरापर्यंत पोहोचला.
या ठिकाणी विद्यार्थ्यांनी वारकरी खेळ खेळले. त्यानंतर पुन्हा विद्यालयात येऊन या वारी सोहळ्याची सांगता झाली. शिक्षिका संध्या नवले, वैशाली केदारी, सुनिता रोकडे, सुनीता कुदळे, सायली लाळे, माहेश्वरी लोमटे, वैशाली, सुनीता गोरे, प्रीती गोरे, कांचन गोळे, नीलम लांडगे, कमल मोरे, पौर्णिमा ओव्हाळ यांनी या सोहळ्याचे नियोजन केले होते.





