Mulshi News – मुळशी तालुक्यातील औद्योगिक परिसरात सध्या कामगारांची संख्या झपाट्याने घटताना दिसत असून अनेकांनी आपल्या मूळ गावी परतण्याचा निर्णय घेतला आहे. गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे समोर येत आहे. पिरंगुट, घोटावडे फाटा परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांमध्ये परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने कार्यरत असून, सध्या त्यांना स्वयंपाकासाठी आवश्यक गॅस उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या रोजच्या जेवणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक कामगारांकडे अधिकृत गॅस कनेक्शन नसल्याने सिलेंडर मिळण्यात अडचणी येत आहेत. काही कामगार लहान 5 किलोच्या सिलेंडरवर स्वयंपाक करत होते; मात्र सध्या त्यांचाही तुटवडा जाणवत आहे. परिणामी, उपासमारीची वेळ येऊ लागल्याने अनेकांनी गावाकडे परतण्याचा मार्ग स्वीकारला आहे.काही कंपन्यांमध्ये कॅन्टीन सुविधा नसल्याने कामगारांची अडचण अधिकच वाढली आहे. ज्या ठिकाणी कॅन्टीन सुविधा आहेत, तिथेही गॅसअभावी जेवण पुरवठा सुरळीत होत नसल्याचे दिसून येते. या परिस्थितीचा परिणाम औद्योगिक उत्पादनावरही होत असून अंदाजे 40 टक्के कामगारांनी काम सोडल्याची माहिती समोर येत आहे. कामगारांची कमतरता भासू लागल्याने अनेक कंपन्या अडचणीत सापडल्या असून काही उद्योग बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर कामगारांना गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.