आजच्या टाॅप 10 बातम्या; दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता….

दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता – चंद्रकांत पाटील
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर तंत्र व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता जाहीर होईल, त्यामुळे आपण निवडणुकीच्या तयारीला लागू, दिवाळीचा फायदा करून घ्या, लोकांना भेटून संपर्क वाढवा, असा कानमंत्र पाटील यांनी भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात कार्यकर्त्यांना दिलाय.
मी गद्दाराला उत्तर देत नाही – ठाकरे
शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बोलताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूवरून उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. यावर मी गद्दार, नमकहराम व हरामखोरांना उत्तर देत नाही, अशा कडवट शब्दांत उद्धव ठाकरे यांनी कदमांच्या टीकेला प्रत्युत्तर देणं टाळलं. तर अनिल परब यांनी कदमांचे आरोप खोटे असून त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हंटलंय.
E-KYC अडचणी लवकरच दूर होणार – आदिती तटकरे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची E-KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत आहेत. महिला व बालविकास विभागाने याची दखल घेतली असून, तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपायोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन E-KYC प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होईल, असं आदिती तटकरेंनी म्हटलंय.
महाराष्ट्रात ‘शक्ती’ चक्रीवादळाचा अलर्ट –
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात 3 ते 7 ऑक्टोबर दरम्यान चक्रीवादळाचा इशारा दिलाय. अरबी समुद्रावर येणारे हे या वर्षातील पहिले चक्रीवादळ असून श्रीलंकेने याला चक्रीवादळ शक्ती नाव दिलंय. याचा परिणाम मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जाणवेल. ताशी ४५-५५ किमी वेगाने वारे वाहतील. ५ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर उंच समुद्राच्या लाटा उसळण्याची शक्यता.
कोल्ड्रिफ व नेक्स्ट्रो-डीएस सिरपवर बंदी –
तामिळनाडू आणि मध्य प्रदेशात कोल्ड्रिफ आणि नेक्स्ट्रो-डीएस कफ सिरपवर बंदी घालण्यात आलीय. या सिरपमुळे मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे 11 मुलांचा मृत्यू झाल्याचे मानले जाते. यात विषारी रसायन मिसळलेले असल्याची पुष्टी तामिळनाडू सरकारने केलीय. दरम्यान, केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एक सल्ला जारी केलाय, ज्यात दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना खोकला आणि सर्दीची औषधे देऊ नयेत असं म्हटलंय.
इस्त्रायल-हमास युद्ध थांबणार –
दोन वर्षांपासून सुरु असलेले इस्त्रायल-हमास युद्ध आता थांबण्याच्या मार्गावर आलंय. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा 20 कलमी शांतता करार हमासने मान्य केलाय. हमासने घोषणा केली की ते ट्रम्प यांच्या योजनेत नमूद केल्याप्रमाणे सर्व कैद्यांना सोडण्यास तयार आहेत आणि गाझावरील नियंत्रण सोडण्यास देखील तयार आहेत. यानंतर ट्रम्प यांनी इस्रायलला गाझामध्ये त्वरित हल्ले थांबवण्याचे आवाहन केलेय.
जपानला मिळणार पहिली महिला पंतप्रधान –
जपानला पहिली महिला पंतप्रधान मिळणार आहे. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने (एलडीपी) माजी आर्थिक सुरक्षा मंत्री साने ताकाची यांची अध्यक्षपदी निवड केली आहे. जपानमध्ये बहुमत असलेल्या पक्षाचा अध्यक्षच पंतप्रधान होतो. त्यामुळे त्या पुढच्या पंतप्रधान होतील हे जवळजवळ निश्चित आहे.
भारत-चीन थेट उड्डाणे 26 ऑक्टाॅबरपासून –
पाच वर्षांपासून निलंबित असलेल्या भारत आणि चीन देशांमधील थेट उड्डाणे आता पुन्हा सुरू होणार आहेत. इंडिगो 26 ऑक्टोबर 2025 पासून आपली उड्डाणे पुन्हा सुरू करणार आहे. हा निर्णय दोन्ही देशांमधील हळूहळू सामान्य होत असलेल्या संबंधांचा आणि अलिकडच्या राजनैतिक प्रयत्नांचा परिणाम आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन –
मराठी चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. ‘पिंजरा’ सिनेमात आपल्या नृत्यकौशल्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीने एक तेजस्वी नक्षत्र गमावले आहे. सिनेसृष्टीतील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून, “त्यांचे योगदान विसरता येणार नाही” अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
कसोटीत भारत विजयी, जडेजाला सामनावीर पुरस्कार –
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पाडला. हा सामना भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी एक डाव आणि १४० धावांनी जिंकला. या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या रवींद्र जडेजाला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.





