विविधा : विठ्ठलभाई पटेल

थोर देशभक्त व श्रेष्ठ संसदपटू विठ्ठलभाई जव्हेरभाई पटेल यांचा आज स्मृतिदिन. मध्यवर्ती कायदेमंडळात निवडून आलेले ते पहिलेच लोकनियुक्त अध्यक्ष होते. विठ्ठलभाई पटेल हे सरदार वल्लभभाई पटेल यांचे वडीलबंधू होत. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात खेडा जिल्ह्यात करमसद येथे 18 फेब्रुवारी 1871 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण करमसद येथे व नडियाद येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर मुंबईस वकिलीच्या परीक्षेसाठी आले.
विद्यार्थिदशेतच दिवाळीबाई या युवतीशी त्यांचा विवाह झाला (1897). वकिलीच्या परीक्षेत चांगल्या मार्काने ते पास झाले. त्यानंतर त्यांनी गोध्रा येथे वकिली सुरू केली व आपले धाकटे बंधू वल्लभभाईंच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. पुढे दोघेही बंधू 1898 पासून बोरसद येथे वकिली करू लागले. आठ वर्षे वकिली केल्यानंतर विठ्ठलभाई वर्ष 1905 मध्ये बॅरिस्टर होण्याकरिता इंग्लंडला गेले व वर्ष 1908 मधे बॅरिस्टर होऊन परतले. लंडनमध्ये दादाभाई नौरोजींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय प्रश्नांचा त्यांनी अभ्यास केला.
मुंबईला परत आल्यावर पुन्हा वकिली सुरू केली व 1911 साली मुंबई कायदेमंडळात ते निवडून आले. त्यांनी सर्व बिनसरकारी सभासद एकत्र आणून सरकारी धोरणावर प्रभाव पाडला. भारतात शिक्षण प्रसार व्हावा म्हणून 1916 साली प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात यावे हे विधेयक त्यांनी मांडले व मंजूर करून घेतले. त्यांची ही कामगिरी क्रांतिकारक ठरली. 4 सप्टेंबर 1918 रोजी इंपीरियल कौन्सिलचे ते सभासद झाले. तेथे त्यांनी हिंदू मिश्रविवाहाचा प्रस्ताव मांडला; परंतु कौन्सिल बरखास्त झाल्यामुळे त्याचा विचार झाला नाही.
1915 च्या मुंबई कॉंग्रेसच्या खास अधिवेशनाचे विठ्ठलभाई स्वागताध्यक्ष होते. वर्ष 1919 साली त्यांनी काळा कायदा म्हणून प्रसिद्ध झालेल्या रौलेट ऍक्टवर प्रखर टीका केली. ब्रिटनमध्ये पार्लमेंटने मॉंटेग्यू सुधारणांचा विचार करण्याकरिता जॉइंट सिलेक्ट कमिटी नेमली. त्या समितीपुढे साक्ष देण्याकरिता कॉंग्रेसने पटेलांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पाठविले. तेथे पटेल-टिळकांचे शिष्टमंडळ एकत्र काम करीत असे. असहकारितेच्या आंदोलनातील विधिमंडळ-बहिष्कार पटेलांना मान्य नव्हता, पण त्यांनी पक्षशिस्त पाळण्यासाठी विधिमंडळाचा राजीनामा दिला व निवडणुकीला ते पुन्हा उभे राहिले नाहीत.
पुढे ते स्वराज्य पक्षात गेले. 1922 मध्ये ते मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून आले. त्यांच्या प्रयत्नाने शाळांतून हिंदी शिकविण्यास सुरुवात झाली. सर्व खात्यांत स्वदेशी माल घेण्याचे धोरणही त्यांच्यामुळेच स्वीकारले गेले. नंतर ते मुंबई महानगरपालिकेचे अध्यक्ष झाले. त्यांच्या कारकिर्दीतच गांधींना मानपत्र देण्यात आले. 1923 मध्ये झालेल्या नागपूर झेंडा सत्याग्रहात विठ्ठलभाईंनी नेतृत्व केले. 1923 साली ते मुंबई शहरातून स्वराज्य पक्षातर्फे मध्यवर्ती कायदेमंडळात निवडून गेले. 1926मध्ये पटेल पुन्हा अध्यक्षस्थानी निवडून आले.
1928 मध्ये सरकारने विशिष्ट राजकीय प्रचाराला आळा घालण्यासाठी पब्लिक सेफ्टी बिल आणले. ते विधेयक अध्यक्षांनी नियमबाह्य ठरविले. तथापि सरकारने वटहुकूम काढून हे विधेयक अंमलात आणले. 1932 च्या लढ्यात त्यांना अटक झाली. तुरुंगातच त्यांची प्रकृती अधिक बिघडत गेली. औषधोपचारासाठी ते यूरोपात गेले, तेथे त्यांची प्रकृती अधिकच बिघडली व तेथेच 22 ऑक्टोबर 1933 रोजी त्यांचे निधन झाले.





