विविधा : हृषिकेश मुखर्जी

चित्रपट दिग्दर्शक, संपादक आणि लेखक हृषिकेश मुखर्जी यांचा आज स्मृतिदिन. हृषीदा या नावाने त्यांना ओळखले जाते. हृषिकेश यांचा जन्म कलकत्ता (कोलकाता) येथे 30 सप्टेंबर 1922 रोजी झाला. त्यांनी विज्ञान शाखेतून कलकत्ता विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदवी प्राप्त केली. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्यांनी काही काळ गणित आणि विज्ञानाचे अध्यापनही केले.
वर्ष 1940 मधे त्यांनी कलकत्ता येथील बी. एन. सरकार यांच्या न्यू थिएटर्समध्ये सुरुवातीला कॅमेरामन म्हणून आणि नंतर चित्रपट संपादक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वर्ष 1951 मध्ये त्यांनी मुंबईत बिमल रॉय यांच्यासोबत चित्रपट संपादक आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम सुरू केले. रॉय यांच्या ‘दोन बिघा जमीन’ आणि ‘देवदास’ या महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांचे गुरू बिमल रॉय यांच्यासोबत ‘मधुमती’सारख्या चित्रपटात संपादक म्हणून काम केल्यामुळे, त्यांना संपादक म्हणूनही खूप मागणी होती.त्यांचे चित्रपट वास्तववादी, कौटुंबिक तसेच सर्वसामान्यांना आवडणारे होते. हलकेफुलके सहज भावणारे विनोद ही त्यांच्या चित्रपटांची खासियत होती. त्यांचे धाकटे भाऊ द्वारकानाथ मुखर्जी यांनी त्यांच्या अनेक चित्रपटांची पटकथा लिहिण्यास मदत केली.
वर्ष 1957 मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘मुसाफिर’ हा पहिला चित्रपट. मात्र त्याला यश मिळाले नाही. वर्ष 1959 मधील प्रदर्शित ‘अनाडी’ या चित्रपटाला भरघोस यश मिळाले. या चित्रपटास फिल्मफेअरचे पाच पुरस्कार मिळाले. 40 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे 43 चित्रपट केले. अनुराधा (1960), छाया (1961), असली नकली (1962), अनुपमा (1966), आशीर्वाद (1968), सत्यकाम (1969), गुड्डी (1971), आनंद (1971), बावर्ची (1972), अभिमान (1973), नमक हराम (1973), मिली (1975), चुपके चुपके (1975), आलाप (1977), गोलमाल (1979), खुबसूरत (1980) आणि बेमिसाल (1982) हे खास चित्रपट.
त्यांनी ‘चुपके चुपके’ या चित्रपटाद्वारे धर्मेंद्र यांची विनोदी भूमिकांमध्ये ओळख करून दिली. वर्ष 1970 मध्ये अमिताभ बच्चन यांना ‘आनंद’मधून पहिल्यांदा मोठी प्रसिद्धी दिली तसेच राजेश खन्ना यांच्यासोबत त्यांनी जया भादुरीला ‘गुड्डी’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीतही आणले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर जवळजवळ सर्व चित्रपट तारकांसोबत त्यांनी काम केले. वर्ष 1998 मधील ‘झुठ बोले कौवा काटे’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. हम हिंदुस्तानी, तलाश, धूप छाँव, रिश्ते, उजाले कि ओर, गर ऐसा हो या पाच दूरदर्शन मालिकाही केल्या. सुमारे 21 चित्रपटांचे संकलन केले.
फिल्मफेअरचे त्यांना सुमारे 13 पुरस्कार मिळाले. अन्य पुरस्कारांची संख्या पंधराच्या वर आहे. वर्ष 1999 मध्ये मुखर्जी यांना भारत सरकारने ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मानित केले. वर्ष 2001 मध्ये भारत सरकारने भारतीय चित्रपटातील योगदानासाठी त्यांना ‘पद्मविभूषण’ हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने नोव्हेंबर 2005 मध्ये त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कार्याबद्दल त्यांना सन्मानित केले. मुखर्जी हे ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ आणि ‘नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे’ अध्यक्ष होते. मुखर्जी यांना दोन मुले आणि तीन मुली आहेत. त्यांच्या पत्नीचे अगोदरच निधन झाले होते. मुखर्जी यांचे 27 ऑगस्ट 2006 रोजी मुंबईत निधन झाले.





