पुसेगाव, (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारी वर्धनी माता ही नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या किल्ले वर्धनगड या किल्ल्यावरती या देवीचे सुंदर मंदिर आहे. नवरात्र उत्सवामध्ये या देवीला भाविक येत असतात. परंतु, अष्टमी शुक्रवार, दि . 11 ऑक्टोबर रोजी देवीची यात्रेचा मुख्य दिवस आहे. या दिवशी गावातून पालखी किल्ल्यावरती नेली जाते व पालखीचे संपूर्ण किल्ल्यावरती मिरवणूक काढली जाते. यावेळी देवीच्या समोर ललगुणचे कळसकर गोंधळी यांचा गोंधळाचा कार्यक्रम होतो. देवीचे विविध मानकरी आणि हजारो भाविक देखील यावेळी किल्ल्यावरती उपस्थित असतात. यात्रेच्या निमित्ताने विविध खेळण्याची दुकाने मिठाईची दुकाने आलेली असतात. या यात्रेनिमित्ताने दि. 12 रोजी जंगी कुस्त्याचे मैदान होणार आहे. या देवीला अष्टमीला कडकणी व धपाटणे यांचा नैवेद्य दाखवला जातो. नवमी दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. दसऱ्याच्या दिवशी देवीच्या पालखीची संपूर्ण गावातून मिरवणूक काढली जाते. यानंतर या नवरात्रोउत्सवाची सांगता होत असते. नऊ दिवस चालणार देवीचा कार्यक्रम उत्साहामध्ये गावकरी साजरा करतात. यामध्ये वर्धनगड व पंचक्रोशीतील ग्रामस्थ सहभागी होतात.