पुणे | आरटीई अर्ज भरण्यासाठी आज शेवटची संधी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी अॉनलाइल अर्ज दाखल करण्यासाठी देण्यात आलेली मुदतवाढ मंगळवारी (दि.४) संपणार आहे. खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील बालकांना आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येणार आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवित असलेल्या शाळांना राज्य शासनाकडून शुल्क प्रतिपूर्ती अदा करण्यात येणार आहे. आरटीई प्रवेशासाठी राज्यातील ९ हजार २१० शाळांमध्ये १ लाख ५ हजार १२३ प्रवेशाच्या जागा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. यासाठी २ लाख ३७ हजार १२६ अर्ज दाखल झाले आहेत.
पुणे जिल्ह्यातुन ९७० शाळांमधील १७ हजार ७१४ जागांसाठी ४७ हजार ३५३ प्रवेश अर्जांची नोंदणी झालेली आहे. औरंगाबादमध्ये १४ हजार ८२९, नागपुरमध्ये २० हजार २६, नाशिकमधून १४ हजार ४४१, ठाण्यातुन १९ हजार १९४ याप्रमाणे अर्ज दाखल झाले आहेत. बहुसंख्य जिल्ह्यातुन प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहे.




