विविधा : हेन्री फोर्ड

अमेरिकेतील मोटरगाडी उद्योगाचे प्रवर्तक हेन्री फोर्ड यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 30 जुलै 1863 रोजी मिशिगन राज्यातील डिअरबॉर्न या गावी एका सधन शेतकरी कुटुंबात झाला. शालेय शिक्षणानंतर 1879 मध्ये हेन्री डेट्रॉइट येथील एका यंत्र कारखान्यात काम करू लागले. याच काळात ते रात्रीच्या वेळी घड्याळे दुरुस्त करीत असत तसेच वेस्टिंगहाउस कंपनीत रस्त्यावरील इंजिनांच्या दुरुस्तीचेही काम करीत असत.
वर्ष 1889 मध्ये हेन्री यांचा क्लॅरा जेन ब्रिअँट या युवतीशी विवाह झाला. त्यानंतर डेट्रॉइटला “एडिसन इल्युमिनेटिंग कंपनी’त अभियंता म्हणून काम करू लागले. 1895 मध्ये ते या कंपनीचे प्रमुख अभियंता झाले आणि त्याचवेळी थॉमस अल्वा एडिसन हे प्रसिद्ध संशोधक हेन्री यांचे जिव्हाळ्याचे मित्र बनले. याच काळात हेन्री यांचे अश्वरहित गाडी (हॉर्सलेस कार) तयार करण्याचे प्रयत्न चालूच होते.
वर्ष 1896 मध्ये त्यांनी आपली पहिली गाडी तयार केली. या गाडीला दोन सिलिंडर व सायकलची चार चाके लावण्यात आली होती. त्याच सुमारास यूरोपमध्ये “मार्कस’, “डेम्लर’ व “बेंझ’ या मोटरगाड्या रस्त्यावरून धावू लागल्या होत्या. त्याचप्रमाणे दुर्येबंधू, एल्वुड हेन्झ यासारख्यांनी अमेरिकेत फोर्डपेक्षाही अधिक चांगल्या गाड्यांचा शोध लावला होता. हेन्री यांनी शर्यतीच्या गाड्या तयार केल्या. त्यांपैकीच “999′ ही शर्यतगाडी प्रसिद्ध शर्यतपटू बार्नी ओल्डफिल्ड यांनी चालविली होती आणि नेत्रदीपक विजय मिळविले होते.
हेन्री फोर्ड यांनी द डेट्रॉइट ऑटोमोबाइल कंपनी व हेन्री फोर्ड कंपनी अशा दोन कंपन्यांची भागीदारी पत्करली. मात्र, द डेट्रॉइट ऑटोमोबाइल कंपनी बंद पडली आणि दुसऱ्या कंपनीतून ते बाहेर पडले. लवकरच हेन्री यांनी शर्यतीच्या गाड्यांचे उत्पादक व चालक अशी प्रसिद्धी मिळविली. अल्प किमतीची, जनसामान्यांना परवडेल अशी मोटरगाडी बनण्याची कल्पना हेन्री यांच्या मनात घोळत होती. “999′ शर्यतगाडीच्या विजयानंतर डेट्रॉइट येथील माल्कमसन या धनाढ्य कोळसा व्यापाऱ्याने हेन्री यांना अर्थसाहाय्य देण्याचे मान्य केले व वर्ष 1903 मध्ये “फोर्ड मोटार कंपनी’ ही एक नवीनच कंपनी माल्कमसनच्या भांडवलावर स्थापन करण्यात आली. या कंपनीत हेन्री यांची केवळ 25 टक्के मालकी होती. या कंपनीला यश लाभले.
1895 मध्ये जॉर्ज बॉल्डविन सेल्डेन या अमेरिकन वकील-संशोधकाने रस्त्यावरील इंजिनाचा शोध लावून त्याचे एकस्वाधिकार मिळविले होते. त्यामुळे मोटरगाड्यांचे कारखानदार सेल्डेनला त्यांच्या इंजिनाचे स्वामित्वशुल्क देत व त्यांचे इंजिन वापरण्याचा परवाना मिळवीत असत. मात्र, फोर्ड यांना असा परवाना नाकारण्यात आला. फोर्ड यांनी आपली पहिली मोटरगाडी बनविली तेव्हा सेल्डेन यांनी फोर्ड यांच्यावर एकस्व-भंगाची फिर्याद गुदरली. 8 वर्षांच्या न्यायालयीन कामकाजानंतर न्यायालयाने एकस्व खरे असले, तरी फोर्ड यांनी त्याचे उल्लंघन केले नाही. कारण, त्यांचे इंजिन सेल्डेन इंजिनापेक्षा मूलभूत स्वरूपात निराळे आहे, असा निकाल दिला. फोर्ड कंपनीस यामुळे मोठीच प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर चार वर्षांतच प्रतिवर्षी 40 हजार प्रमाणे या गाड्यांचे उत्पादन होऊ लागले. फोर्ड कंपनीचा विस्तार जगभर पसरला. हेन्री फोर्ड यांचे 7 एप्रिल 1947 रोजी निधन झाले.





