Sachin Pilgaonkar : “रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना….”; सचिन पिळगांवकर ट्रोलर्सवर चांगलेच भडकले
मला ट्रोलिंगचा काही त्रास होत नाही. मी त्यावर बोललो नाही, कारण माझ्याकडे वेळच नाही. मला काम करण्यात जास्त रस आहे. मी माझ्या कुटुंबाला वेळ देईन.

Sachin Pilgaonkar : मराठी मनोरंजनविश्वात काही कलाकार असे आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. या कलाकारांमध्ये ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांचं नाव आवर्जून घेतलं जातं.
बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणाऱ्या सचिन यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती अशा विविध क्षेत्रांत ठसा उमटवला आहे. त्यांच्या अभिनयातील सहजता, विनोदाची अचूक जाण आणि चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ अनुभव यामुळे आजही ते प्रेक्षकांच्या चर्चेत असतात. मात्र, लोकप्रियतेसोबतच सोशल मीडियावरील ट्रोलिंगचाही सामना त्यांना करावा लागतो.
विशेष म्हणजे, सचिन पिळगांवकर यांनी अनेकदा मुलाखतींमध्ये चित्रपटसृष्टीतील जुन्या आठवणी आणि अनुभव सांगितले आहेत. मात्र, त्यांच्या काही विधानांवरून सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसते. ‘शोले’ या हिंदी चित्रपटाशी संबंधित एका जुन्या मुलाखतीतील किस्स्यावरूनही त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सचिन यांनी ट्रोलिंगबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ट्रोलर्सना उत्तर देण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींना वेळ देणं त्यांना अधिक योग्य वाटतं. विशेष म्हणजे, ट्रोल करणाऱ्यांबद्दल बोलताना त्यांनी रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या लोकांचं उदाहरण दिलं. त्यांच्या या विधानाने लक्ष वेधून घेतलं आहे. ‘मला ट्रोलिंगचा काही त्रास होत नाही,’ असं स्पष्ट सांगत त्यांनी टीका करणाऱ्यांपेक्षा आपल्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांचा विचार करत असल्याचंही म्हटलं आहे.
‘रस्त्यावर कुत्रे असतात… तर मी कोण?’
‘झी २४ तास’च्या ‘टू द पॉईंट’ या कार्यक्रमाला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगांवकर यांनी ट्रोलिंगबाबत आपलं मत मांडलं. ते म्हणाले, “ट्रोलिंग ना! अहो, रस्त्यावर कुत्रे असतात. त्यांना काही लोक खायला घालतात, त्यांनाही ट्रोल केलं जातं. लोक कुत्र्यांना आपल्या घरातलं खायला घालण्यासाठी घरात पदार्थ तयार करतात. ही एक संवेदनशील गोष्ट आहे. त्यांनाही ट्रोल केलं जातं. तर मी कोण?”
“मला ट्रोलिंगचा काही त्रास होत नाही. मी त्यावर बोललो नाही, कारण माझ्याकडे वेळच नाही. मला काम करण्यात जास्त रस आहे. मी माझ्या कुटुंबाला वेळ देईन. सुप्रिया आणि श्रियाला बाहेर घेऊन जाईन, फिरायला. त्यावर मी उत्तर कशाला देऊ?” असं सचिन यांनी म्हटलं.
“मी माझा सोशल मीडिया सांभाळत नाही. मी त्यांना सांगितलं आहे की कमेंट ऑफचं बटण ऑन करायचं नाही. तिथे कमेंट येऊ देत. ज्यांना बोलावसं वाटतं, प्लीज बोलू द्या. ती महाराष्ट्राची पोरं आहेत, म्हणजे ती माझीच आहेत. या महाराष्ट्रानं मला खूप काही दिलं आहे. त्याची परतफेड मी करू शकत नाही,” असं सचिन म्हणाले.
“अशा कमेंट करणाऱ्यांपेक्षा प्रेम करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. मी त्यांचा विचार करतो, मी ट्रोलर्सचा विचार करत नाही. शिवाय, मला जे ट्रोल करतात त्यापैकी अनेकजण माझ्यावर प्रेम करत नसतील, हे आपण कसं काय म्हणणार? जर माझ्या करिअरच्या ६३ व्या वर्षीही लोकांना इतका महत्त्वाचा वाटत असेन, तर आणखी काय हवं?” असं म्हणत सचिन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.






