धडा शिकवण्यासाठी कोरोनाबाधित सासूने चक्क सूनेलाच मारली घट्ट मिठी; रिपोर्ट आला पॉझिटिव्ह अन्

हैदराबाद : इतिहासापासून ते आजपर्यंत सासू सून यांच्यातील भांडण कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. एकमेकींवर कुरघोडी करण्यासाठी दोघीपण प्रयत्न करत असतात. अशीच एक घटना हैदराबादमध्ये घडली आहे. सुनेचा बदला घेण्यासाठी करोनाबाधित असलेल्या सासूने तिला घट्ट मिठी मारल्याचा विचित्र प्रकार घडला आहे.
सुनेलाही करोनाची लागण व्हावी या उद्धेशाने सासूने तिला मिठी मारली आणि घडलं पण तसंच. सुनेचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आल्याने सासूने तिला घराबाहेर काढले आहे. तेलंगणातील एका जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित सून ३ वर्षापूर्वी कामारेड्डीमधील युवकासोबत लग्न करून सासरी आली होती.
काही दिवसांपूर्वी सासूला करोनाची लागण झाली. तिला होम क्वारंटाईनमध्ये ठेवले होते. या काळात घरातील सूनेने सासूपासून काही अंतर पाळले. करोना नियमांचे पालन करत सूनेने सासूपासून सोशल डिस्टेंसिंग राखले नेमके हेच सासूला खटकले. सूनेचे वागणे सासूला सहन झाले नाही. हाच राग मनात ठेऊन सासूने सुनेला आणि नातवालाही मिठी मारली. त्यानंतर सूनेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.
जे सासूच्या मनात होते ते घडल्याने सासूही भलतीच खुश झाली. तिने सूनेचा बदला घेण्यासाठी तिला घराबाहेर काढले. त्यानंतर पीडित सुनेच्या बहिणीने हा प्रकार सगळ्यांसमोर उघड केला तेव्हा ऐकणाऱ्यांना धक्काच बसला.
सासूने बाहेर हाकलल्यानंतर पीडिता बहिणीच्या घरी गेली आणि तिथे होम क्वारंटाईन झाली. बहिणीने योग्य ती खबरदारी घेत आवश्यक ती व्यवस्था केली. पीडित महिलेचा पती ओडिसामध्ये असल्याने त्याला पत्नीच्या अशा अवस्थेत मदतही करता आली नाही. पैसे कमवण्यासाठी पती ओडिसाला राहत असल्याचे कळाले आहे.
गेल्या महिन्यात देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १.२ लाखांहून अधिक आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात एकूण १.७ लाख लोकांचा मृत्यू झाला. तिसऱ्या लाटेसाठी योग्य तयारी केल्यास हाच आकडा ४० हजारांपर्यंत आणता येईल. दुसऱ्या लाटेदरम्यान प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांचे प्रमाण २० टक्के होते. तिसऱ्या लाटेदरम्यान ते ५ टक्क्यांवर राहिल्यास जीवितहानी मोठ्या प्रमाणात टाळता येईल, असं अहवालात नमूद करण्यात आले आहे. यासाठी आरोग्य सुविधा उभारण्यावर आणि लसीकरण मोहिमेला गतीमान करण्यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.




