Pune Farmers : बळीराजा मेटाकुटीला, नव्या वर्षांत रासायनिक खतांची होणार दरवाढ

पुणेः आधीच राज्यातील शेतकरी वाढलेल्या महागाईमुळे त्रस्त असतानाच आता नव्या वर्षांत रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने बळीराजा आता पूरता मेटाकुटीला आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामात झालेले नुकसान कसे भरून काढावे, असा प्रश्न भेडसावत असतानाच आता वाढलेल्या रासायनिक खतांचा भुर्दंड सोसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
नव्या वर्षांत रसायनिक खतांच्या किंमतीमध्ये तब्बल २०० ते ३०० रुपयांनी वाढ होणार आहे. यामुळे बळीराजा आता पुरता हवालदिल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही वाढलेली दरवाढ १ जानेवारी २०२५ पासून लागू करण्यात येणार आहे. वाढलेल्या रासायनिक खतांच्या किंमतींमुळे बळीराजा चिंताग्रस्त झाले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत मोठी वाढ होणार आहे.
अशी आहे नवी दरवाढ
- नव्या वाढलेल्या दरवाढीनुसार, डीएपी (डाय अमोनियम फॉस्फेट) खताची किंमत प्रतिपिशवी 1 हजार 350 रुपयांवरून 1 हजार 590 रुपये झाली आहे.
- टीएसपी 46 टक्के (ट्रिपल सुपर फॉस्फेट) खताची किंमत 1300 ऐवजी 1350 रुपयांवर पोहचला आहे. तर 10:26:26 आणि 12:32:16 या खतांच्या किमती 1470 रुपयांवरून 1725 रुपये होणार आहे.
आर्थिक आव्हाने वाढणार
नव्या वाढलेल्या रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे २०० ते ३०० रुपये अतिरिक्त देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना रासायनिक खतांऐवजी सेंद्रीय खतांची वापर वाढवावा लागणार आहे. याला जोडधंडा म्हणून अनेक शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय सुरू केला. मात्र, भाव मिळत नसल्याने अनेकांनी तो बंद केला असल्याने आता आगामी काळात शेतकऱ्यांपुढची आर्थिक आव्हाने वाढणार आहेत.



