Tirupati Mandir Laddu : तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादातील तुपात भेसळ; ईडीकडून कंपनीच्या मालकाला अटक
Tirupati Mandir Laddu : तिरुपती लाडू बनवण्यासाठी निकृष्ट दर्जाच्या आणि भेसळयुक्त तुपाचा वापर झाल्याचा कंपनीवर गंभीर आरोप

Tirupati Mandir Laddu : प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादातील लाडू तूप भेसळ प्रकरणात ED ने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी तिरुमला तिरुपती देवस्थानमला पुरवलेल्या तुपात भेसळ केल्याप्रकरणी ‘सुकृती फूड्स’चे प्रवर्तक कैलासचंद मंगला यांना EDकडून अटक करण्यात आली आहे. कैलाश चंद मंगलाला विशाखापट्टणम येथील मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
तिरुपती लाडू बनवण्यासाठी निकृष्ट दर्जाच्या आणि भेसळयुक्त तुपाचा वापर झाल्याचा गंभीर आरोप या कंपनीवर आहे. या अटकेमुळे आता या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार आणि मोठ्या साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Tirupati Mandir Laddu)
ईडीनुसार,२०१९ ते २०२४ दरम्यान तिरुमला तिरुपती देवस्थानमला (TTD) केलेल्या या बनावट पुरवठ्याची एकूण किंमत सुमारे २३० कोटी रुपये असल्याचा अंदाज ईडीने वर्तवला आहे. यापैकी ९६ कोटी रुपयांचे भेसळयुक्त तूप ‘सुकृती फूड्स प्रायव्हेट लिमिटेड’चे प्रवर्तक कैलासचंद मंगला यांनी बनवल्याचा आरोप आहे. तसेच ‘ॲगमार्क स्पेशल ग्रेड काऊ तूप’ म्हणून पुरवलेल्या तुपात रिफाइंड पाम तेल, पाम कर्नल तेल, पॉमोलीन आणि अनेक रसायनांचा वापर करून ते बनवल्याचा आरोप आहे. (Tirupati Mandir Laddu)
तुपाऐवजी कोणत्या तेलांचा वापर? (Tirupati Mandir Laddu)
तिरुपती लाडू प्रसाद तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे भेसळयुक्त तूप हे रिफाइंड पाम तेल, पाम कर्नल तेल, पामोलिन आणि एमजी-९०, मोनोग्लिसराइड्स, मायव्हेसिट सॉफ्ट ४०० व ऍसिटिक ऍसिड एस्टर यांसारख्या विविध रसायनांचा वापर करून तयार करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
एजन्सीने म्हटले आहे की, मंगला या प्रकरणातील सह-आरोपींपैकी एक होता. त्याने भेसळयुक्त पदार्थ मिळवण्यास मदत केली आणि त्याच्या कारखान्यात भेसळयुक्त तूप तयार केले. सरकारने नियुक्त केलेल्या एका समितीने मे २०२६ मध्ये टीटीडीच्या खरेदी प्रक्रियेत त्रुटी असल्याचे अहवालात नमूद केले होते, ज्यामध्ये टेंडर प्रक्रिया आणि पुरवठादारांच्या निवडीतील त्रुटींचा समावेश होता.
तिरुपती प्रसादाचा लाडू कसा बनवला जातो? (Tirupati Mandir Laddu)
तिरुपती लाडू १७१५ पासून तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात प्रसाद म्हणून अर्पण केला जात आहे. याला ‘श्रीवारी लाडू’ म्हणून ओळखले जाते. २०१४ मध्ये या लाडूला भौगोलिक मानांकन (GI Tag) मिळाले, ज्यामुळे केवळ टीटीडीद्वारे तिरुमला येथे तयार केलेल्या लाडूंनाच कायदेशीररित्या हे नाव वापरण्याचा अधिकार आहे. प्रत्येक लाडू मंदिराच्या ‘पोटू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विशिष्ट स्वयंपाकघरात बनवला जातो. आचारी आत प्रवेश करण्यापूर्वी कठोर धार्मिक आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करतात. सामान्य दिवशी मंदिर सुमारे ३.५ लाख लाडू तयार करते. तर मोठ्या सणांमध्ये ही संख्या चार लाखांहून अधिक होते.
हेही वाचा:





