“देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा”; तिरूपती प्रसादाच्या वादातील प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

Tirupati temple Ladu Prasad Case | आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या वादावरील याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. यादरम्यान सुप्रीम कोर्टाने आंध्र प्रदेश सरकारच्या वकिलालाही अनेक प्रश्न विचारले. याशिवाय मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तुपामध्ये फिश ऑईल आणि प्राण्यांची चरबी आढळल्याचा दावा करणारा प्रयोगशाळेचा अहवाल जारी केल्याच्या वेळेचीही सुप्रीम कोर्टाने दखल घेतली.
ज्या तूपाची चाचणी करण्यात आली ते तूप नाकारण्यात आल्याचे लॅबच्या अहवालावरून स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याशिवाय न्यायालयाने राज्य सरकारला विचारले की, एसआयटी तपासाचे आदेश दिल्यानंतर पत्रकारांकडे जाण्याची काय गरज होती? किमान देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आहेत.
सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील राजशेखर राव यांनी न्यायालयाला सांगितले की, ते येथे एक भक्त म्हणून आले आहेत आणि प्रसादातील दूषिततेबाबत प्रेसमध्ये केलेल्या वक्तव्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात आणि त्यामुळे इतर अनेक समस्या उद्भवू शकतात, जातीय सलोखा बिघडू शकतो. ही चिंतेची बाब आहे. देवाच्या प्रसादावर प्रश्नचिन्ह असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे.
जस्टीस बी.आर. गवई यांनी आंध्र प्रदेश सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, “जेव्हा तुम्ही संवैधानिक पद धारण करता तेव्हा तुमच्याकडून देवांना राजकारणापासून दूर ठेवण्याची अपेक्षा असते.” न्यायालयाने रोहतगी यांनाही विचारले, “तुम्ही एसआयटीसाठी आदेश दिलेत, निकाल येईपर्यंत प्रेसमध्ये जाण्याची काय गरज आहे? तुम्ही नेहमीच अशा प्रकरणांमध्ये हजर राहता, ही दुसरी वेळ आहे.”
चंद्राबाबू नायडू सरकारच्या वतीने रोहतगी यांनी युक्तिवाद केला की या ‘खऱ्या याचिका नाहीत’. सध्याच्या सरकारवर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न मागील सरकारकडून करण्यात आला आहे. लाडू बनवताना दूषित तूप वापरल्याचा पुरावा काय आहे, अशी विचारणाही सर्वोच्च न्यायालयाने केली. यावर तिरुपती मंदिराचे वकील सिद्धार्थ लुथरा यांनी खंडपीठाला सांगितले की, आम्ही तपास करत आहोत. यानंतर न्यायमूर्ती गवई यांनी विचारले, “मग लगेच प्रेसमध्ये जाण्याची काय गरज होती? तुम्ही धार्मिक भावनांचा आदर करा.”
दरम्यान,आंध्र प्रदेशातील वायएसआरसीपी सरकारच्या काळात तिरुमला मंदिराच्या प्रसिद्ध तिरुपती लाडू प्रसादममध्ये प्राण्यांची चरबी मिसळली जात असल्याचा आरोप आहे. त्यात म्हटले आहे की लाडूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या गाईच्या तुपाच्या नमुन्यांच्या प्रयोगशाळेच्या विश्लेषणात स्वयंपाकात वापरण्याची प्राण्यांची चरबी, टॅलो (गोमांस चरबी) आणि माशाचे तेल आढळून आले.





