Tiranga Rally Satara: साताऱ्यात देशभक्तीचा जल्लोष! ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा दुचाकी रॅली
Tiranga Rally Satara: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सातारा शहर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले; हजारो सातारकर, आजी-माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची रॅलीत मोठी उपस्थिती.

Tiranga Rally Satara – स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशभक्तीची भावना जागविण्यासाठी शहरात तिरंगा दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत राजवाडा ते पोवई नाका या मार्गावर निघालेल्या या रॅलीला सातारकरांनी मोठा प्रतिसाद दिला. हातात तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या जयघोषाने शहराचा परिसर दुमदुमून टाकला.
गांधी मैदान, राजवाडा परिसरातून रॅलीला सुरुवात झाली. गोलबाग येथे ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी थोरले प्रतापसिंह महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर रॅली मोती चौकमार्गे पोवई नाक्याकडे रवाना झाली. मार्गावर नागरिकांनी रॅलीचे स्वागत केले. रॅलीचा समारोप शिवतीर्थ, पोवई नाका येथे झाला.
यावेळी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले व उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. या उपक्रमात आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि हजारो नागरिक सहभागी झाले होते. सातारकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नागरिकांचे आभार मानले.





