Satara News : राजवाडा परिसरात उभे राहणार बहुमजली पार्किंग; शिवेंद्रसिंहराजेकडून पाहणी

सातारा : राजवाडा परिसरातील सर्वे नंबर 270 म्हणजेच जुन्या जनावरांच्या दवाखान्याची जागा लवकरच सातारा नगरपालिकेकडे हस्तांतरित होणार आहे. राजवाडा परिसरातील पार्किंगचा प्रश्न सोडवणारा बहुमजली पार्किंग प्रकल्प तसेच अद्ययावत स्वरूपाची खाऊ गल्लीबोट टेरेसवर कॅफेटेरिया असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकार घेत आहे. या प्रकल्पाला तब्बल 50 कोटी रुपये खर्च होणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या भांडवली खर्च निधीमधून हा प्रकल्प आकार घेत आहे. सातारा पालिकेने याबाबतची निविदा अंतिम केली असून लवकरच ठेकेदाराच्या माध्यमातून हे काम सुरू होणार आहे. राजवाडा परिसरातील जुन्या जनावरांची जागा ही सातारा जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे या जागेसाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सातारा नगरपालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत.
सातारा शहरातील विशेषतः राजवाडा परिसरातील वाहतुकीची कोंडी व पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी जुन्या जनावरांच्या दवाखान्याच्या जागेत तीन मजली पार्किंग इमारत उभी राहणार आहे. पहिल्या मजल्यावर हॉकर्स साठी खाऊ गल्लीवरच्या दोन मजल्यावर चार वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग तळ आणि टेरेसवर स्वतंत्र कॅफेटेरिया उभारला जाणार आहे व बेसमेंट मध्ये दीडशे दुचाकी मावतील इतकी प्रशस्त जागा उपलब्ध होणार आहे तसेच अडीचशे वाहनांचे दुमजली पार्किंग तळ उभे केले जाणार आहे.
राजवाड्यासमोरील चौपाटीचे या जागेमध्ये लवकरच स्थलांतरण होणार आहे त्यामुळे राजवाडा परिसर हा मोकळा राहणार असून तेथे स्वतंत्र लँडस्केप विकसित केले जाणार आहे. मुंबई येथील एन एम ए संस्थेकडून या प्रकल्पाचा मानक नकाशा तयार करण्यात आला आहे. याची पाहणी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सोमवारी सकाळी केली. यावेळी माझी उपनगराध्यक्ष अविनाश कदम माजी नगराध्यक्ष अशोक मोरे, माजी उपनगराध्यक्ष जयवंतदादा भोसले, अमोल मोहिते पालिकेचे अभियंता दिलीप चिद्रे, नगर अभियंता प्रतीक वैराट तसेच ठेकेदार कंपनीचे सदस्य उपस्थित होते.
जुना दवाखाना अन्यत्र हलवणार
भवानी पेठ सिटी सर्वे नंबर 270 येथील सातारा जिल्हा परिषदेच्या मालकीचा जुना जनावरांचा दवाखाना हा जवळपास पावणे दोन एकरामध्ये पसरलेला आहे. या दवाखाना परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर जुनी झाडे आहेत. ही झाडे कशा पद्धतीने वाचवता येतील आणि त्यांना धक्का न लावता बहुमली पार्किंग इमारत कशी उभी करायची त्याच्या स्पष्ट सूचना ठेकेदार कंपनीला देण्यात आलेले आहेत, असे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. येथील जनावरांचा जुना दवाखाना अन्यत्र हलवण्यात येणार असून नगरपालिकेकडून ही इमारत स्वतंत्ररित्या बांधून दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.





