“काळ बदलतो, राजकीय परिस्थिती…”; राष्ट्रवादी आमदाराच्या ऑफरवर अमित देशमुखांनी स्पष्टच सांगितल

Amit Deshmukh | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील आमदार विक्रम काळे यांनी अमित देशमुख यांना ऑफर दिली आहे. “इतकं चांगलं काम करणारा व्यक्ती मंत्रिमंडळात असला पाहिजे. ही आमची आणि संजय बनसोडेंची खूप इच्छा आहे. तो योग कसा येणार हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्ही सगळे जण सुद्धा वाट बघत आहेत की भैय्या कधी उडी घेणार?”, असं विधान आमदार विक्रम काळे यांनी लातुरमध्ये आयोजित कार्यक्रमात केले. विक्रम काळेंनी केलेल्या विधानावर “जिथे आहोत तिथे आनंदी आहोत” अशा शब्दात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमित देशमुख यांचे प्रत्युत्तर
विक्रम काळेंनी दिलेल्या ऑफरवर अमित देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. “विक्रम काळे दरवेळेला एका नव्या चित्रपटाची निर्मिती करतात. तेच दिग्दर्शन, निर्मिती, पटकथा, अभिनय सगळं करतात. मात्र हे त्यांचं माझ्यावरील प्रेम आहे. पण, मला असं वाटतं की, जसा सामाजिक समतोल असला पाहिजे. तसा राजकीय समतोल सुद्धा असायला हवा.”
“तराजूप्रमाणे सगळेच जर तिथे जाऊन बसले तर… त्यामुळे तो समतोल राखण्याचं काम लोकशाहीमध्ये अभिप्रेत असतं. तुम्ही जिंकलात, पण ज्यांनी महाविकास आघाडीला मते दिलेली आहेत, त्या मतांचा आदरसुद्धा करणं आमचं काम आहे. जिथे आहोत तिथे आनंदी आहोत. भविष्यात तुम्हीच कदाचित इकडे याल, असं होऊ शकतं. काळ बदलतो, राजकीय परिस्थिती बदलत राहते”, असं अमित देशमुख यांनी विक्रम काळे यांनी दिलेल्या ऑफरवर उत्तर दिले.
विक्रम काळे काय म्हणाले होते?
लातूरमध्ये आयोजित कार्यक्रमात विक्रम काळे म्हणाले, “अमित देशमुख हे 2023 साली सांस्कृतिक मंत्री असताना फेस्टिव्हलची सुरूवात केली होती. मात्र ते आज मंत्री नाहीत, तरीसुद्धा ही परंपरा कायम ठेवण्याचं काम अमित देशमुखांनी केलेलं आहे. एवढं चांगलं काम करणारा माणूस मंत्रिमंडळात असायला पाहिजे, ही आमची आणि संजय बनसोडेंची खूप इच्छा आहे,” असं विक्रम काळे म्हणाले. Amit Deshmukh |
“मी त्यांच्या पलीकडून बसलो, अलिकडून संजय बनसोडे बसलेले आहेत. गरज पडली तर जब्बार पटेल कानात सांगायला बसलेले आहेत. त्यामुळे हा योग लवकर जुळवून यावा. सगळेजण वाट बघत आहेत, की भैय्या कधी उडी घेणार, त्यामुळे तो योग येईल अशी अपेक्षा करतो”, असं मोठं विधान अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांनी केलं आहे. Amit Deshmukh |
हेही वाचा:





