माणिकराव कोकाटेंच्या कोर्टाच्या निर्णयावरून वाद? विजय वडेट्टीवार म्हणाले, “उद्या एखाद्याने खून केला तर…”

Vijay Wadettiwar On Manikrao Kokate | कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका घेतल्याचा आरोप आहे. या संदर्भात न्यायालयाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. मात्र त्यानंतर कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देताना नाशिकच्या सत्र न्यायालयाने काही महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. कोकाटेंना शिक्षा दिली तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पुन्हा घेण्याची वेळ येईल आणि जनतेचा पैसा खर्च होईल, असे निरीक्षण नाशिक सत्र न्यायालयाने नोंदवले आहे.
नाशिक न्यायालयाच्या निरीक्षणानंतर विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर हल्लाबोल केला आहे. उद्या एखाद्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आणि न्यायालयाने खर्चाची भूमिका घेतली तर खुनातील आरोपी मोकाट फिरू शकतो, असे वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे.
…तर पोटनिवडणुक घ्यावी लागेल
माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाली असती तर ते अपात्र झाले असते. अपात्र झाले असते तर पोटनिवडणुक घ्यावी लागली असती, आणि जनतेचा पैसा खर्च झाला असता. खर्च टाळण्यासाठी माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला ट्रायल कोर्टाने स्थगिती दिली. न्यायालयाने नमूद केले की, शिक्षा स्थगित करण्यासाठी गुन्ह्याचे स्वरूप, त्याचे गांभीर्य आणि व्यापक सामाजिक परिणाम विचारात घेणे आवश्यक आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात शिक्षा सुनावण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीचा उल्लेखही सत्र न्यायाधीशांनी केला.
नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार ?
“निवडणुकीचा खर्च वाढणार आहे, म्हणून आम्ही माफ करतो न्यायालयाची अशी भूमिका हास्यास्पद आहे. न्यायालय असं वागणार असेल तर न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी? उद्या एखाद्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आणि न्यायालयाने खर्चाची भूमिका घेतली तर खुनातील आरोपी मोकाट फिरू शकतो. गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. तो लोकप्रतिनिधी असो वा नसो सर्वांना एकसमान न्याय दिला पाहिजे,” असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
नेमकं प्रकरण काय?
नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या.
यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली होती. गुरुवारी (दि. 20) या प्रकरणात नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. Vijay Wadettiwar On Manikrao Kokate |
हेही वाचा:
Brahmastra 2 : ‘ब्रह्मास्त्र २’ कधी येणार? स्वतः रणबीर कपूरने दिले महत्वाचे अपडेट, सांगितलं…





