Amit Thackeray | मनोज जरांगे यांनी मागील चार दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. सुरुवातीला मराठा बांधवांना गैरसोयींचा सामना करावा लागला होता. मात्र आता राज्यभरातून मराठा आंदोलकांच्या मदतीसाठी अनेकजण धावत आहेत. अशातच मनसे नेते अमित ठाकरे यांनीही मनसेच्या कार्यकर्त्यांना मराठा आंदोलकांना अन्न-पाणी पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. एकीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. तर दुसरीकडे मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मनसैनिकांना मराठा बांधवांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत आलेल्या मराठ्यांना कशाची कमी पडू देऊ नका, त्यांना एकटा आहे हे वाटू देऊ नका. त्यासाठी मनसेकडून हवी ती मदत करा, असं आवाहन अमित ठाकरे यांनी मनसैनिकांना केले आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी नुकतंच त्यांच्या फेसबुकवर एक प्रसिद्धी पत्रक शेअर केले आहे. Amit Thackeray | अमित ठाकरे यांची पोस्ट “माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, सध्या आपल्या मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमले आहेत. मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या हाती आहे, त्याचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल. पण एवढं मात्र नक्की, आज जे इथे उभे आहेत ते आपले बांधव आहेत. हे शेतकरी आहेत, मजूर आहेत, लहानशा जमिनीवर पोट सांभाळणारे आहेत, शिक्षणासाठी धडपडणारे युवक आहेत. म्हणजेच मराठा समाजातील प्रत्येक स्तरातील, प्रत्येक जीवन जगणारी आपलीच माणसं आहेत. ते आपल्या घरापासून, गावापासून, शेतापासून दूर येऊन इथे आंदोलन करीत आहेत. त्यांना काही कमी पडू नये, त्यांच्या मुलांच्या, आई-वडिलांच्या डोळ्यात पोटाची चिंता दिसू नये, ही जबाबदारी आपली आहे,” असं अमित ठाकरे म्हणाले. “माझं प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला स्पष्ट आवाहन आहे, जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना अन्न-पाणी पुरवा. औषधोपचारात कोणतीही अडचण येऊ देऊ नका. त्यांच्या राहण्याची, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या. एकही मराठा बांधव असा राहू नये की ज्याला वाटेल की तो मुंबईत एकटा आहे. Amit Thackeray | लक्षात ठेवा, ते आपलेच आहेत. त्यांची लढाई जरी आरक्षणासाठी असली, तरी ते आपली जबाबदारी आहेत, आणि आपण महाराष्ट्र सैनिक म्हणून आपली जबाबदारी पूर्ण पार पाडणार आहोत. आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो, तर त्यांचं मनोबल दुप्पट होईल. आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक या भावनेनं उभा राहील, ही मला खात्री आहे,” असंही अमित ठाकरेंनी म्हटलं आहे. Amit Thackeray | जरांगे यांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावरुन टीका करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा विषय सोडवला होता, मग ते परत का आले, असा सवाल केला होता. त्यावर मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर देत, ‘राज ठाकरे म्हणजे मानाला भुकलेलं पोरगं. फडणवीस त्यांच्या घरी चहा पिऊन गेला तरी मग पक्ष बरबाद झाला तरी चालतं. हुरळून जातात. कुचक्या कानाचं म्हणतात,’ असा टोला लगावला होता. हेही वाचा: priya marathe: अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर मुग्धा गोडबोले-रानडे भावुक; “लोक इतकं वाईट का लिहितात?”