DC vs MI : ‘मला फक्त असे वाटत होते की…’, तिलकने ‘रिटायर्ड आऊट’ प्रकरणारवर सोडले मौन

DC vs MI Tilak Varma Breaks Silence On Retired Out : तिलक वर्मा गेल्या चार हंगामांपासून मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे, परंतु पहिल्यांदाच त्याच्या अर्धशतकामुळे संघाला विजय मिळाला. आतापर्यंत त्याने आयपीएलमध्ये सात वेळा अर्धशतके झळकावली आहेत, परंतु संघाला ते सामने जिंकता आले नाहीत. रविवारी, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध, त्याने ३३ चेंडूत ५९ धावा केल्या आणि हे विजयात महत्त्वाचे ठरले. परंतु एका सामन्यात त्याला रिटायर्ड आऊट व्हावे लागले होते, ज्याबद्दल त्याने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.
लखनौ सुपर जांयट्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापनाने तिलक वर्माला रिटायर्ड आऊट म्हणून माघारी बोलावले होते. ज्यामुळे खूप गोंधळ उडाला होता. अखेर स्वत: तिलक वर्माने या निर्णयावर आपले मौन सोडले आणि सांगितले की, परिस्थिती आणि सामना लक्षात घेऊन संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याला त्या स्थितीत मिशेल सँटनरसाठी जागा देण्यात कोणतीही अडचण आली नाही.
तिलक वर्मा रिटायर्ड आऊट होण्यावर काय म्हणाला?
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयानंतर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना तिलक वर्मा म्हणाला, “काहीही नाही. मला फक्त असे वाटत होते की त्यांनी संघाच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे. म्हणून, मी तो सकारात्मक पद्धतीने घेतला, परंतु मुख्य गोष्ट म्हणजे तुम्ही तो कसा घेता. ते अधिक महत्त्वाचे आहे.”
हेही वाचा – DC vs MI सामन्यात अंपायरने अचानक हार्दिक पंड्याची बॅट का चेक केली? पाहा VIDEO
तिलक वर्मा पुढे म्हणाला, “मला जिथे फलंदाजीला पाठवतील, तिथे मला फलंदाजी करायची आहे. म्हणून मी प्रशिक्षक आणि मॅनेजमेंटला सांगितले, काळजी करू नका, तुम्ही मला कुठेही खेळवा, तिथे मी फलंदाजी करु शकतो आणि मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करेन.” दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध तिलक वर्माच्या खेळीपेक्षाही महत्त्वाचे म्हणजे कर्ण शर्माची गोलंदाजी, जो एक प्रभावशाली खेळाडू म्हणून आला होता. त्याने तीन विकेट्स घेतल्या आणि संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.





