Tilak Varma Fifty : कॅप्टन तिलक वर्माची सेमीफायनलमध्ये कमाल! सलग तिसऱ्या सामन्यात केला ‘हा’ खास पराक्रम
Tilak Varma Fifty : या सामन्यात भारतीय अ संघाने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेविरुद्ध ८ बाद ३१७ धावांचा पाऊस पाडला आहे.

Tilak Varma hits 53 off 66 balls against Sri Lanka A Asia Cup Rising Stars 2026 : युवा फलंदाज आणि इंडिया-ए चा कर्णधार तिलक वर्माची शानदार लय आशिया चषक रायझिंग स्टार्स २०२६ मध्ये कायम आहे. गुरुवारी दोहा येथील वेस्ट एंड पार्क स्टेडियमवर श्रीलंका-ए विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये त्याने ६६ चेंडूंत तीन चौकार व एका षटकारासह ५३ धावा केल्या. हे त्याचे लिस्ट-ए क्रिकेटमधील १५ वे अर्धशतक ठरले. ३३ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात रवींदू फर्नांडोने त्याला पायचित केले.
अभिषेक आणि कुशाग्रसोबत केल्या दोन महत्त्वाच्या भागीदाऱ्या –
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशी (२७ चेंडूंत ४०) आणि अभिषेक शर्माने ८० धावांची सलामी दिली. आठव्या षटकात जनिथ लियानागेने वैभवला बाद केल्यानंतर २४ वर्षीय तिलक मैदानात आला. त्याने अभिषेकसोबत (६३ चेंडूंत ७८, ११ चौकार, १ षटकार) दुसऱ्या गड्यासाठी ७९ धावा जोडल्या. त्यानंतर कुमार कुशाग्रसोबत (२१) तिसऱ्या गड्यासाठी ३८ धावांची भागीदारी करत त्याने संघाला ३ बाद १९७ पर्यंत पोहोचवले.
स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा ओलांडला पन्नास धावांचा टप्पा –
Innings Break!
Crucial contributions from the batters help India A post 3️⃣1️⃣7️⃣ 🎯
Over to our bowlers to defend this and seal a spot in the final ⏳
Scorecard ▶️ https://t.co/RbuCirmUmQ
#TeamIndia | #RisingStarsAsiaCup | #SLAvINDA https://t.co/mSRXFUn3r4
— BCCI (@BCCI) November 26, 2026
आशिया चषक रायझिंग स्टार्स २०२६ मध्ये तिलकने सलग तिसऱ्या डावात पन्नासपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यापूर्वी त्याने पाकिस्तान-ए विरुद्ध १४९ चेंडूंत १००, तर नेपाळविरुद्ध ११३ चेंडूंत सहा चौकार व चार षटकारांसह १०७ धावांची शतकी खेळी केली होती. यूएईविरुद्धच्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती, कारण वैभवच्या ५३ चेंडूंतील २०४ धावांच्या जोरावर भारताने २५० धावांचे लक्ष्य १४.२ षटकांतच गाठले होते.
२०२६ मध्ये इंडिया-ए साठी तिलकची सातत्यपूर्ण कामगिरी –
यंदाच्या २०२६ वर्षात इंडिया-ए संघाकडून खेळताना तिलक वर्माने जबरदस्त सातत्य दाखवले असून, आठ डावांपैकी सात वेळा पन्नासपेक्षा अधिक धावा कुटल्या आहेत. यामध्ये श्रीलंका-ए विरुद्धच्या ६०, ६७ आणि ५३ धावांसह अफगाणिस्तान-ए विरुद्धच्या ६६ व ५९ धावांच्या खेळ्यांचा समावेश आहे. केवळ एका सामन्यात तो श्रीलंकेविरुद्ध २३ धावांवर बाद झाला. नेपाळ व पाकिस्तानविरुद्धच्या शतकांमुळे सध्या तो भारतीय फलंदाजीचा भक्कम कणा ठरला आहे.





