Indian Womens Hockey : भारताच्या लेकींनी रचला नवा इतिहास! २४ तासांत दोनदा बदलली क्रमवारी; पहिल्यांदाच टॉप-४ मध्ये धमाकेदार एन्ट्री
Indian Womens Hockey : जपानवर ४-० असा दणदणीत विजय मिळवल्यानंतर, सलीमा टेटेच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला हॉकी संघाने जर्मनी आणि स्पेनला मागे टाकत एफआयएच जागतिक क्रमवारीत प्रथमच चौथे स्थान पटकावले आहे.

Indian Women’s Hockey Team creates history by reaching 4th World Rankings : भारतीय महिला हॉकी संघाने एफआयएच जागतिक क्रमवारीत चौथे स्थान पटकावून नवा इतिहास रचला आहे. हॉकीच्या इतिहासात भारताच्या लेकी पहिल्यांदाच जगातील अव्वल चार संघांमध्ये पोहोचल्या आहेत. महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत बुधवारी जपानचा ४-० असा धुव्वा उडवल्यानंतर ही झेप घेतली. अवघ्या २४ तासांत भारताने दोनदा इतिहास बदलला; मंगळवारी चीनला ६-२ ने हरवून पाचवे स्थान गाठले, तर आता स्पेन (पाचवे) व जर्मनीला (सहावे) मागे टाकले.
सलीमा टेटेच्या नेतृत्वात विजयी घोडदौड अन् हॅट्ट्रिकची संधी –
युवा कर्णधार सलीमा टेटेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत अजेय राहून आपला दबदबा कायम राखला आहे. साखळी फेरीतील सर्व पाचही सामने जिंकत भारताने दिमाखात उपांत्य फेरी गाठली आहे. आता २७ नोव्हेंबर रोजी भारताचा उपांत्य सामना मलेशियाविरुद्ध रंगणार आहे. जर भारताने यंदाचेही जेतेपद पटकावले, तर सलग तीन वेळा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा तो स्पर्धेच्या इतिहासातील पहिलाच संघ ठरेल.
जागतिक क्रमवारीतील टॉप-३ मध्ये जाण्यासाठी कठीण आव्हान –
HISTORIC! INDIAN WOMEN REACH WORLD NO. 4! 🇮🇳🏑
The Indian women’s hockey team continues its remarkable rise, breaking into the top four of the latest FIH World Rankings.
A reflection of the team’s consistency, growth and outstanding performances on the international stage.
Indian hockey is moving forward. The journey continues! 🇮🇳
#IndianHockey #WomensHockey #FIHWorldRankings #IndiaSportsHub
— IndiaSportsHub (@IndiaSportsHub) November 25, 2026
ताज्या एफआयएच महिला हॉकी जागतिक क्रमवारीत आता भारताच्या पुढे केवळ तीनच बलाढ्य संघ उरले आहेत. यामध्ये विद्यमान ऑलिम्पिक विजेता नेदरलँड्स पहिल्या क्रमांकावर, विद्यमान विश्वविजेता अर्जेंटिना दुसऱ्या क्रमांकावर, तर बेल्जियमचा संघ तिसऱ्या स्थानी कायम आहे. गुणांच्या बाबतीत हे तिन्ही संघ सध्या चौथ्या क्रमांकावरील भारतापेक्षा बरेच पुढे आहेत. त्यामुळे टॉप-३ मध्ये स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघाला अजून खडतर प्रवास करावा लागेल.
२०२६ हे वर्ष भारतीय महिला हॉकीसाठी ठरले सुवर्णकाळ –
२०२६ हे वर्ष भारतीय महिला हॉकीच्या इतिहासातील सर्वात सुवर्णवर्ष ठरत आहे. जागतिक क्रमवारीत चौथे स्थान गाठण्यापूर्वीही भारतीय संघाने यंदा अनेक मोठे कीर्तिमान प्रस्थापित केले. भारताने चमकदार खेळाच्या जोरावर एफआयएच नेशन्स चषक जिंकला. तसेच, विश्वचषकात पाचवे स्थान मिळवले, जी १९७४ नंतरची सर्वोत्तम कामगिरी ठरली. याशिवाय ४४ वर्षांची प्रतीक्षा संपवत आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून देशाचा सन्मान वाढवला.





