Top 10 Sports News : झहीर खानची नवी क्रिकेट लीग, बुमराहच्या निवडीचा ‘तो’ किस्सा आणि WTC गुणतालिकेचा थरार; वाचा क्रिकेट विश्वातील टॉप 10 न्यूज
Top 10 Sports News : झहीर खानची नवी क्रिकेट लीग, बुमराहच्या निवडीचा 'तो' किस्सा आणि WTC गुणतालिकेचा थरार; वाचा क्रिकेट विश्वातील टॉप 10 न्यूज

Top 10 Sports News :
1. एकाच संघात खेळणार पुरुष अन् महिला खेळाडू
क्रिकेट विश्वात मोठी क्रांती
भारताचा माजी वेगवान गोलंदाज आणि २०११ विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य झहीर खान जर्मनीमध्ये ‘इक्वल’ नावाची नवी मिक्स्ड टी-२० क्रिकेट लीग सुरू करणार आहे. पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना एकाच प्लेइंग इलेव्हनमध्ये एकत्र आणून पारंपरिक क्रिकेटला नवी दिशा देणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असणार आहे. यामुळे स्वतंत्र स्पर्धांची परंपरा मोडून सर्व खेळाडू एकाच धावफलकावर आणि एकाच संघात विजयासाठी खेळताना दिसतील. जर्मन क्रिकेट फेडरेशनच्या भागीदारीतून ही संपूर्ण योजना साकारली जाणार आहे. या लीगच्या प्रत्येक प्लेइंग इलेव्हनमध्ये सहा महिला आणि पाच पुरुष खेळाडू असतील.सुरुवातीला पाच संघांमध्ये १२ टी-२० सामने खेळवले जातील, ज्यात प्रत्येक संघात १८ खेळाडूंचा समावेश असणार आहे. (Top 10 Sports News)
2. एकही चेंडू न खेळता दिग्गज फलंदाज बोल्ड
रिकाम्या स्टंप्सवर गोलंदाजी पाहून क्रिकेट चाहते थक्क!
महिला बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बेन हीट आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यातील सामन्यात एक दुर्मिळ घटना घडली. पंधराव्या षटकात फलंदाजीसाठी आलेली डिएन्ड्रा डॉटिन ७५ सेकंदांच्या मर्यादेत क्रीजवर पोहोचण्यात अपयशी ठरली. त्यामुळे पंचांनी ‘फ्री बॉल एट स्टंप्स’ हा खास नियम लागू केला. डॉटिनला बाजूला सरकावे लागले आणि गोलंदाज सारा ग्लेनला रिकाम्या स्टंप्सवर चेंडू टाकण्याची संधी मिळाली. ग्लेनने अचूक वेध घेत दांड्या उडवल्याने डॉटिन एकही चेंडू न खेळता त्रिफळाचित झाली. क्रिकेट जगतात सध्या या अनोख्या नियमाची जोरदार चर्चा सुरू आहे.
3. आयपीएल लिलावाची मोठी घोषणा!
66 जागांसाठी 1,220 खेळाडू रिंगणात
आयपीएल 2027 च्या हंगामासाठी 16 डिसेंबर रोजी गोव्यात होणाऱ्या लिलावासाठी बीसीसीआयने खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यंदा एकूण 1 हजार 220 खेळाडूंनी नोंदणी केली असून, यात 939 भारतीय आणि 17 देशांतील 281 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. दहा संघांनी 184 खेळाडूंना कायम ठेवल्याने लिलावात केवळ 66 जागा शिल्लक आहेत. परदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक 53 खेळाडू रिंगणात आहेत. संघांचा विचार करता मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडे सर्वाधिक प्रत्येकी 9 जागा रिक्त आहेत. तर कोलकात्याला 8 आणि लखनौला 7 खेळाडूंची गरज आहे. गुजरातकडे सर्वात कमी 3 स्लॉट शिल्लक असल्याने या लिलावात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
4. टीम इंडियाचे WTC फायनलचे स्वप्न धोक्यात!
उर्वरित सर्व जिंकूनही भारताचा मार्ग खडतर
न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिल्याने टीम इंडियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या आशा धुसर झाल्या आहेत. विजयाच्या उंबरठ्यावर असतानाही पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाज किवींना सर्वबाद करू शकले नाहीत. यापूर्वी श्रीलंकेविरुद्धही विजय हुकल्याने भारताने दोन सामन्यांत १६ मौल्यवान गुण गमावले. ताज्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका ७५ टक्के गुणांसह पहिल्या, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या, न्यूझीलंड तिसऱ्या, तर भारत ५० टक्के गुणांसह चौथ्या स्थानी आहे. फायनलच्या शर्यतीत टिकण्यासाठी भारताला न्यूझीलंडविरुद्धचा १ आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे ५ असे उर्वरित सर्व सहा सामने जिंकावे लागतील. मात्र, हे सर्व सामने जिंकूनही भारताला इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागणार आहे. (Top 10 Sports News)
5. टीम इंडियाचा न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड!
कसोटी इतिहासात अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच संघ!
वेलिंग्टन येथे खेळला गेलेला भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णित सुटला. मात्र, या सामन्यात भारतीय संघाने कसोटी क्रिकेटच्या १४९ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात आजवर कधीही न घडलेला एक अनोखा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी पहिल्या सातही विकेट्ससाठी सलग अर्धशतकी भागीदारी करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला. यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, कर्णधार शुबमन गिल, ऋषभ पंत, अंशुल कंबोज, ध्रुव जुरेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या दमदार खेळामुळे भारताने ९ बाद ७२० धावांचा डोंगर उभारला. पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाज किवींना सर्वबाद करू न शकल्याने विजय हुकला, तरी भारताच्या या विक्रमाची क्रिकेट जगतात जोरदार चर्चा सुरू आहे.
6. उस्मान ख्वाजा अन् डेव्हिड वॉर्नरला मोठा झटका!
सँडपेपरगेट वादामुळे समालोचन पॅनेलमधून हटवलं
ऑस्ट्रेलियाई क्रिकेटमधील २०१८ च्या कुप्रसिद्ध बॉल टॅम्परिंग वादाची आग पुन्हा भडकली आहे. माजी फलंदाज उस्मान ख्वाजाने आपल्या ‘सब्र’ या आत्मचरित्रात, केपटाऊन कसोटीतील चेंडू छेडछाड कटाची माहिती संपूर्ण संघाला होती, असा खळबळजनक दावा केला आहे. डेव्हिड वॉर्नरनेही या दाव्याला दुजोरा दिला आहे. या नव्या वादामुळे फॉक्स स्पोर्ट्सने कठोर पाऊल उचलत ख्वाजा आणि वॉर्नर यांना इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील समालोचनापासून दूर केले आहे. दुसरीकडे, या प्रकरणावरून कसोटी कर्णधार पॅट कमिन्सच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, आगामी न्यूझीलंड मालिकेपूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कमिन्सची भेट घेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले आहे.
7. भारतीय महिला हॉकी संघाची ऐतिहासिक झेप
जागतिक क्रमवारीत पहिल्यांदाच पटकावले चौथे स्थान
भारतीय महिला हॉकी संघाने एफआयएच जागतिक क्रमवारीत पहिल्यांदाच चौथे स्थान पटकावून इतिहास रचला आहे. महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत चीनला ६-२ आणि जपानला ४-० असे हरवून भारताने अवघ्या २४ तासांत स्पेन व जर्मनीला मागे टाकले. कर्णधार सलीमा टेटेच्या नेतृत्वात अजेय राहिलेला भारत २७ नोव्हेंबरला मलेशियाविरुद्ध उपांत्य सामना खेळेल, जिथे विजेतेपदाच्या हॅट्ट्रिकची संधी आहे. सध्या नेदरलँड्स, अर्जेंटिना आणि बेल्जियमच भारतापुढे आहेत. नेशन्स कप व आशियाई सुवर्णपदकासह २०२६ हे वर्ष भारतीय महिला हॉकीसाठी सुवर्णकाळ ठरले आहे.
8. बुमराह नावाचा ‘हिरा’ कसा सापडला?
जॉन राईट यांनी सांगितला किस्सा
न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या जसप्रीत बुमराहचा माजी भारतीय प्रशिक्षक जॉन राईट यांच्यासोबतचा फोटो नुकताच व्हायरल झाला. या निमित्ताने राईट यांनी बुमराहच्या शोधाचा खास किस्सा सांगितला आहे. २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सचे स्काऊट असताना, एका सामन्यात बुमराहने सलग १२ अचूक यॉर्कर टाकून राईट यांना थक्क केले. गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेलच्या सकारात्मक अभिप्रायानंतर राईट यांनी बुमराहला तात्काळ मुंबईच्या ताफ्यात घेतले. पुढे सराव सत्रात बुमराहची भेदक गोलंदाजी पाहून खुद्द सचिन तेंडुलकरही भारावले होते आणि या मुलाचा सामना करणे कठीण असल्याचे त्यांनी राईट यांना सांगितले. मिळालेल्या संधीचे सोने करत बुमराह आज जगातील नंबर वन गोलंदाज बनला आहे.
9. सुपर जायंट्सचा मोठा अन् ऐतिहासिक निर्णय!
रिटेन केलेला खेळाडूच बनला थेट हेड कोच
दक्षिण आफ्रिकेच्या ‘एसए२०’ २०२७ हंगामापूर्वी डरबन सुपर जायंट्सने मोठा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसन याची संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली जात असून, तो लान्स क्लुजनर यांची जागा घेईल. जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या विल्यमसनला डरबनने खेळाडू म्हणून रिटेन केले होते; मात्र आता तो थेट प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसेल. गेल्या वर्षी त्याने लखनौ सुपर जायंट्ससोबत स्ट्रॅटेजिक ॲडव्हायझर म्हणून काम पाहिले होते. आता क्रिकेट संचालक टॉम मूडी यांच्यासोबत मिळून तो संघाची नवी रणनीती आखेल. १९ जानेवारीला प्रिटोरिया कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्याने विल्यमसनच्या मार्गदर्शनाखाली डरबन आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.
10. दिल्लीच्या पठ्ठ्याने इंग्लंडला लोळवले
कोरोनात ऑस्ट्रेलियात अडकला अन् नशीब पालटलं
दिल्लीत जन्मलेल्या भारतीय वंशाच्या निखिल चौधरीच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ३ गडी राखून रोमांचक विजय मिळवला. निखिलने प्रथम गोलंदाजीत २१ धावा देत २ विकेट्स घेतले आणि त्यानंतर फलंदाजीत अवघ्या ३८ चेंडूत ६६ धावांची वादळी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. मायभूमीवर पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या निखिलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. भारतातून आलेल्या आपल्या आई-वडिलांसमोर ऐतिहासिक एमसीजी मैदानावर हा सन्मान मिळाल्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला. पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा निखिल २०२० च्या लॉकडाऊनमध्ये ऑस्ट्रेलियात अडकला होता; मात्र जिद्दीच्या जोरावर त्याने आज ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवले आहे. (Top 10 Sports News)






