Tikona Fort : तिकोणा गडावर ‘शिव’कार्य! शेकडो मावळ्यांच्या श्रमदानातून १५० वर्षांचा गाळ उपसला
Tikona Fort : ऐतिहासिक गड-कोट हीच खरी संपत्ती; पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनीही घेतला मोहिमेत सहभाग, शिवरायांच्या वारशाचे जतन करण्याचा संकल्प.

Tikona Fort – सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ऐतिहासिक तिकोणा गडावर सध्या पुरातत्व विभाग तसेच विविध संस्था-संघटनांच्या माध्यमातून संवर्धनाचे काम सुरू आहे. गडावरील दुरुस्ती व संवर्धन कार्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होत असल्याने आणि यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे तिकोणा गडावरील ‘तळजाई’ हे ऐतिहासिक पाण्याचे टाके अनेक वर्षांनंतर पूर्णपणे कोरडे पडले आहे.
या पार्श्वभूमीवर टाक्यातील गाळ, दगड आणि माती काढून त्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था, पुणे आणि ‘सह्याद्री आणि मी’ परिवाराच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत मुळशी आणि मावळ तालुक्यातील शेकडो दुर्गप्रेमी मावळ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत श्रमदान केले. रात्रीचा अंधार आणि दिवसभराचे रणरणते ऊन याची पर्वा न करता जय भवानी जय शिवाजी! च्या घोषणांनी संपूर्ण गड परिसर दुमदुमून गेला.
मोहिमेदरम्यान तळजाई टाक्यात साचलेला तब्बल दीडशे वर्षांपासूनचा गाळ, माती आणि दगड काढून टाकी स्वच्छ करण्यात आली. तसेच परिसरातील दगड-मातीची योग्य तटबंदी करून ऐतिहासिक जलस्रोताचे जतन करण्याचे कामही करण्यात आले. या दुर्गसंवर्धन मोहिमेत श्री शिवदुर्ग संवर्धन पुणे, सह्याद्री आणि मी परिवार, सह्याद्री भटकंती सामाजिक प्रतिष्ठान, स्वराज्याचे शिलेदार तसेच अखिल शिवजन्म उत्सव समिती, भुगाव येथील शिवभक्त सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे रविवारी गडावर पर्यटनासाठी आलेल्या शेकडो पर्यटकांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवत गडसंवर्धनाला हातभार लावला. आपले गडकोट हीच खरी ऐतिहासिक संपत्ती असून शिवरायांनी दिलेला हा वारसा जतन करणे हे प्रत्येक शिवभक्ताचे कर्तव्य आहे, ही भावना मनात ठेवून तरुण, महिला आणि लहान मुलांनीही उत्साहाने श्रमदान केले. मोहिमेदरम्यान सहभागींसाठी नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था गडावरच करण्यात आली होती.





