व्याघ्र दिन विशेष : ‘सह्याद्री’तील वाघांच्या पाऊलखुणा

– संजय पाटील
वाघांची संख्या वाढवण्यासाठी जागतिक स्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहे. आज 29 जुलै रोजी ‘जागतिक व्याघ्र दिन’ आाहे. त्यानिमित्त ‘सह्याद्री’तील वाघांच्या पाऊलखुणांचा घेतलेला वेध…
पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दोन वाघांचा दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून अधिवास आहे. त्याव्यतिरिक्त इतर सात स्थलांतरित वाघही यापूर्वी प्रकल्पात येऊन गेल्याचे निरीक्षण डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेने मांडले आहे. पश्चिम घाटातील दर्याखोर्यांमध्ये असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात निमसदाहरित जंगलपट्टा आहे. या जंगलात अनेक वन्यजीवांना आसरा मिळालाय.
त्याबरोबरच शेकडो प्रकारच्या वनौषधींनीही हा प्रकल्प समृद्ध असून देशभरात आढळणार्या प्राण्यांच्या 400 प्रजातींपैकी 36 पेक्षा जास्त मांसभक्षी व तृणभक्षी प्राण्यांची नोंद या प्रकल्पात झाली असून हा प्रकल्प जैवविविधतेबाबत परिपूर्ण आहे. उंच-सखल डोंगररांगा आणि घनदाट जंगल, असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. याठिकाणी दुर्मिळ वनस्पतींचा मोठा खजिना आहे. स्थानिक आणि स्थलांतर होऊन येणारे पक्षी, प्राणी तसेच सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी आदींनी हा प्रकल्प समृद्ध असल्याचे दिसते.
सह्याद्री प्रकल्पात वाघ, बिबट्या, रानकुत्री, रानमांजर, कोल्हा, तरस, लेपर्ड कॅट, गवा, सांबर, रानडुक्कर, भेकर, वानर, अस्वल, खवल्या मांजर, राज्यप्राणी शेकरू, साळींदर, मुंगूस, ससा, चौसिंगा, खोकड, सिव्हेट कॅट, पानमांजर, माउस डियर, वाघाटी असे विविध प्रकारचे प्राणी अधिवास करतात. येथे आजअखेर 275 प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे. तसेच 13 जातींचे पक्षी केवळ ‘सह्याद्री’तच आढळत असल्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी सांगितले.
प्राणी, पक्षी आणि वनस्पतींनी बहरलेल्या ‘सह्याद्री’च्या या घनदाट जंगलात वाघांचाही अधिवास आहे. सध्या येथे दोन वाघ सुमारे दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून वावरत आहेत. या वाघांची ‘सह्याद्री टी-1’ आणि ‘सह्याद्री टी-2’ अशी वन्यजीव विभागाने नोंदही घेतली आहे. मात्र, या दोन वाघांव्यतिरिक्त यापूर्वी स्थलांतरित होऊन आलेल्या सात वाघांच्या अल्प काळातील अधिवासाचा पुरावाही वेळोवेळी हाती लागला आहे.
मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे सांगतात की, प्रकल्पात असलेल्या विविध कॅमेर्यांमध्ये चार वेळा स्थलांतरित वाघ कॅमेराबद्ध झाले आहेत. मात्र, त्यांची निश्चित संख्या मांडता येत नसल्याने डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेने प्रकल्पात आढळलेल्या विष्ठा संकलित करून त्याची ‘डीएनए’ तपासणी केली होती. त्यावेळी ‘सह्याद्री’त सात स्थलांतरित वाघांचे अस्तित्व आढळून आल्याचे विश्लेषण संस्थेने केले होते. तसेच त्याबाबतचा अहवालही दिला होता.
प्रकल्पात असलेल्या कॅमेर्यांमध्ये तीन वेळा स्थलांतरित वाघांची छायाचित्रे कैद झाली आहेत. सुमारे तीन वर्षांपूर्वी दोन पट्टेरी वाघ कॅमेर्यात कैद झाले होते. त्यामुळे प्रकल्पात वाघांचे अस्तित्व असल्याचा ठोस पुरावा हाती लागला होता. मात्र, वाघांची नेमकी संख्या स्पष्ट करण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थेने विष्ठा संकलित करून त्याची ‘डीएनए’ तपासणी केली. त्यावेळी ‘सह्याद्री’त सात स्थलांतरित वाघांचा वावर आढळून आला. कॅमेर्यात टिपले गेलेले ते वाघ स्थानिक नव्हते. तसेच ते दीर्घकाळ प्रकल्पात वास्तव्यासही नव्हते. उत्तरेतील कोयनेपासून दक्षिणेतील काली व्याघ्र प्रकल्पापर्यंत ते वावरत असल्याचे भारतीय वन्यजीव संस्थेच्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे.
प्रकल्पातील कॅमेर्यात मे 2018 मध्ये एका वाघाची छबी टिपली होती. तोच वाघ सह्याद्रीपासून दक्षिणेला सुमारे साडेतीनशे किलोमीटरवर कर्नाटकात असलेल्या काली व्याघ्र प्रकल्पातही आढळून आला होता. एकूणच ‘सह्याद्री’त आतापर्यंत आढळलेले सात वाघ वारंवार स्थलांतरित होत असल्याचे दिसून आले आहे.
या सात वाघांव्यतिरिक्त ‘सह्याद्री टी-1’ आणि ‘सह्याद्री टी-2’ अशी नोंद घेतलेले दोन वाघ मात्र प्रकल्पातच दिर्घकाळ वास्तव्यास आहेत.
मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे म्हणतात की, सह्याद्री प्रकल्पात वाघांचे स्थानांतरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र, त्यासाठी प्रथम दक्षिणेकडून राधानगरी ते चांदोली या वाघांच्या परिभ्रमण मार्गाचे संवर्धन झाले पाहिजे. त्याचबरोबर तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत.
स्थलांतरित वाघ चार वेळा कॅमेर्यात कैद !
2010 ः पुसटशी छबी, खात्री नाही
23 मे 2018 ः सायं. 6.36 वा.
24 मे 2018 ः रात्री 12.52 वा.
28 एप्रिल 2021 ः रात्री 11.40 वा.
असा आहे व्याघ्र प्रकल्प
1,165 ः कोअर बफरसह एकूण क्षेत्र
317.670 ः चांदोली राष्ट्रीय उद्यान
423.550 ः कोयना वन्यजीव
अभयारण्य (सर्व क्षेत्र चौरस किलोमीटरमध्ये)





