पुणे | महाविद्यालयांचे खासगी क्लासशी टाय-अप

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे ऑडिट करण्यात येणार आहे. याबरोबरच खासगी क्लासशी टाय-अप असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्यात येणार आहे. याबाबत पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने कंबर कसली आहे.
शहरात अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहायित कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यातही प्रामुख्याने विद्यार्थी नामांकित व सोयीच्या महाविद्यालयात प्रवेश घेतात. बहुसंख्य विद्यार्थी खासगी क्लासशी टाय-अप असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेतात.
विद्यार्थी इयत्ता अकरावी, बारावीच्या एवजी जेईई. नीट. एमएच-सीईटी या प्रवेश परीक्षाच्या अभ्यासाकडे अधिक लक्ष केंद्रीत करतात. विद्यार्थी क्लासचालकांना लाखो रुपयांची फी अदा करतात. आता गल्लीबोळात क्लासचालकांनी दुकाने उघडली आहेत. फारशा काहीही सुविधा नसताना क्लासचालक फी मात्र भरमसाठ आकारत असतात.
विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे सेटींग…
महाविद्यालयात विद्यार्थ्यांची ७५ टक्के उपस्थिती आनिवार्य असते. मात्र, याकडे महाविद्यालयांचे दुर्लक्ष होते. विद्यार्थी महाविद्यालयात गैरहजर असताना त्यांची सेटींग करुन उपस्थिती लावली जाते. महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक यंत्रणा बसविणे आवश्यक असते.
मात्र ती यंत्रणा बसविल्याचे फार ठिकाणी आढळत नाही. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचा कनिष्ठ महाविद्यालयातील अनागोंदी कारभारावर फारसा वचकच राहीलेला नाही.
अधिकारी केवळ कारवाई करण्याच्या घोषणा करतात. प्रत्यक्षात मात्र काहीत कारवाई करत नाहीत. यामुळे बहुसंख्य महाविद्यालये अधिकारी यांना जुमानत नाहीत.
यंदाच्या शैक्षणिक वर्षातही शिक्षण विभागाने कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र, प्रत्यक्षात कारवाईसाठी मुहुर्त कधी सापडणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.




