नवी दिल्ली : कर्नाटकात कमल हासन यांच्या ठग लाइफ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने हा चित्रपट कर्नाटकात प्रदर्शित करण्याबाबत आदेश दिला आहे. सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला चित्रपटावरून हिंसाचार झाल्यास फौजदारी आणि दिवाणी कायद्याअंतर्गत पावले उचलण्यास सांगितले आहे. कर्नाटक साहित्य परिषदेने कोणत्याही हिंसाचारात सहभागी होणार नाही अशी दिलेली हमी सर्वोच्च न्यायालयाने रेकॉर्डवर घेतली. न्यायालयाने म्हटले आहे की, हा खटला बंद करणे न्यायाच्या हिताचे आहे. आम्ही राज्यावर दंड आकारणार नाही. या प्रकरणातील सुनावणीदरम्यान, याचिकाकर्त्याने अशी मागणी केली होती की, द्वेषपूर्ण भाषणे देणाऱ्या आणि जाळपोळ करणाऱ्यांवर न्यायालयाने कारवाईचे निर्देश द्यावेत. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही अशा प्रकरणांमध्ये आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई करणे हे राज्याचे काम आहे. आम्ही हे होऊ देऊ शकत नाही. केवळ एका विधानामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यापासून रोखला पाहिजे, स्टँड-अप कॉमेडियनला शो करण्यापासून रोखले पाहिजे किंवा एखाद्याला कविता वाचण्याची परवानगी देऊ नये या बाबी अमान्य आहेत. कर्नाटक सरकारने म्हटले की, सुरक्षा प्रदान करणे हे आमचे कर्तव्य आहे. याचिकाकर्त्याने ज्या प्रकरणांचा उल्लेख केला आहे, त्यात सीबीएफसी प्रमाणपत्र असूनही राज्याने बंदी घातली होती. कानडी भाषेचा उगम तमिळ भाषेमधून झाल्याचे वादग्रस्त विधान निर्माते कमल हासन यांनी केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने कमल हासन यांना माफी मागण्यास सांगितले होते. त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.